Gold International Market: भारतात सोनं महाग! दुबईहून स्वस्त सोन कसे आणाल? वाचा संपूर्ण माहिती
Gold Rate In Dubai:- भारतामध्ये सोनं ही केवळ एक मौल्यवान धातू नसून, ती गुंतवणूक आणि सांस्कृतिक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे अनेक भारतीय प्रवासी परदेशात विशेषतः दुबई आणि आखाती देशांमध्ये स्वस्त सोनं खरेदी करून भारतात आणण्याचा प्रयत्न करतात. मात्र, सरकारने यावर काही विशिष्ट मर्यादा आणि कर प्रणाली लागू केली आहे.
दुबई किंवा इतर देशातून किती सोने आणता येते?
भारतीय नागरिकांना परदेशातून सोनं आयात करण्यास परवानगी आहे, पण त्यासाठी ठराविक मर्यादा निश्चित केल्या आहेत. कोणताही पुरुष प्रवासी भारतात 20 ग्रॅमपर्यंत (सुमारे 2 तोळे) तर महिला प्रवासी 40 ग्रॅमपर्यंत (सुमारे 4 तोळे) शुल्कमुक्त सोनं आणू शकतात. मात्र, या सोन्याच्या एकूण मूल्याची मर्यादा अनुक्रमे 50,000 रुपये आणि 100,000 रुपये आहे. जर प्रवासी यापेक्षा अधिक प्रमाणात सोनं घेऊन येत असेल, तर त्याला भारतात प्रवेश करताना सीमा शुल्क विभागाला त्याची माहिती द्यावी लागते. जर सोनं या मर्यादेपेक्षा अधिक असेल, तर त्यावर अतिरिक्त सीमा शुल्क लागू होतो.
लागणारे सीमा शुल्क आणि इतर कर
सीमा शुल्क आणि कर प्रणालीबाबत बोलायचे झाल्यास, भारत सरकारने परदेशातून आयात केलेल्या अतिरिक्त सोन्यावर 12.5% आयात शुल्क लावले आहे. त्यासोबतच, 3% सामाजिक कल्याण अधिभार आणि 10% कृषी इन्फ्रास्ट्रक्चर आणि विकास सेस (AIDC) लागू होतो, त्यामुळे एकूण आयात शुल्क सुमारे 14.07% होते. याशिवाय, 3% वस्तू आणि सेवा कर (GST) देखील द्यावा लागतो. जर कोणी ठरवलेली मर्यादा ओलांडून अधिक प्रमाणात सोनं आणत असेल, तर त्याला हा पूर्ण आयात कर भरावा लागतो. यामध्ये फक्त दागिन्यांच्या स्वरूपात सोनं आणण्याची परवानगी आहे, मात्र सोन्याच्या नाणी किंवा बिस्किट्स आणण्यासाठी वेगळे नियम लागू आहेत, आणि त्यावर अधिक कर आकारला जातो.
भारत सरकारच्या नियमानुसार, 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना 40 ग्रॅमपर्यंत शुल्कमुक्त सोनं आणण्याची सूट आहे, परंतु त्यासाठी त्यांना त्यांच्या पालकांसोबत प्रवास करत असल्याचे किंवा नातं सिद्ध करणारे आवश्यक दस्तऐवज सादर करावे लागतात. हा नियम मुख्यतः कुटुंबांसाठी सुलभता देण्यासाठी करण्यात आला आहे.
दुबई आणि इतर आखाती देशांमध्ये सोने स्वस्त का?
दुबई किंवा आखाती देशांमध्ये सोनं तुलनेने स्वस्त असतं कारण तेथे सरकार सोन्यावर कोणताही कर आकारत नाही. भारतात मात्र सोन्यावर आयात शुल्क, जीएसटी आणि अन्य कर लागत असल्यामुळे सोन्याची किंमत वाढते. त्यामुळे अनेक भारतीय प्रवासी दुबईतून सोनं खरेदी करून भारतात आणण्याचा प्रयत्न करतात.
काही प्रवासी तर ठरवलेल्या मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात सोनं आणण्याचा प्रयत्न करतात, आणि त्यामुळे सोन्याची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचं पाहायला मिळतं. भारतात मोठ्या प्रमाणात सोनं तस्करी होते, आणि तस्करीच्या प्रमुख मार्गांमध्ये दुबई, म्यानमार आणि काही अफ्रिकन देशांचा समावेश आहे. विशेषतः, दुबईवरून भारतात सर्वाधिक सोनं आयात केलं जातं.
गुन्हेगारी जगतात सोन्याच्या तस्करीचा जुना इतिहास आहे. पूर्वी हाजी मस्तान, दाऊद इब्राहिम यांसारखे अंडरवर्ल्ड गुन्हेगार मोठ्या प्रमाणात सोनं तस्करी करत असत. आजही तस्करीचे अनेक मार्ग विकसित झाले आहेत, आणि अनेक आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तस्करी केली जाते.
डीआरआय (Directorate of Revenue Intelligence) च्या अहवालानुसार, दरवर्षी सोन्याच्या तस्करीतून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर व्यवहार होतात, आणि यापैकी फक्त 10% सोनंच पकडलं जातं. 2023-24 मध्ये केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क विभागाने (CBIC) 4,869 किलो तस्करी केलेलं सोनं जप्त केलं होतं. महाराष्ट्र, केरळ आणि तामिळनाडू ही तस्करीसाठी हाय अलर्ट राज्यं मानली जातात, कारण येथे सर्वाधिक प्रमाणात सोनं जप्त केलं जातं. जवळपास 60% तस्करीचे खटले याच राज्यांमध्ये दाखल होतात.
सीबीआयसीचे प्रमुख संजय अग्रवाल यांनी सांगितले आहे की, भारत सरकारने सोन्याच्या आयात शुल्कामध्ये कपात करून ते 15% वरून 6% पर्यंत आणल्याने तस्करीचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. तरीही, अनेक तस्कर विविध मार्गांनी अधिक नफा मिळवण्यासाठी तस्करी करताना आढळतात. जर कोणाला मोठ्या प्रमाणात सीमा शुल्क टाळून जास्त प्रमाणात सोनं आणताना पकडलं गेलं, तर त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाते. अशा गुन्ह्यांत दोषी आढळल्यास, 5 लाख रुपयांपर्यंत दंड, जन्मठेपेची शिक्षा आणि परदेशी प्रवासावर आजीवन बंदी घालण्याची शक्यता असते.
सोन्याच्या तस्करीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारच्या उपाययोजना
सरकारकडून सोन्याच्या तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. विमानतळांवरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जात आहे आणि तस्करीविरोधी पथक अधिक सतर्क ठेवण्यात आले आहे. सोन्याच्या आयातीवर आणि विक्रीवर सरकार सातत्याने नव्या धोरणांवर विचार करत आहे, जेणेकरून तस्करी रोखली जाऊन अधिकृत मार्गाने सोनं आयात करता येईल. त्यामुळेच प्रवाशांनी परदेशातून सोनं आणताना सरकारच्या नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.