पाऊस येणार की उन्हाचा तडाखा कायम राहणार? IMD ने दिली महत्त्वाचे अपडेट
Maharashtra Weather:- गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या हवामानात सातत्याने चढ-उतार जाणवत आहे.राज्यभरात दिवसाढवळ्या उन्हाची तीव्रता वाढली असून नागरिक उन्हाच्या झळांनी त्रस्त झाले आहेत. जानेवारीच्या शेवटी आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीला थंडीचा प्रभाव दिसून आला असला तरी आता तापमान झपाट्याने वाढत आहे.
हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार येत्या दोन दिवसांत राज्यात तापमानात किंचित घट होण्याची शक्यता असून त्यानंतर पुन्हा तापमान वाढू शकते.
IMD चा हवामान अंदाज
IMD च्या अहवालानुसार, महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांत कमाल तापमान १ ते २ अंश सेल्सिअसने घसरणार आहे. मात्र ही घसरण तात्पुरती असेल कारण त्यानंतर पुन्हा तापमान वाढेल आणि उन्हाचा तडाखा अधिक तीव्र होईल.
तसेच किमान तापमानही पुढील तीन दिवसांमध्ये २ ते ३ अंशांनी कमी होईल.परंतु त्यानंतर मोठा बदल होण्याची शक्यता नाही. विशेषतः विदर्भात पुढील ७२ तासांत किमान तापमान २ ते ३ अंशांनी घसरणार असून त्यानंतर ते पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
बुधवारी (१२ फेब्रुवारी) च्या अहवालानुसार, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत दिवसाचे तापमान तुलनेने जास्त होते. या भागांत उष्णतेची लाट जाणवत होती. तर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थोडासा गारठा जाणवला. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रातील बहुतांश भागांत कोरडे हवामान होते आणि कोठेही पाऊस पडल्याची नोंद नाही.
राज्यातील कमाल तापमानात वाढ
राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याचे पाहायला मिळाले. विदर्भातील चंद्रपूर येथे सर्वाधिक ३६.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.तर सोलापूर आणि वर्धा येथे कमाल तापमान ३६.९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. पुण्यात काही ठिकाणी तापमान ३७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याचे पाहायला मिळाले. याउलट महाबळेश्वरमध्ये सर्वात कमी कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस होते.
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पहाटे थोडा गारवा जाणवत असला तरी दुपारी उन्हाच्या झळा कायम राहिल्या. IMD च्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस राज्यातील बहुतांश भागांत तापमानात फारसा बदल होणार नाही. पहाटे गारवा जाणवण्याची शक्यता असून काही भागांत हलक्या धुक्याची नोंद होऊ शकते. मात्र दुपारी उन्हाचा तीव्र चटका बसणार असल्याने, नागरिकांनी उष्णतेपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.