Gold Market Update: गुंतवणूकदारांनो सावधान! ट्रम्प यांच्या निर्णयाने सोन्याचा खेळ बदलला… गुंतवणूकदारांची उडाली झोप, पुढे काय?
Gold Market:- डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने घेतलेल्या एका मोठ्या निर्णयामुळे जागतिक सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी 1 फेब्रुवारी 2025 पासून कॅनडा आणि मेक्सिकोतून येणाऱ्या मालावर 25% टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. या टॅरिफमध्ये सोन्याचाही समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अमेरिकेतील बँका, गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांनी संभाव्य कर वाढीच्या भीतीने आधीच मोठ्या प्रमाणावर सोन्याचा साठा करायला सुरुवात केली आहे.
परिणामी, न्यूयॉर्कच्या तिजोऱ्यांमध्ये सोनं मोठ्या प्रमाणावर जमा होत असून, वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालानुसार डिसेंबर 2023 पासून आतापर्यंत जवळपास 600 टन (सुमारे 2 कोटी औंस) सोनं साठवण्यात आलं आहे. हे प्रमाण इतकं जास्त आहे की न्यूयॉर्कमध्ये याआधी कधीही इतकं मोठ्या प्रमाणात सोनं ठेवले गेले नव्हते. मात्र, ट्रम्प प्रशासनाच्या संभाव्य धोरणामुळे व्यापाऱ्यांनी याआधीच मोठी गुंतवणूक करून आपली सुरक्षा सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याची स्थिती
येत्या काळात फक्त कॅनडा आणि मेक्सिकोच नव्हे, तर ब्रिटन आणि स्वित्झर्लंडसारख्या देशांतून येणाऱ्या सोन्यावरही कर लागू होण्याची शक्यता आहे. हे दोन्ही देश जागतिक सोन्याच्या व्यापारात मोठी भूमिका बजावतात आणि मोठ्या प्रमाणावर अमेरिका आणि इतर देशांना सोनं पुरवतात. सध्या कॅनडा, स्वित्झर्लंड, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका आणि कोलंबियामधून अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर सोनं आयात केलं जात आहे.
मात्र, ट्रम्प यांच्या धोरणांमुळे अमेरिकेतील सोन्याच्या किमती इतर देशांच्या तुलनेत वेगाने वाढत आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांना अमेरिकेत सोनं विकण्यात जास्त फायदा मिळतो आहे. परिणामी, लंडनच्या खाजगी तिजोरीतून व्यापारी मोठ्या प्रमाणावर सोनं काढून न्यूयॉर्कला पाठवत आहेत, ज्यामुळे लंडनमधील सोन्याचा साठा सतत घटत आहे. जानेवारी 2025 मध्ये लंडनच्या सोन्याच्या साठ्यात सलग तिसऱ्यांदा घट झाल्याचे दिसून आले आहे.
अमेरिकेत प्रामुख्याने 1 किलो वजनाच्या गोल्ड बारची मागणी असते, तर लंडनमध्ये 400 औंस वजनाचे बार प्रचलित आहेत. हे बार मुख्यतः चीन, दक्षिण-पूर्व आशिया, मध्य-पूर्व आणि भारतातील रिफायनरींमध्ये तयार केले जातात. मात्र, अमेरिकेतील वाढत्या मागणीमुळे आता जगभरातील रिफायनरींवर 400 औंस बारचे 1 किलोच्या बारमध्ये रूपांतर करण्याचा दबाव वाढला आहे, जेणेकरून त्यांची अमेरिकेत सहज निर्यात करता येईल. याचा जागतिक सोन्याच्या पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला असून, व्यापारातील संतुलन बिघडले आहे. अनेक व्यापारी आणि गुंतवणूकदार अस्थिरतेच्या भीतीमुळे जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी करत आहेत.
स्वित्झरलँडमधून अमेरिकेला सगळ्यात मोठी निर्यात
स्वित्झर्लंडमधून जानेवारी महिन्यात अमेरिकेत गेल्या 13 वर्षांतील सर्वाधिक सोन्याची निर्यात झाली आहे. सिंगापूरनेही मोठ्या प्रमाणावर अमेरिकेला सोनं पुरवलं आहे. यावरून स्पष्ट होते की, अमेरिकेच्या वाढत्या मागणीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मोठा बदल घडत आहे. या बदलांमुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होत आहे.
जर ट्रम्प प्रशासनाने अचानक सर्व देशांतून आयात होणाऱ्या सोन्यावर 100% टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला, तर अमेरिकेतील सोन्याच्या किमतींवर फारसा परिणाम होणार नाही, कारण तिथे आधीच मोठ्या प्रमाणावर साठा उपलब्ध आहे. मात्र, बाकीच्या जागतिक बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्थिरता निर्माण होईल. जागतिक सोन्याच्या किमतींवर आणि डिलिव्हरी प्रक्रियेस मोठा फटका बसेल, अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
अमेरिकेत विक्रमी प्रमाणात वाढलेल्या मागणीमुळे लंडन, स्वित्झर्लंड, सिंगापूर आणि इतर देशांमधून सोन्याची मोठ्या प्रमाणावर आयात होत आहे. मात्र, ट्रम्प प्रशासनाच्या टॅरिफ धोरणाच्या भीतीमुळे जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता वाढली आहे. व्यापारी आणि गुंतवणूकदारांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली असून, भविष्यातील किमती आणि व्यापाराचे स्वरूप कसे राहील, याविषयी संभ्रम आहे. जर ट्रम्प यांनी आणखी कठोर टॅरिफ लावले, तर जागतिक बाजारातील सोन्याच्या किमतींवर दीर्घकालीन परिणाम दिसून येतील. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मोठे उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.