भारतातील ‘या’ दोन शेतकऱ्यांना मिळाला पद्मश्री पुरस्कार! शेतीचे आहेत बादशहा; जाणून घ्या त्यांची शेती क्षेत्रातील कामगिरी
Padma Award 2025:- भारतामध्ये कृषी क्षेत्र आणि कृषी क्षेत्राशी संबंधित असलेल्या अनेक महत्वाच्या उपक्रमांमध्ये शेतकऱ्यांचे योगदान हे खूप मोठे आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कृषी तंत्रज्ञान स्वतः विकसित केले आहे व इतकेच नाहीतर अनेक फळबागांच्या जाती देखील विकसित करण्याचे महत्त्वपूर्ण काम केलेले आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेकदा अनेक शेतकऱ्यांचे कौतुक करताना आपल्याला दिसून येतात व शेतीमधील यांची कामगिरी खरंच कौतुकास्पद आहे. आपल्याला माहित आहे की, केंद्र सरकारने 2025 च्या पद्म पुरस्कार घोषित केले व यामध्ये अनेक विविध क्षेत्रातील दिग्गजांना हे पुरस्कार देण्यात आले.
या सगळ्या दिगजांमध्ये मात्र भारतातील दोन प्रयोगशील शेतकऱ्यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये नागालँडचे शेतकरी एल हँगथिंग आणि हिमाचल प्रदेश राज्यातील हरीमन शर्मा या दोन शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
या दोन्ही शेतकऱ्यांची जर कृषी क्षेत्रातील कामगिरी बघितली तर ती खूप अनन्यसाधारण अशी आहे. यांनी शेती क्षेत्रामध्ये खूप वेगळ्या पद्धतीचे कामे केली असून त्यांच्या या कामाचा फायदा इतर शेतकऱ्यांना देखील खूप मोठ्या प्रमाणावर झाला आहे.
कोण आहेत नेमके नागालँडचे प्रयोगशील शेतकरी एल हँगथिंग?
नागालँड राज्यातील नोकलाक या जिल्ह्यातील एक प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यांना ओळखले जाते. विशेष म्हणजे त्यांना ‘नोकलाकचा फळांचा मसिहा’म्हणून देखील ओळखतात. ते जवळपास मागील तीस वर्षापासून त्यांच्या परिसरामध्ये स्थानिक नसलेले जे फळ आहेत त्याच फळांची नेमकी लागवड करतात आणि त्यांच्या या फळ लागवडीचे ज्ञान ते परिसरातील 40 गावांमधील 400 पेक्षा अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहेत.
अगदी लहानपणापासून त्यांना टाकून दिलेल्या फळांपासून बिया गोळा करायची सवय होती व त्या बियांची लागवड शेतात ते करायचे. या त्यांच्या आवडीमुळे त्यांना फळबागांमध्ये आवड निर्माण झाली व त्यांच्या नवीन शेती तंत्राचा 400 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी सध्या त्या परिसरामध्ये अवलंब केल्याची दिसून येते.
विशेष म्हणजे नागालँड सारख्या राज्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी नसलेल्या लीची आणि संत्री यासारख्या फळांची लागवड करून अधिक उत्पन्न मिळवले आहे व इतर शेतकऱ्यांना देखील अधिक उत्पन्न मिळवून दिले आहे. त्यांच्या या सगळ्या कामामुळे जवळपास 40 गावांमधील हजारो शेतकरी आज सक्षम बनले आहे.
हरीमन शर्मा यांची कृषी क्षेत्रातील कामगिरी काय आहे?
हरीमन शर्मा हे हिमाचल प्रदेश मधील घुमरवी तालुक्यात राहणारे एक प्रगतिशील शेतकरी असून त्यांनी सफरचंद बागांच्या बाबतीत खूप मोठे काम केलेले आहे. सन 2005 मध्ये त्यांनी सफरचंदाची शेतकऱ्यांना अतिशय फायदेशीर अशी जात विकसित केली व जी सकल भागांमध्ये देखील लागवड करता येते व चांगली वाढवता येते.
त्यांनी विकसित केलेली ही जात उष्ण भागात देखील पिकवता येते व या जातीचे नाव आहे HRMN 99 व तिलाच हरमन 99 असे देखील म्हटले जाते. या जातीची लागवड महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी केल्याचे आपल्याला दिसून येते. त्यांनी विकसित केलेली सफरचंदाची ही जात 40 ते 46 अंश तापमानात देखील चांगली वाढते व विशेष म्हणजे या जातीचे पेटंट देखील त्यांनी त्यांच्या नावावर घेतले आहे.
या जातीचे सफरचंदाचे फळ आकाराने तसेच गुणवत्ता व चवीमध्ये देखील पारंपारिक सफरचंदासारखेच आहे. थंड प्रदेशातच नाही तर अगदी सकल भागात देखील यशस्वीरित्या या जातीच्या सफरचंदाचे उत्पादन घेतले जाऊ शकते.