Love Marriage साठी सरकार करणार मदत ! प्रेम विवाह करणाऱ्यांसाठी मोठा निर्णय....
मुंबई: आंतरजातीय आणि आंतरधर्मीय प्रेम विवाह करणाऱ्या जोडप्यांना अनेकदा सामाजिक, कौटुंबिक विरोधाला सामोरे जावे लागते. काही वेळा यामध्ये ‘ऑनर किलिंग’ सारख्या क्रूर घटनाही घडतात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून, राज्यभर ‘सेफ हाऊस’ (सुरक्षित निवास) उभारण्याचे आदेश दिले आहेत. गृह मंत्रालयाने सर्व पोलीस आयुक्तालये आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयांना ही सुरक्षित निवासस्थाने लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
‘ऑनर किलिंग’च्या वाढत्या घटनांवर सरकारचे कठोर पाऊल
मागील काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, सातारा, लातूर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये चार ऑनर किलिंगच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये कुटुंबीयांनीच प्रेम विवाह केलेल्या आपल्या मुलगा किंवा मुलीची हत्या केली आहे. अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ‘सेफ हाऊस’ संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रेम विवाह करणाऱ्या जोडप्यांना मिळणार विशेष सुरक्षा
आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या नवविवाहित जोडप्यांना त्यांच्या कुटुंबीय किंवा समाजाकडून धोका असल्यास, त्यांना तात्पुरते ‘सेफ हाऊस’ मध्ये ठेवले जाणार आहे. या सेफ हाऊसेसमध्ये २४ तास सशस्त्र पोलिसांचा कडक बंदोबस्त असेल, जेणेकरून त्यांना कोणताही धोका पोहोचणार नाही.
- या निवासस्थानी राहण्यासाठी नाममात्र शुल्क असेल.
- जोडप्यांना एक महिन्यापासून ते एक वर्षापर्यंत येथे निवासाची परवानगी मिळेल.
- प्रत्येक जिल्ह्यात एक सेफ हाऊस उभारण्यात येणार आहे.
- पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांवर या सेफ हाऊसची जबाबदारी असेल.
राज्यभरात ‘सेफ हाऊस’ उभारणीची प्रक्रिया सुरू
राज्याच्या गृह मंत्रालयाने सर्व पोलीस आयुक्तालये आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयांना ही सुरक्षित निवासस्थाने उभारण्याचे आदेश दिले आहेत. लवकरच या योजनेची अंमलबजावणी सुरू होईल. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे प्रेम विवाह करणाऱ्या जोडप्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि ‘ऑनर किलिंग’सारख्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यास मदत होणार आहे.
महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. अनेकदा प्रेम विवाह करणाऱ्या जोडप्यांना आपल्या कुटुंबीयांकडून प्रचंड विरोधाला सामोरे जावे लागते. कधी कधी हा विरोध इतका टोकाचा जातो की, ऑनर किलिंगसारख्या घटना घडतात. अशा परिस्थितीत सेफ हाऊस ही संकल्पना त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठे पाऊल आहे. यामुळे नवविवाहित जोडप्यांना नवा आशेचा किरण मिळेल आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी मदत होईल.