राज्याच्या 12 जिल्ह्यांतून जाणारा महामार्ग ! 136 गावांना होणार फटका ?
महाराष्ट्रातील पश्चिम भागात प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, प्रशासनाने त्याला अत्यावश्यक प्रकल्पांमध्ये समाविष्ट केले आहे. या महामार्गासाठी तीन संभाव्य प्रारूप आराखडे (अलाईनमेंट) तयार करण्यात आले आहेत. या महामार्गामुळे कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील १३६ गावांवर परिणाम होणार आहे. विशेष म्हणजे, या महामार्गाला प्रचंड विरोध असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याचाही यात समावेश आहे.
महामार्गाच्या पर्यावरणीय मंजुरीसाठी अहवाल
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) या महामार्गाच्या पर्यावरणीय मंजुरीसाठी नागपूरच्या पर्यावरण विभागाकडे सविस्तर ४८ पानी अहवाल सादर केला आहे. या अहवालामध्ये महामार्गाची विस्तृत माहिती प्रथमच समोर आली आहे.
बाधित होणाऱ्या गावांचा आढावा
शक्तिपीठ महामार्गाच्या पहिल्या टप्प्यात सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील एकूण १३४ गावे तसेच मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील २ गावे बाधित होतील.
सोलापूर जिल्ह्यातील प्रभावित गावे
- बार्शी तालुका – गौडगाव, रातजंन, मालेगाव, आंबाबाइचीवाडी, जवळगाव, हत्तीज इ.
- उत्तर सोलापूर तालुका – कौठाळी, कळमण, पडसाळी इ.
- मोहोळ तालुका – मसलेचौधरी, खुनेश्वर, भोयरे, हिंगणी (निपाणी) इ.
- पंढरपूर तालुका – पुळुज, फुलचिंचोली, विटे, खरसोळी इ.
- सांगोला तालुका – मतेवाडी, संगेवाडी, मांजरी, देवकतेवाडी इ.
महामार्गाची वैशिष्ट्ये
- पवनार ते पत्रादेवी या अंतरासाठी सहापदरी महामार्ग प्रस्तावित
- रेणुकादेवी, तुळजाभवानी आणि अंबाबाई शक्तिपीठांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग
- महामार्गावर दर ५० किमी अंतरावर हॉटेल्स, धाबे आणि चार्जिंग स्टेशनची सुविधा
- धार्मिक पर्यटन आणि उद्योगविकासाला चालना देण्याचे उद्दिष्ट
पहिल्या टप्प्यात लागणारी जमीन
- एकूण आवश्यक जमीन – ३७९० हेक्टर
- खासगी शेती जमीन – ३६१९.२२ हेक्टर
- वन विभागाची जमीन – १९.४४ हेक्टर
- सरकारी जमीन – १५२.०३ हेक्टर
महामार्गाच्या निर्मितीमुळे धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. तसेच, स्थानिक व्यवसाय आणि रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होऊ शकते. तथापि, प्रभावित होणाऱ्या गावांमध्ये याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.