दूध उत्पादन कमी झालंय? जनावरांना ‘या’ आजाराचा धोका !
गायी आणि म्हशींसाठी दूध उत्पादन हा त्यांच्या आरोग्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. मात्र, अनेक वेळा पशुपालकांना जनावरांच्या दुधात अचानक घट झाल्याचे दिसून येते, तर काही वेळा दूध येणेच बंद होते. यामागे विविध कारणे असू शकतात, पण कासदाह (Mastitis) हा एक महत्त्वाचा आजार आहे, जो दुधाळ जनावरांना प्रभावित करतो.
कासदाह म्हणजे नेमके काय? कासदाह हा गायी आणि म्हशींच्या कासेला येणारा संसर्गजन्य आजार असून, वैज्ञानिक भाषेत मस्टायटीस (Mastitis) म्हणून ओळखला जातो. या आजारात कासेला सूज येते, दगडासारखी टणक होते आणि जनावराच्या दुधाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटते. हा संसर्ग दीर्घकाळ टिकल्यास दूध उत्पादन पूर्णपणे थांबू शकते, त्यामुळे वेळेत खबरदारी घेणे गरजेचे आहे.
दूध काढण्याच्या प्रक्रियेत स्वच्छता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हात नीट न धुता दूध काढल्यास किंवा स्वच्छतेच्या अभावामुळे जंतू कासेच्या आत प्रवेश करू शकतात, ज्यामुळे कासदाह होतो. त्यामुळे दूध काढण्याआधी हात स्वच्छ धुणे, कास आणि सड कोमट पाण्याने स्वच्छ धुऊन निर्जंतुक करणे आणि दूध काढण्यासाठी स्वच्छ साधनांचा वापर करणे गरजेचे आहे.
मिल्किंग मशीन वापरताना योग्य प्रकारे हाताळणी करणेही तितकेच आवश्यक आहे. मशीनमधील व्हॅक्यूममध्ये अडथळा आल्यास, कप ग्रीप चुकीचा बसल्यास किंवा जनावर तणावग्रस्त असल्यास दूध काढण्याची प्रक्रिया अनियमित होते. परिणामी, कासदाह होण्याचा धोका वाढतो. विशेषतः मागील दोन सडांमधून साधारण 60% दूध निघत असल्याने, दूध काढताना समोरील दोन सडांचे दूध आधी निघते आणि मागील सडांना अधिक वेळ लागतो. त्यामुळे मागच्या सडांमध्ये दूध शिल्लक राहू शकते, मात्र त्यामुळे कासदाह वाढतो असे मानले जात नाही.
जनावरांना कासदाह होऊ नये म्हणून एक महत्त्वाचा नियम म्हणजे संक्रमित गाई किंवा म्हशीचे दूध शेवटी काढणे. जर संक्रमित गाईचे दूध आधी काढले आणि त्याच मशीनचा वापर इतर जनावरांसाठी केला, तर हा संसर्ग सहजपणे पसरू शकतो. परिणामी, सहा ते आठ गाईंमध्ये कासदाह होण्याची शक्यता वाढते.
जर गायी किंवा म्हशीला कासदाहची लक्षणे जाणवत असतील, म्हणजेच कासेला सूज आली असेल किंवा कास टणक वाटत असेल, तर त्वरित पशुवैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. योग्य वेळी उपचार न केल्यास हा आजार वाढू शकतो आणि इतर जनावरांनाही बाधित करू शकतो.
दुधाळ जनावरांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी स्वच्छता आणि दूध काढण्याच्या पद्धतींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कासदाह झाल्यास वेळेत निदान आणि उपचार न केल्यास पशुपालकांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे स्वच्छतेच्या सर्व नियमांचे पालन करून आणि वेळोवेळी जनावरांची तपासणी करून या आजारापासून संरक्षण करणे शक्य आहे.