अडीच लाख रुपयांची म्हैस पाहिलीय का ? गुजरातच्या म्हशीने रचला विक्रम ! पण दूध किती देते ?
उमदा घोडा असो किंवा दुभती गाय-म्हैस, त्यांच्या किंमती नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. काही पशुपालक आणि व्यापारी अशा दुर्मिळ आणि उच्च दर्जाच्या प्राण्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यास तयार असतात. शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पार पडलेल्या खंडेराव महाराज यात्रेत गीर जाफर जातीच्या एका म्हशीला तब्बल ₹ २.६ लाखांचा विक्रमी दर मिळाल्याने हा विषय चर्चेत आला आहे.
गुजरातच्या गीर जाफर म्हशीने रचला विक्रम
गुजरातमधील जुनागढ जिल्ह्यातील गीर जाफर जातीची ही म्हैस दिवसाला तब्बल २४-२५ लिटर दूध देते. या उच्च उत्पादन क्षमतेमुळेच ती २,६०,००० रुपयांना विकली गेली. बाजार समितीच्या अधिकाऱ्यांच्या मते, ही शिरपूर बाजार समितीत विकली गेलेली सर्वात महाग म्हैस आहे.
खंडेराव महाराज यात्रेत लाखोंची उलाढाल
शिरपूर येथे दरवर्षी खंडेराव महाराज यात्रेच्या निमित्ताने कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरांचा मोठा बाजार भरतो. १५ दिवस चालणाऱ्या या बाजारात लाखोंची उलाढाल होते.राज्यभरातून व्यापारी आणि शेतकरी आपली जनावरे विक्रीसाठी आणतात.यंदा व्यापारी अरुण बडगुजर यांनी जुनागढ येथून ही दुर्मिळ गीर जाफर म्हैस शिरपूरमध्ये विक्रीसाठी आणली होती.
ही अनोखी म्हैस पाहण्यासाठी शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.अखेर शेतकरी धनराज साळुंके यांनी तब्बल ₹ २.६ लाख मोजून ही म्हैस विकत घेतली.धनराज साळुंके हे आधीपासूनच मोठ्या प्रमाणावर पशुपालन करतात.त्यांच्या गाई-म्हशींची संख्या ७० वर पोहोचली असून, गीर जाफर म्हशीची दुध देण्याची क्षमता पाहून त्यांनी ही खरेदी केली.
गीर जाफर म्हशीची खासियत काय ?
दूध उत्पादन – ही म्हैस २४-२५ लिटर दूध सहज देते.
दूधाचा कालावधी – इतर जातींच्या म्हशींपेक्षा ही म्हैस १५-१६ महिने सलग दूध देऊ शकते.
ताकद आणि सहनशक्ती – गुजरात आणि राजस्थानच्या हवामानासाठी विशेषतः अनुकूल.
शेतकऱ्यांमध्ये लोकप्रियता – जाफ्राबादी म्हशींप्रमाणेच गीर जाफर म्हशींनाही दुधाच्या उच्च उत्पादन क्षमतेमुळे मोठी मागणी असते.
गावागावात वाढणारी दुग्ध व्यवसायाची मागणी
भारतातील ग्रामीण अर्थव्यवस्थेत शेतीसोबत पशुपालन हा प्रमुख घटक आहे. अनेक शेतकरी आता गाय-म्हैस पालन, शेळीपालन आणि पोल्ट्री व्यवसायाकडे वळत आहेत. विशेषतः गुजरातमध्ये आढळणाऱ्या जाफ्राबादी आणि गीर जाफर जातीच्या म्हशींना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
म्हशींच्या किंमतीत वाढ होणार ?
विशेष प्रजातींच्या गायी-म्हशींना उच्च किंमत मिळत असल्याने अनेक शेतकरी पारंपरिक शेतीऐवजी दुग्ध व्यवसायाकडे वळत आहेत.सध्या दुग्धजन्य पदार्थांना चांगली मागणी असल्याने पशुपालन क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत.