तुर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा! तूर खरेदीची नोंदणी आजपासून सुरू; पणनमंत्र्यांनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती
Tur Procurement Center:- गेल्या दोन महिन्यापासून तुरीच्या दरात कमालीची घसरण झाली असून आज राज्यातील बऱ्याच बाजारपेठेमध्ये हमीभावापेक्षा देखील कमी दराने तूर खरेदी करण्यात येत आहे.सध्या बाजारपेठेत तुरीला साडेसहा ते सात हजारापर्यंत दर मिळताना दिसून येत आहे व केंद्र शासनाच्या माध्यमातून तुरीसाठी साधारणपणे 7500 रुपयाच्या आसपास दर जाहीर करण्यात आलेला आहे व त्या दराच्या खाली सध्या तुरीची खरेदी सुरू आहे.
त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांकडून मागणी करण्यात येत होती की,शासनाने तुरीची खरेदी सुरू करावी व त्यासंबंधीचा एक महत्त्वाचे अपडेट समोर आले असून तुरीची खरेदी करण्यासाठीची नोंदणी प्रक्रिया आजपासून म्हणजे 24 जानेवारी 2025 पासून सुरू करण्यात येणार आहे. यासंबंधी नुकतीच सह्याद्री अतिथिगृहात तूर खरेदी करण्यासंदर्भात आढावा बैठक पार पडली.
शासकीय तूर खरेदीसाठीची नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू होणार
राज्यातील शेतकऱ्यांकडून तुर खरेदी करण्यासाठीच्या नोंदणी प्रक्रियेला आजपासून सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच तूर खरेदी केल्यानंतर साधारण दोन ते तीन दिवसाच्या आत शेतकऱ्यांचे पैसे मिळवण्यासाठीची आवश्यक प्रक्रिया ताबडतोब पूर्ण करावी
व नोंदणी प्रक्रियेमध्ये काही प्रकारची तांत्रिक अडचण येणार नाही याची काळजी घ्यावी असे स्पष्ट निर्देश राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत.
राज्यामध्ये जवळपास 300 केंद्रांवर हमीभावाने तीन लाख मॅट्रिक टन तुर खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. ही तुरीची खरेदीची प्रक्रिया नाफेडच्या माध्यमातून महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन तसेच विदर्भ मार्केटिंग फेडरेशन या दोन संस्थांच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे.
पणनमंत्री जयकुमार रावल यांनी काय म्हटले?
याबाबत राज्याचे पणनमंत्री श्री. जयकुमार रावल यांनी म्हटले की, राज्यात सुरुवातीला तीनशे खरेदी केंद्रांवर तूर खरेदी करण्यात येणार आहे व शेतकऱ्यांना कुठल्याही समस्येशिवाय तूर खरेदी नोंदणीची तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यामध्ये तांत्रिक अडचण येणार नाही याची काळजी यंत्रणेने घ्यावी
तसेच वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशनने खरेदी प्रक्रियेतील जे काही काम आहे ते जलदगतीने पूर्ण करून शेतकऱ्यांना पेमेंट जमा करण्यात अडचण येणार नाही याची देखील काळजी घ्यावी या सगळ्या कामांना जर जास्तीचे मनुष्यबळ लागेल तर त्याची व्यवस्था देखील करावी असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
इतकेच नाहीतर खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना पाण्याची तसेच बसण्याची व्यवस्था, तक्रार निवारण केंद्राची सुविधा देखील उपलब्ध करावी व शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या गैरसोयीला तोंड द्यावे लागणार नाही याची कटाक्षाने खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी सर्व आवश्यक त्या बाबींचे नियंत्रण करून तक्रारींचे निवारण करावे व तूर खरेदीच्या दृष्टीने वेअर हाऊसचे नियोजन व्यवस्था तयार ठेवून आवश्यक त्या निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी.
इतकेच नाहीतर खरेदी केंद्रावर डेटा एन्ट्री व्यवस्था शेतकऱ्यांच्या प्रतिसादा नुसार आवश्यक प्रमाणात ठेवण्यात यावी व शेतकऱ्यांनी डेटा एन्ट्री केल्यानंतर पुढच्या ७२ तासात नाफेड मार्फत नियमानुसार शेतकऱ्यांना पैसे प्राप्त होतील याची काळजी घेण्याचे देखील स्पष्ट निर्देश पणनमंत्री श्री. रावल यांनी दिले आहेत.