Goat Rearing Tips:- शेळ्यांची विक्री करण्यापूर्वी ‘या’ लपलेल्या गोष्टी समजून घ्या! फायदा 10 पट वाढेल.. कमी दिवसात व्हाल श्रीमंत
Shelipalan:- शेळीपालन हा भारतातील एक जुना आणि फायदेशीर व्यवसाय असून, त्यात शेतकरी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. योग्य नियोजन आणि बाजारातील मागणी लक्षात घेऊन शेळीपालन केल्यास मोठा नफा कमावता येतो. मात्र, शेळ्या विक्रीसाठी घेऊन जाताना काही महत्त्वाच्या बाबींची काळजी घेतली नाही, तर अपेक्षित दर मिळू शकत नाही आणि नुकसान होण्याची शक्यता वाढते.
बाजारातील मागणी कधी आणि कशी असते?
शेळीपालन व्यवसायात नफा हा प्रामुख्याने शेळ्या आणि बोकडांच्या विक्रीवर अवलंबून असतो. बाजारात संपूर्ण वर्षभर शेळ्या आणि बोकडांना मागणी असली तरी काही विशिष्ट कालखंडात ती जास्त असते. बकरी ईद, होळी, आषाढी अमावस्या, लग्नसराई, गाव जत्रा यांसारख्या सण-उत्सवांमध्ये बोकडांना विशेष मागणी असते आणि त्या वेळी चांगला दर मिळतो.
मार्च-एप्रिल महिन्यात बाजारात मोठ्या प्रमाणावर नर विक्रीसाठी येतात, त्यामुळे त्याआधीच नियोजन करून बोकड मोठ्या आणि सशक्त करण्याची गरज असते. यासाठी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात शेळ्यांचे माज नियोजन करणे आवश्यक असते, ज्यामुळे योग्य वेळी करडे जन्मास येऊन मोठे होतील आणि विक्रीसाठी उपलब्ध होतील.
शेळ्या बाजारात नेताना घ्यावयाची काळजी
शेळ्या विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी त्यांची योग्य काळजी घेतली गेली पाहिजे. त्यांची तब्येत चांगली असल्यास त्यांना अधिक दर मिळतो. बाजारात नेताना पुढील गोष्टींची विशेष काळजी घ्यावी:
शेळ्या निरोगी आणि सशक्त असाव्यात
शेळ्या दिसायला अशक्त नसाव्यात. त्या तंदुरुस्त आणि चपळ असल्यास बाजारात चांगला दर मिळण्याची शक्यता जास्त असते.
शेळ्यांच्या अंगावर जखमा नसाव्यात
बाजारात विक्रीसाठी नेण्यापूर्वी शेळ्यांच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा, गोचिड, उवा किंवा त्वचारोगांचा संसर्ग नाही याची खात्री करावी. अशा समस्या असल्यास त्यावर योग्य उपचार करूनच विक्रीसाठी न्यावे.
योग्य आहार द्यावा
बाजारात जाण्याच्या काही दिवस आधीपासून शेळ्यांना पोषक आहार, हिरवा चारा आणि पुरेसे पाणी द्यावे. यामुळे त्या सशक्त आणि तंदुरुस्त राहतील.
वाहतूक करताना काळजी घ्या
शेळ्या ट्रक, टेम्पो किंवा रेल्वेच्या डब्यात नेताना त्यांच्या वजनानुसार जागेची व्यवस्था असावी. साधारणपणे २५ किलोपर्यंतच्या शेळीसाठी – २ चौ. फुट जागा, २६ ते ३५ किलो वजनाच्या शेळीसाठी – २.५ चौ. फुट जागा, ३५ किलोपेक्षा अधिक वजनाच्या किंवा गाभण शेळीसाठी – ३ चौ. फुट जागा आवश्यक आहे.
रोगी शेळ्यांपासून दूर ठेवा
बाजारात इतर व्यापाऱ्यांच्या रोगट शेळ्या आपल्या शेळ्यांच्या संपर्कात आल्यास संसर्ग पसरू शकतो. त्यामुळे अशा शेळ्यांपासून दूर राहणे आवश्यक आहे.
शेळ्यांना चारा आणि पाणी द्या
शेळ्या बाजारात पोहोचल्यानंतर त्यांना चारा आणि पाणी द्यावे, जेणेकरून त्या थकलेल्या आणि अशक्त दिसणार नाहीत. त्यामुळे ग्राहक त्यांना जास्त पसंती देतील.
शेळ्यांच्या विक्रीसाठी योग्य व्यवहार कसा करावा?
बाजारात शेळ्या विकताना योग्य व्यवहार करणे महत्त्वाचे असते. योग्य सौदेबाजी केल्यास चांगला नफा मिळतो.
गिऱ्हाईकांशी हसतमुख राहा
व्यापार करताना गिऱ्हाईकांशी चांगले वर्तन करा, त्यांच्या गरजा समजून घ्या. गरज असल्यास सौदेबाजी करा, पण रागाने वागू नका.
वजनानुसार विक्री करा
शेळ्यांची विक्री डोळेखोबणीने न करता वजनावर आधारित करावी. यामुळे योग्य दर मिळतो आणि कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळता येते.
तत्काळ विक्रीचा मोह टाळा
बाजारात शेळ्यांसाठी कमी दर मिळत असेल, तर घाई करून विक्री करू नका. योग्य दर मिळेल, याची वाट पाहावी. क्षणिक लोभाला बळी पडून कमी दरात विक्री केल्यास तोटा होण्याची शक्यता असते.
गैरमार्गाचा अवलंब करू नका
अधिक नफा मिळवण्यासाठी काही लोक चुकीचे मार्ग अवलंबतात. यामुळे दीर्घकालीन व्यवसायात अडचणी निर्माण होऊ शकतात. प्रामाणिक आणि पारदर्शक व्यवहार करणे हा चांगला पर्याय आहे.
शेळीपालनात अधिक नफा मिळवण्यासाठी हे करा
शेळ्यांच्या आहाराचे योग्य नियोजन करा. शारीरिक स्थिती चांगली ठेवण्यासाठी वेळोवेळी लसीकरण व औषधोपचार करा. बाजारातील मागणीनुसार योग्य वेळी विक्री करा. विक्रीसाठी नेण्यापूर्वी शेळ्यांचे वजन आणि आरोग्य तपासा.योग्य वाहतूक व्यवस्था करा आणि शेळ्यांचे संरक्षण करा.
शेळीपालन व्यवसाय हा योग्य नियोजन आणि बाजारातील चढ-उतार लक्षात घेऊन केला, तर मोठा नफा मिळवून देतो. विक्रीसाठी शेळ्या नेताना त्या तंदुरुस्त, निरोगी आणि आकर्षक असाव्यात. त्यांचे योग्य वजन आणि आहार व्यवस्थापन केल्यास चांगल्या दरात विक्री करता येते. वाहतुकीच्या वेळी सावधगिरी बाळगल्यास शेळ्यांना कोणताही त्रास होणार नाही आणि बाजारात अधिक चांगल्या किंमतीला विक्री करता येईल. त्यामुळे बाजारातील मागणीचे योग्य नियोजन करून शेळीपालनात मोठा आर्थिक फायदा मिळवता येऊ शकतो.