हवामान अंदाज : आज आणि उद्या महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता !
Havaman Andaj : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये थंडीची लाट ओसरली आहे.
आता कुठे महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढत होता आणि थंडीचा जोर वाढत असतानाच राज्यात पुन्हा एकदा पावसाळी वातावरण तयार झाले असल्याने पुन्हा एकदा थंडी कमी झाली असून राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल आणि किमान तापमानात वाढ पाहायला मिळाले आहे.
भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर सदर जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन जाणकारांनी केले आहे.
खरंतर हा अवकाळी पाऊस रब्बी हंगामातील पिकांसाठी आणि फळबागांसाठी विशेष घातक ठरण्याची शक्यता आहे. कांदा पिकाला या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसू शकतो असे मत कृषी क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.
याशिवाय या अवकाळी पावसाचा द्राक्ष पिकांना देखील फटका बसण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने आज 4 डिसेंबर रोजी राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सिंधुदूर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
उद्या पाच डिसेंबरला राज्यातील कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदूर्ग, मध्य महाराष्ट्र विभागातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाडा विभागातील लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय.
शुक्रवारी आणि शनिवारी देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. राज्यात शनिवार पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असे आयएमडीने यावेळी स्पष्ट केले आहे.
खरे तर सध्या रब्बी हंगामातील पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. फळबागादेखील फारच महत्त्वाच्या स्टेजवर आहेत. विशेषतः द्राक्ष फळबाग आणि डाळिंब फळबागा महत्त्वाच्या स्टेजला असून या अशा परिस्थितीत जर पाऊस झाला तर या बागांचे नुकसान होणार आहे.