Farming Technology: एका गृहिणीने उभारला समृद्ध शेतीचा ब्रँड! ५ एकर शेतीतून घेतात लाखोंची कमाई… तुम्हीही वापरू शकता हा फॉर्म्युला
Farmer Success Story:- दर्शना दामले यांनी आपल्या अथक परिश्रम आणि दूरदृष्टीच्या जोरावर शेतीत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. काही वर्षांपूर्वी बदलापूरजवळील जांभीळघर येथील ओसाड माळरानावर त्यांनी सेंद्रिय शेतीचा प्रयोग केला आणि अत्यंत शिस्तबद्ध व आधुनिक पद्धतीने शेतीला समृद्धतेकडे नेले. सुरुवातीला ही जागा नापिक आणि खडकाळ स्वरूपाची होती, मात्र त्यांनी मातीची सुपीकता वाढवण्यासाठी जैविक सुधारणा केल्या. त्यांनी गांडूळ खत, शेणखत, गोमूत्र आणि पालापाचोळ्याचा वापर करत जमिनीचा कस सुधारला आणि काही वर्षांतच ही भूमी समृद्ध झाली.
दर्शना दामले यांची पाच एकर शेतीचा फॉर्मुला
दर्शना दामले यांनी पाच एकर क्षेत्रात विविध प्रकारची पिके घेतली आहेत. त्यांनी दापोली कृषी विद्यापीठातून निवडक वाणांची १०० आंब्याची झाडे आणून लावली असून, आज त्यांना प्रत्येकी ५०० ते ६०० फळांचे उत्पादन मिळते. याशिवाय, काजू, फणस, नारळ, चिकू आणि केळी यांसारख्या फळझाडांचीही लागवड केली आहे.
त्यांच्याकडे ३० गुंठ्यात भातशेती असून, पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून त्यांनी भाताच्या उत्पादनात वाढ केली आहे. २० गुंठ्यात त्यांनी टोमॅटो, वांगी, मिरची, भेंडी, कोथिंबीर यांसारख्या विविध प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड केली आहे. शेतीत कुठलेही रासायनिक खत किंवा कीटकनाशके न वापरता संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतल्यामुळे त्यांच्या शेतीमालाला बाजारात चांगली किंमत मिळते.
शेतीला दिली पशुपालन आणि कुक्कुटपालनाची साथ
शेतीला अधिक सक्षम करण्यासाठी त्यांनी पशुपालन आणि कुक्कुटपालनालाही जोडले आहे. त्यांच्या गोठ्यात सध्या १० गीर गायी आणि ५ ते ६ म्हशी आहेत. या गायी आणि म्हशींकडून मिळणाऱ्या दुधाचा वापर केवळ स्वतःपुरता न करता, त्यांनी स्थानिक बाजारपेठेत विक्री सुरू केली आहे.
यासोबतच कोंबडीपालनही केल्याने त्यांना अंडी आणि मांस उत्पादनातूनही नियमित उत्पन्न मिळते. विशेष म्हणजे, त्यांच्या शेतीतील सर्व उपकरणे सौरऊर्जेवर चालणारी आहेत, ज्यामुळे वीजेच्या खर्चात मोठी बचत झाली आहे. शेततळ्याच्या माध्यमातून त्यांनी पाण्याची बचत केली असून, ठिबक सिंचन आणि स्प्रिंकलर तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पाण्याचा अत्यंत काटेकोरपणे उपयोग केला जातो.
इतर पिकांसोबत मसाला आणि औषधी पिकांची केली लागवड
दर्शना दामले यांनी पारंपरिक शेतीच्या चौकटीबाहेर जाऊन प्रयोगशील शेती केली आहे. त्यांनी केवळ धान्य आणि फळबागांवर भर न देता मसाल्याची पिके आणि औषधी वनस्पतींचीही लागवड केली आहे. यामध्ये हळद, आले, काळी मिरी, लवंग, तुळस आणि शतावरी यासारख्या उपयोगी वनस्पतींचा समावेश आहे. यामुळे त्यांना विविध प्रकारच्या उत्पन्न स्रोतांचा फायदा होतो. त्यांचा ठाम विश्वास आहे की, शेतकऱ्यांनी एकाच प्रकारच्या पिकांवर अवलंबून न राहता मिश्र शेती स्वीकारली पाहिजे, ज्यामुळे उत्पन्न अधिक स्थिर आणि शाश्वत राहते.
आजच्या काळात वाढती उत्पादनाची किंमत, नापिकी आणि बाजारातील अस्थिरता यामुळे अनेक तरुण शेतीकडे पाठ फिरवत आहेत. मात्र, दर्शना दामले यांनी आपल्या जिद्दीने आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या योग्य वापराने शेतीत मोठे यश मिळवले आहे. गृहिणी म्हणून आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळतानाच त्यांनी शेतीमध्ये नवे प्रयोग करून एक यशस्वी उद्योजकतेचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या प्रवासाने अनेक शेतकरी आणि तरुणांना शेतीकडे पुनर्विचार करण्याची प्रेरणा मिळेल, तसेच कमी भांडवलात सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून अधिक नफा मिळवता येतो, याचा वस्तुपाठ घालून दिला आहे.