पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन ! सातबारा कोरा करण्याची मागणी
हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी मंत्रालयावर धडक देण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून बुधवारी (ता. १२) मुंबईतील मानखुर्द ते मंत्रालय हे २० किमीचे अंतर अर्धनग्न अवस्थेत चालत जाऊन आंदोलन केले जाणार आहे. त्यासाठी मंगळवारी (ता. ११) हिंगोलीत आंदोलन करून शेतकरी मुंबईकडे रवाना झाले.
सरकारने दिलेले आश्वासन अपूर्णच
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीवेळी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते.मात्र, सरकार स्थापन झाल्यानंतर हे आश्वासन प्रत्यक्षात उतरले नाही.संपूर्ण कर्जमाफी संदर्भात कोणताही ठोस निर्णय न घेतल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने पीकविमा द्यावा.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे तातडीने सुरू करावीत.
वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करून शेतीचे होणारे नुकसान रोखावे.
शेतकऱ्यांनी या मागण्यांसाठी शासनाकडे निवेदनही सादर केले होते, मात्र सरकारकडून कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलनाचा निर्णय घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं
मंगळवारी हिंगोलीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन करत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनात नामदेव पतंगे, गजानन कावरखे, दीपक सावके, प्रवीण मते, राजेश मते, गजानन जाधव, शांतीराम सावके, दीपक सावके यांसह अनेक शेतकरी सहभागी झाले.त्यानंतर हे सर्व शेतकरी वाहनाने मुंबईकडे रवाना झाले आहेत.
आंदोलनाचे पुढील पाऊल
शेतकरी १२ फेब्रुवारी रोजी मानखुर्द ते मंत्रालय २० किमी अंतर पायी अर्धनग्न अवस्थेत पार करणार आहेत आणि सरकारला आपल्या मागण्यांकडे लक्ष देण्यास भाग पाडणार आहेत.शासनाने त्वरित निर्णय घेतला नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.