आता तुमच्या हातातील मोबाईलवरून करता येणार मालमत्तेची रजिस्ट्री! प्रॉपर्टी खरेदी-विक्रीची प्रक्रिया होईल सोपी आणि पारदर्शक
Digital Property Registry:- मालमत्तेच्या संदर्भातील कुठलीही गोष्ट ही खूप काळजीपूर्वक करणे गरजेचे असते व यामध्ये अनेक नियम असल्याने प्रत्येक नियमाच्या अधीन राहून ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. यामध्ये एखाद्या मालमत्तेची खरेदी विक्रीची प्रक्रिया अतिशय महत्त्वाची असते व यामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक स्वरूपाचा व्यवहार होत असतो व मालमत्तेची खरेदी विक्री झाल्यानंतर त्या मालमत्तेची नोंदणी प्रक्रिया खूप महत्त्वाची असते.
यालाच आपण प्रॉपर्टी रजिस्ट्री असे देखील म्हणतो.ही एक खूपच लांबलचक आणि वेळखाऊ प्रक्रिया समजली जाते. परंतु आता देशामध्ये या मालमत्ता नोंदणी प्रक्रियेमध्ये खूप मोठा बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली असून या बदलानुसार 2025 पासून देशात डिजिटल प्रॉपर्टी रजिस्ट्री प्रणाली लागू करण्यात आली आहे
व यामुळे आता आपल्या हातातील स्मार्टफोनच्या माध्यमातून मालमत्तेची नोंदणी डाऊनलोड करता येणार आहे व यामुळे आता मालमत्तेच्या खरेदी विक्रीची जी काही प्रक्रिया असते ती पारदर्शक, सोपी व जलद गतीने होण्यास मदत होणार आहे.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या प्रणालीमुळे आता जमीन किंवा मालमत्तेच्या संबंधित जे काही वाद होतात ते देखील आता कमी होतील व बनावट कागदपत्रांच्या साह्याने केली जाणारी फसवणूक देखील टाळता येणार आहे.
डिजिटल प्रॉपर्टी रजिस्ट्री म्हणजे नेमके काय?
ही एक ऑनलाईन प्रणाली असून या प्रणालीमध्ये प्रॉपर्टीशी संबंधित सर्व माहिती डिजिटल स्वरूपामध्ये ठेवली जाईल. या माहितीमध्ये प्रामुख्याने प्रॉपर्टीचा संपूर्ण तपशील तसेच तिच्या मालकाचे नाव, मागील सगळा खरेदी आणि विक्रीचा इतिहास तसेच भरलेल्या करांचा तपशील इत्यादी सगळी माहिती एका ठिकाणी ठेवली जाईल.
म्हणजे यातील सगळ्या डेटा हा सुरक्षित राहील अशा पद्धतीने या प्रणालीची रचना करण्यात आलेली आहे. जर आपण डिजिटल प्रॉपर्टी रजिस्ट्रीचे फायदे बघितले तर त्यामुळे कुठल्याही मालमत्तेची सर्व माहिती सहजपणे उपलब्ध होईल.
दुसरे महत्त्वाचे म्हणजे प्रॉपर्टी खरेदी विक्री व्यवहारानंतर जी काही नोंदणी प्रक्रिया असते त्याला लागणारा वेळ खूप कमी होईल व व्यक्तिगत हस्तक्षेप कमी झाल्यामुळे या भ्रष्टाचाराला देखील आळा बसेल व मालमत्तेची नोंद पारदर्शकपणे झाल्याने वाद देखील कमी होतील. या सगळ्यामुळे खरेदी आणि विक्रीची प्रक्रिया खूपच सोपी होईल.
डिजिटल प्रॉपर्टी रजिस्ट्री कशी डाऊनलोड कराल?
तुम्हाला तुमच्या हातातील स्मार्टफोनच्या माध्यमातून डिजिटल प्रॉपर्टी रजिस्ट्री डाऊनलोड करता येणार आहे व त्याकरिता तुम्हाला सगळ्यात आधी….
1- राज्याच्या अधिकृत भूमी अभिलेख संकेतस्थळाला म्हणजेच वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
2- त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या ‘डिजिटल प्रॉपर्टी रजिस्ट्री’ या विभागावर क्लिक करावे व तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड एंटर करावा.
3- तसेच तुमच्या प्रॉपर्टीचे स्थान तसेच सर्वेक्षण क्रमांक इत्यादी विचारलेला तपशील नमूद करावा.
4- हा तपशील नमूद केल्यानंतर डाऊनलोड बटनावर क्लिक करावे. त्यानंतर प्रॉपर्टी रजिस्ट्रीची पीडीएफ फाईल तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड केली जाईल.
मालमत्तेची नोंदणी कशी कराल?
यामध्ये तर तुमच्या राज्याचे जे काही ई नोंदणी पोर्टल आहे त्याला भेट द्यावी व त्या ठिकाणी तुमचे नवीन खाते तयार करून लॉगिन करावे. त्यानंतर मालमत्तेचा संपूर्ण तपशील आणि आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी.
स्टॅम्प ड्युटी व नोंदणी शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे व अपॉइंटमेंट बुक करावी. अपॉइंटमेंट बुक केल्यानंतर सब रजिस्ट्रार कार्यालयात जाऊन बायोमेट्रिक पडताळणी करावी व डिजिटल स्वाक्षरीने नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी.