Floriculture Farming: शेतकऱ्यांनी शिकावे या जळगावच्या शेतकऱ्याकडून… 25 गुंठ्यात वर्षाला मिळवतो 2 लाखांचे उत्पन्न
Farmer Success Story:- जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील टोणगाव येथील इंदल परदेशी यांनी फुलशेती करून यशस्वी व्यवसाय उभा केला आहे. केवळ २५ गुंठे क्षेत्रात झेंडू, शेवंती, बिजली आणि नवरंग यांसारखी फुले लागवड करून ते वर्षाला दीड ते दोन लाख रुपये कमवत आहेत. पारंपरिक शेतीतील अनिश्चितता, हवामान बदलाचा फटका आणि बाजारातील चढ-उतार यामुळे सातत्याने आर्थिक अडचणी येत असल्याने त्यांनी २०१९ मध्ये फुलशेती करण्याचा निर्णय घेतला.
कपाशी, मका आणि ज्वारी यांसारखी पारंपरिक पिके घेतल्यानंतरही त्यांना कधी नफा मिळायचा तर कधी नुकसान सोसावे लागायचे. पारंपरिक पिकांमध्ये पाच ते सहा महिने कालावधी लागत असल्याने उत्पन्नासाठी अधिक प्रतीक्षा करावी लागत होती आणि मुलांच्या शिक्षणासाठी तसेच घरखर्चासाठी उसनवारी करावी लागत होती. त्यामुळे त्यांनी कमी क्षेत्रात जास्त नफा देणाऱ्या फुलशेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला.
फूलशेतीने दिली आर्थिक समृद्धी
फुलशेतीमुळे त्यांना पारंपरिक शेतीच्या तुलनेत अधिक फायदा होत आहे. पारंपरिक शेतीत उत्पन्न वर्षातून एक किंवा दोनदा मिळते, मात्र फुलशेतीत उत्पादन सातत्याने घेतल्याने त्यांना दररोज रोख पैसा मिळतो. त्यामुळे आर्थिक स्थैर्य निर्माण झाले आहे. त्यांनी सुरुवातीला २५ गुंठे क्षेत्रात झेंडू आणि शेवंती यांची लागवड केली आणि त्यातून अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न मिळाल्याने त्यांनी बिजली आणि नवरंग यांसारख्या अधिक मागणी असलेल्या फुलांचीही लागवड सुरू केली.
झेंडूला गणपती उत्सव, दसरा, दिवाळी आणि विविध सणांमध्ये मोठी मागणी असते, तर शेवंतीचा उपयोग लग्नसराई आणि धार्मिक विधींमध्ये होतो. बिजली आणि नवरंग ही फुले आकर्षक रंग आणि दीर्घायुषी असल्याने त्यांना बाजारपेठेत चांगला भाव मिळतो.
येणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न
फुलशेतीतून त्यांना दरवर्षी दीड ते दोन लाखांचे उत्पन्न मिळत असून, खर्च केवळ ४० ते ५० हजार रुपयांच्या दरम्यान आहे. त्यामुळे त्यांचा निव्वळ नफा एक लाख ते दीड लाख रुपयांच्या दरम्यान राहतो. त्यांनी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करून पाण्याचा योग्य व्यवस्थापन केले आहे, तसेच सेंद्रिय खतांचा वापर वाढवून उत्पादनाचा दर्जा उंचावला आहे.
पारंपरिक पिकांपेक्षा फुलशेतीला कमी पाणी लागते, त्यामुळे उत्पादन खर्चही कमी राहतो. फुलशेतीतून चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी त्यांनी थेट बाजारपेठेशी संपर्क साधला आहे. स्थानिक बाजारात विक्री करण्याबरोबरच, मंदिर परिसर आणि व्यापाऱ्यांशी थेट संपर्क साधून अधिक चांगल्या दराने फुले विकली जातात.
फुलशेतीमुळे परदेशी यांच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळाले असून, मुलांच्या शिक्षणाचा खर्चही सहज भागवला जात आहे. पारंपरिक शेतीतील अनिश्चिततेच्या फेऱ्यात अडकण्याऐवजी त्यांनी फुलशेतीतून नियमित उत्पन्न मिळवण्याचा मार्ग निवडला आणि तो यशस्वी ठरला. कमी जागेत अधिक उत्पादन आणि जास्त नफा मिळत असल्याने त्यांचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. भविष्यातही फुलशेतीतून अधिक चांगले उत्पन्न मिळू शकते, त्यामुळे योग्य नियोजन, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर आणि बाजारपेठेचा अभ्यास करून अधिकाधिक शेतकऱ्यांनी फुलशेतीकडे वळावे, असा संदेश त्यांच्या यशकथेवरून मिळतो.