Fig Farming: महेश सावंत यांचा शेतीत मास्टरस्ट्रोक! नोकरी सोडून शेतीत उडी घेतली, मिळवला 3 लाखांचा नफा..वाचा गुपीत
Farmer Success Story:- सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी गावातील महेश शिवाजी सावंत यांनी नोकरी सोडून शेतीत नवा प्रयोग केला आणि मोठे यश मिळवले. पुण्यातील एका खाजगी कंपनीत स्थिर नोकरी करूनही त्यांना स्वतःचं काहीतरी वेगळं करायचं होतं. शेती हा त्यांच्या कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय असून, त्यांनी वडिलोपार्जित जमिनीचा अधिक चांगला उपयोग करण्याचा निर्णय घेतला.
आधुनिक शेती करण्याच्या उद्देशाने त्यांनी पुरंदर येथे जाऊन अंजीर लागवडीसंबंधी सविस्तर प्रशिक्षण घेतले. मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे त्यांनी दीड एकर क्षेत्रात अंजीरची लागवड केली, त्याचबरोबर कमी वेळेत आणि कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी कांद्याचं आंतरपीक घेतलं.
अंजीर लागवडीसाठी आलेला खर्च आणि नियोजन
अंजीर लागवडीसाठी त्यांना सुमारे 70 ते 80 हजार रुपयांचा खर्च आला, तर कांद्याच्या लागवडीसाठी 20 ते 30 हजार रुपये खर्च झाला. कमी भांडवलात उच्च उत्पन्न मिळवण्याच्या या प्रयोगामुळे त्यांना पहिल्याच हंगामात 2 ते 3 लाख रुपयांचा नफा मिळाला. अंजीर लागवड करण्यासाठी योग्य जमीन निवडणे गरजेचे असते. काळ्या जमिनीत पाणी साचत असल्याने अंजीरची वाढ व्यवस्थित होत नाही. त्यामुळे महेश सावंत यांनी मुरमाड आणि खडकाळ जमिनीची निवड केली. यामुळे अंजीर पिकाला पोषक वातावरण मिळालं. अंजीरच्या झाडांना जास्त पाण्याची गरज नसते, त्यामुळे सिंचन व्यवस्थापन करणेही सोपे जाते.
महेश सावंत यांनी 18 बाय 18 फूट अंतरावर अंजीर रोपांची लागवड केली आहे. ही बाग सध्या आठ महिन्यांची असून, अंजीरच्या झाडांना फळ येण्यास साधारणपणे एक ते दीड वर्ष लागते. विशेष म्हणजे अंजीरची लागवड एकदा केल्यास तब्बल 25 वर्षांपर्यंत त्यापासून सातत्याने उत्पादन घेतले जाऊ शकते. मात्र, या पिकाला काही विशिष्ट रोगांचा धोका असतो. विशेषतः पावसाळ्यात तांबेरा नावाचा रोग येण्याची शक्यता असते, परंतु नियमित फवारणी केल्यास तो नियंत्रणात ठेवता येतो.
सध्या अंजिराला मिळणारा दर
सध्या पुणे आणि मुंबई बाजारपेठांमध्ये अंजीरला 70 ते 80 रुपये प्रति किलो दर मिळत आहे. बाजारात अंजीरची मागणी खूप जास्त असली तरी उत्पादन मर्यादित असल्यामुळे हे पीक अत्यंत फायदेशीर ठरते. अंजीर हे अत्यंत पौष्टिक आणि उच्च बाजारमूल्य असलेलं फळ असल्यामुळे याच्या प्रक्रियेतूनही मोठ्या प्रमाणावर नफा मिळू शकतो. महेश सावंत यांनी भविष्यात अंजीरपासून विविध उत्पादने तयार करण्याचा विचार केला आहे. त्यात अंजीर जॅम, अंजीर चॉकलेट आणि इतर प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा समावेश आहे.
शेतीत नव्या संधी शोधणाऱ्या आणि आधुनिक पद्धती स्वीकारणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महेश सावंत यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. त्यांनी केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन पीक निवड केली आणि कमी खर्चात जास्त नफा मिळवण्याचे तंत्र आत्मसात केले.
त्यांनी शेतीच्या माध्यमातून मोठा आर्थिक लाभ मिळवला असून भविष्यात त्यांचे उत्पन्न आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्या मते, ज्यांच्याकडे शेती आहे, त्यांनी केवळ पारंपरिक पद्धतींवर अवलंबून राहू नये. वेगवेगळे प्रयोग करून, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत उत्पादन क्षमता वाढवावी. तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग करून अधिक लाभदायक शेतीकडे वळावे, असा महत्त्वाचा सल्ला त्यांनी दिला आहे.