Hapus Mango : यंदा हापूस खायला मिळणार की नाही ? आंबा उत्पादनावर मोठे संकट!
Hapus Mango : रत्नागिरी जिल्ह्याचा प्रमुख ओळख असलेला हापूस आंबा यावर्षी नैसर्गिक संकटाच्या विळख्यात अडकला आहे. बदलत्या हवामानामुळे आंबा उत्पादन जेमतेम २५ ते ३० टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहील, असा अंदाज बागायतदारांनी व्यक्त केला आहे. कमी उत्पादनामुळे आंब्याच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबई बाजारात सिंधुदुर्ग हापूसचे वर्चस्व
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच आंब्याची विक्री सुरू झाली असली, तरी प्रमाण अत्यल्प आहे. मुंबई बाजारपेठेत सध्या देवगड हापूसचे वर्चस्व दिसत आहे. सध्या हापूस आंब्याच्या पेटीला १० ते १२ हजार रुपये दर मिळत आहे. मात्र, उत्पादन कमी असल्याने आगामी महिन्यांत हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
हवामान बदलामुळे मोहर प्रक्रियेला फटका
बागायतदारांच्या मते, यंदा पावसाळा उशिरा संपल्यामुळे आणि थंडी लांबल्याामुळे आंब्याच्या मोहर प्रक्रियेला मोठा फटका बसला.
डिसेंबरपासून थंडी सुरू झाल्याने मोहर भरपूर आला, पण तो पूर्ण विकसित होण्याआधीच करपून गळून पडला.
झाडावर फार कमी प्रमाणात फळधारणा झाली.
वाढत्या तापमानामुळे लहान फळांची गळ अधिक वाढण्याची भीती आहे.
आंबा मिळणार नाही?
आंबा निर्यात आणि प्रक्रिया उद्योगासाठी (कॅनिंगसाठी) मोठ्या प्रमाणावर कच्च्या आंब्याची आवश्यकता असते. मात्र, यावर्षी उत्पादन घटल्यामुळे कॅनिंगसाठी आंब्याचा पुरवठा अपुरा राहणार आहे.
यावर्षी हापूस आंब्याच्या तुटवड्यामुळे त्याची किंमत प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. कमी उत्पादनामुळे स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारातही हापूस आंब्याची मागणी पूर्ण करणे कठीण जाणार आहे. त्यामुळे हापूस खाण्यासाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागू शकतात, तर बागायतदारांना त्यांच्या अपेक्षित उत्पादनाअभावी मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.