शेतजमीनीच्या विक्रीवरही टॅक्स द्यावा लागतो का ? काय सांगतो आयकर विभागाचा नियम
Income Tax Rule : साधारणपणे, जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती जमीन खरेदी करते आणि विकते तेव्हा त्याला त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर भरावा लागतो, परंतु शेतजमिनीच्या विक्रीनंतर त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर भरावा लागतो का ? याबाबत अनेकांना माहिती नाहीये. आपल्या देशात शेतीच्या उत्पन्नावर कर लागत नाही.
यामुळे अनेकांना शेतजमिनीच्या विक्रीनंतर मिळालेल्या उत्पन्नावर सुद्धा कर भरावा लागत नाही, असे वाटते. पण खरंच शेत जमिनीच्या विक्रीनंतर मिळालेल्या उत्पन्नावर कर भरावा लागत नाही का, याबाबत भारतीय आयकर विभागाचे नियम काय आहेत? याचाच आज आपण सविस्तर आढावा घेणार आहोत.
मंडळी शेत जमिनीच्या विक्रीतून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नावर कर भरावा लागत नाही. पण काही अशा जमिनी आहेत ज्यावर शेती होते तरीही आयकर विभागाच्या दृष्टीने त्या शेतजमिनी नसतात. अशा जमिनीची जेव्हा विक्री होते त्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर जमीन मालकांना कर भरावा लागतो.
आता आपण आयकर विभाग कोणत्या जमिनी शेत जमिनी समजते अन कोणत्या जमिनी शेत जमिनी समजत नाही याबाबत माहिती पाहूयात. मंडळी शेतजमीन ही ग्रामीण भागातही असते अन शहरालगतही शेतजमीन असते. शहरालगत असणाऱ्या शेतजमिनीवर सुद्धा अनेक जण शेती करतात.
पण, शहरांमधील शेतजमीन ही आयकराच्या दृष्टीने शेतजमीन मानली जात नाही. मंडळी, जर जमीन शेतजमीन म्हणून ग्राह्य धरली गेली, तर त्या जमिनीवर लावल्या जाणाऱ्या कराबाबत आयकर कायद्याच्या कलम 2 (14) मध्ये सर्व काही स्पष्ट केले आहे.
पण, जर शेतजमीन नगरपालिका, अधिसूचित क्षेत्र समिती, टाउन एरिया कमिटी किंवा कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अंतर्गत येत असेल आणि त्या क्षेत्राची लोकसंख्या 10,000 किंवा त्याहून अधिक असेल, तर ही जमीन प्राप्तिकर विभागाच्या दृष्टीने शेतजमीन नसते.
याशिवाय नगरपालिका किंवा कॅन्टोन्मेंट बोर्डाची लोकसंख्या 10 हजार किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास अशा क्षेत्राच्या 2 किलोमीटरच्या परिघात येणारी जमीन शेतजमीन म्हणून ग्राह्य धरण्यात येणार नाही. या दोन नियमांशिवाय महापालिका किंवा कॅन्टोन्मेंट बोर्डाची लोकसंख्या 10 लाखांपेक्षा जास्त असल्यास, 8 किलोमीटरपर्यंतच्या परिसरात असलेली जमीन शेतजमीन म्हणून गणली जाणार नाही.
त्याचप्रमाणे नगरपालिका किंवा कॅन्टोन्मेंट बोर्डाची लोकसंख्या १ लाख किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्या परिसराच्या आजूबाजूच्या 6 किलोमीटरच्या त्रिज्येतील क्षेत्राचा समावेश शेतजमिनीत होत नाही. या कारणास्तव तुम्हाला या प्रकारच्या जमिनीवर कर भरावा लागेल.
अर्थातच आयकर विभागाच्या नियमानुसार ज्या शेतजमीन आहेत त्या शेतजमिनीच्या विक्रीतून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नावर कर भरावा लागत नाही पण आयकर विभागाच्या नियमानुसार ज्या शेतजमिनी नाहीत त्या जमिनीच्या विक्रीतून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नावर कर भरावा लागतो.
जर शहरी भागातील शेतजमीन खरेदी केल्यानंतर 24 महिन्यांसाठी ठेवली आणि नंतर विकली तर त्यातून मिळणारा नफा हा दीर्घकालीन भांडवली नफा समजला जातो. यावर तुम्हाला इंडेक्सेशन बेनिफिटसह २० टक्क्यांपर्यंत कर भरावा लागेल. 24 महिन्यांच्या आत विकल्यास, नफ्यावर अल्पकालीन भांडवली नफा कर आकारला जाईल. भांडवली नफ्याची रक्कम तुमच्या कर स्लॅबनुसार ठरविली जाते.