IMD चा धोकादायक इशारा! महाराष्ट्रात यंदा उन्हाळा सर्वाधिक तापदायक… वाचा पुढील आठवड्याचा धक्कादायक इशारा?
Maharashtra Havaman:- महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यातच तापमानाचा पारा झपाट्याने वाढू लागला असून, अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, सध्या पश्चिम राजस्थानला जोडून पाकिस्तानच्या काही भागांमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेचे दिवस सामान्यपेक्षा अधिक राहतील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. २८ फेब्रुवारी रोजी राज्यातील तापमान मोठ्या प्रमाणावर वाढले होते. कोकण आणि गोव्याच्या काही भागांमध्ये तापमान सामान्य पातळीपेक्षा ३ ते ५ अंश सेल्सिअसने जास्त नोंदवले गेले. तसेच, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणी प्रचंड उष्णता जाणवू लागली आहे.
राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये तापमानाचा उच्चांक
शुक्रवारी मुंबई उपनगरात ३८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर अकोल्याचा पारा ३८ अंश सेल्सिअसपर्यंत गेला. विदर्भात बहुतांश ठिकाणी तापमान ३६ ते ३८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिले. राज्यातील अन्य महत्त्वाच्या शहरांमध्येही तापमानाने उच्चांक गाठला. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, बीड,
अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोलीसह अनेक ठिकाणी कमाल तापमान ३५ अंशांपेक्षा जास्त राहिले. तापमानाच्या या वाढीमुळे नागरिकांना उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागली आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघात होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी
अशा वाढत्या तापमानाचा फटका केवळ मानवाला नाही, तर शेती आणि पशुपालनालाही बसत आहे. रेशीम उद्योगामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसू शकतो. रेशीम अळ्यांना पोषण देणाऱ्या तुतीच्या पानांवर उष्णतेचा परिणाम झाल्यास, अळ्या कोष तयार करणार नाहीत किंवा पोचट कोष होतील, असे निरीक्षण नोंदवले गेले आहे.
बहुतांश शेतकरी कापूस, ऊस, सोयाबीन आणि भाजीपाला या पारंपरिक पिकांपासून दूर जाऊन तुती लागवडीकडे वळत आहेत. मात्र, याआधीच्या जमिनीत वापरले गेलेले कीटकनाशक, बुरशीनाशक आणि तणनाशकांचे अंश जमिनीत शिल्लक राहिल्यास, त्याचा परिणाम तुतीच्या झाडांवर होतो आणि त्यामुळे रेशीम किटकांना विषबाधा होण्याची शक्यता असते.
त्यावर उपाय म्हणून प्रति हेक्टर २० टन कुजलेले शेणखत किंवा ५ टन गांडूळ खत दोन हप्त्यांमध्ये (जून आणि नोव्हेंबर महिन्यात) जमिनीत मिसळावे आणि त्यानंतर हलके पाणी द्यावे, असा सल्ला कृषी तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. असे केल्यास जमिनीत राहिलेल्या विषारी घटकांचा प्रभाव कमी होईल आणि रेशीम उत्पादन सुरळीत राहील.
पशुधनाची काळजी घ्या
राज्यातील वाढत्या उष्णतेचा परिणाम केवळ शेती आणि पशुपालनावरच नाही, तर सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरही होत आहे. अशा परिस्थितीत, उन्हाळ्यात उष्णतेपासून बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. डॉक्टरांनी भरपूर पाणी पिण्याचा आणि हलका आहार घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, उन्हाच्या तीव्रतेत काम करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. राज्यातील तापमान पुढील काही दिवसांत आणखी वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रशासन आणि नागरिकांनी वेळीच आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.