Grape Farming: द्राक्ष शेतीतून एकरी 10 लाख नफा! शेतीने दिली समृद्धी…2.5 एकरा पासून केला 25 एकरपर्यंत शेतीचा विस्तार
Farmer Success Story sangli:- द्राक्ष हे अत्यंत मेहनती आणि जिकिरीचे पीक मानले जाते. बदलते हवामान आणि वाढत्या कीड रोगांमुळे द्राक्ष उत्पादनात घट होत असताना, सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील येळावी गावातील पिसाळ कुटुंबाने मात्र तब्बल 22 एकर द्राक्षबाग यशस्वीपणे जोपासली आहे. अत्यंत कष्ट आणि निष्ठेने उच्चांकी आणि निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करणाऱ्या पिसाळ कुटुंबाची यशोगाथा प्रेरणादायी आहे.
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुका द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. येळावी गावचे रहिवासी असलेल्या पिसाळ कुटुंबाचा शेती हा परंपरागत व्यवसाय आहे. गेल्या 40 वर्षांपासून ते द्राक्ष शेतीत कार्यरत आहेत. महादेव, शंकर आणि लक्ष्मण या पिसाळ बंधूंकडे केवळ अडीच एकर वडिलोपार्जित शेतजमीन होती. 1985 साली त्यांनी पहिल्यांदा माणिकचमन या द्राक्ष वाणाची लागवड करून प्रयोग केला. पहिल्याच वर्षी चांगले उत्पन्न मिळाल्याने त्यांना द्राक्ष शेतीची आवड निर्माण झाली. त्यानंतर अनेक चढ-उतारांना सामोरे जात त्यांनी आपल्या कुटुंबाच्या एकजुटीच्या बळावर द्राक्ष शेतीत उल्लेखनीय प्रगती केली.
द्राक्ष शेतीतून मिळणाऱ्या नफ्याचा उपयोग
द्राक्ष शेतीतून मिळणाऱ्या नफ्याचा सुयोग्य वापर करत त्यांनी टप्प्याटप्प्याने शेतजमीन खरेदी केली. अत्यंत मेहनतीने आणि नियोजनबद्ध व्यवस्थापनाच्या जोरावर त्यांनी अडीच एकर शेतीचा विस्तार 25 एकरांपर्यंत वाढवला. शेतीला आवश्यक असणाऱ्या पाणी व्यवस्थापनासाठी येरळा नदीवरून पाईपलाईन टाकून चार विहिरी आणि चार कूपनलिकांद्वारे सिंचन यंत्रणा उभारली.
शंकर पिसाळ यांनी बी.एससी. केमिस्ट्रीचे शिक्षण घेतले होते. त्यांना कृषी अधिकारी म्हणून कारखान्यात नोकरीची संधी मिळाली होती, मात्र नोकरीपेक्षा शेतीची आवड अधिक असल्याने त्यांनी राजीनामा देत आपले ज्ञान शेतीच्या विकासासाठी वापरण्याचा निर्णय घेतला. कुटुंबातील सदस्यही शेतीत सक्रिय सहभाग घेतात आणि शिक्षणासोबतच शेतीतूनही आर्थिक समृद्धी साधली आहे.
सेंद्रिय खतांचा प्रभावी वापर फायद्याचा
पिसाळ कुटुंब सेंद्रिय खतांचा प्रभावी वापर करते. छाटणीपूर्वी एकरी चार ते पाच ट्रॉली शेणखत वापरतात. बेसल डोससाठी 10:26:26, सुपर फॉस्फेट, एस.ओ.पी., आणि गंधक या मोजक्या रासायनिक खतांचा उपयोग केला जातो. यासोबतच नीम पेंड, मासळी पावडर यांसारखी सेंद्रिय खते मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. द्राक्षाच्या उत्पादनासाठी पाण्याचे नियोजन, खत व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य समन्वय साधत त्यांनी उत्पादनात सातत्य टिकवले आहे.
पिसाळ बंधूंनी शेतामध्ये वेगवेगळ्या द्राक्ष वाणांची लागवड केली आहे. त्यामध्ये पाच एकर शरद, तीन एकर माणिकचमन, साडेपाच एकर अनुष्का आणि पाच एकर एस.एस.एन. यांसारख्या वाणांचा समावेश आहे. अभ्यास आणि अनुभवाच्या जोरावर त्यांनी प्रत्येक वाणापासून उच्च उत्पादन मिळवले आहे.
अकरा वर्षापासून द्राक्षांची निर्यात
गेल्या अकरा वर्षांपासून त्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी द्राक्ष निर्यात करण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः अनुष्का आणि एस.एस.एन. या वाणांना परदेशात मोठी मागणी आहे. उत्कृष्ट रंग, चव आणि आकार असलेली दर्जेदार द्राक्ष उत्पादित करून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.
व्यापारी शेतावर येऊनच द्राक्ष खरेदी करतात, त्यामुळे उत्पादनाला बाजारपेठेची विशेष अडचण भासत नाही. एका एकर द्राक्ष शेतीसाठी त्यांना तीन ते साडेतीन लाख रुपये खर्च येतो, तर खर्च वजा जाता एकरी जवळपास 10 लाख रुपयांचा नफा मिळतो. शंकर पिसाळ आपल्या कुटुंबासह द्राक्षबागेचे व्यवस्थापन करतात आणि खत व्यवस्थापन व कीड नियंत्रणासाठी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेतात.
पिसाळ कुटुंबाने मेहनत, एकजूट आणि सातत्याच्या जोरावर द्राक्ष शेतीत मोठे यश संपादन केले आहे. त्यांनी सेंद्रिय खतांचा प्रभावी वापर करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी दर्जेदार द्राक्ष उत्पादित करण्याचा दिर्घकालीन यशस्वी प्रयोग केला आहे. त्यांच्या अथक मेहनतीच्या जोरावर द्राक्ष शेतीत त्यांनी नवा आदर्श घालून दिला आहे.