हवामान पुन्हा बदलले ; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता ! हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी
Havaman Andaj : भारतीय हवामान खात्याने बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज दिला होता. यानुसार राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन-चार दिवसांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागली.
अहिल्या नगर, नाशिक, पुणे जिल्ह्यातील काही भागांमध्ये पावसाने दणका दिलाय. या भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कांदा समवेत प्रमुख फळबाग पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला असून भारतीय हवामान खात्याने आज सुद्धा राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावणार असे म्हटले आहे.
आज राज्यातील फक्त मध्य महाराष्ट्र विभागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काल पर्यंत महाराष्ट्रात सर्व दूर पावसाळी वातावरण पाहायला मिळाले. पण आता राज्यातील बहुतांश भागांतून पावसाळी वातावरण निवळले आहे.
राज्यातील बहुतांशी भागांमधील ढगाळ हवामान आता कमी झाले आहे. राज्यात आता पुन्हा कोरडे वातावरण तयार होत आहे. मात्र असे असले तरी आज शुक्रवारी मध्य महाराष्ट्र विभागातील कोल्हापूर, सातारा, सांगली या तीन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात गेले तीन दिवस बहुतांश भागांत ढगाळ वातावरण होते. कोकणातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये, मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यातील धाराशिव लातूर या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाने हजेरी लावली.
या काळात थंडीचा जोर पूर्णपणे कमी होऊन उकाडा जाणवू लागला होता. मात्र आता 7 डिसेंबरपासून पुन्हा किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
9 डिसेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश भागांत शुष्क अन् कोरडे वातावरण राहणार आहे. तसेच उद्यापासून राज्यात थंडीची तीव्रता पुन्हा एकदा वाढणार असे दिसते.
एकंदरीत बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाचा प्रभाव आता दूर होणार आहे. राज्यातील हवामान आता पुन्हा एकदा पूर्व पदावर येणार आहे. यामुळे रब्बी हंगामातील शेती पिकांना उभारी मिळणार आहे.