Farmer Success Story: शेतीत नव्या पद्धती वापरा आणि एका वर्षात 4 लाख कमवा… जाणून घ्या कसे?
Farmer Success Story:- सौंदलगा (ता. निपाणी) येथील निवृत्ती दादू पाटील यांनी शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग करून यशस्वी व्यवसायिक शेतीचा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी उसात आंतरपीक म्हणून कांद्याचे उत्पादन घेतले आणि एका एकरात आठ टनांहून अधिक कांदा उत्पादन मिळवून तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले. यावर्षी थंडीचे प्रमाण कमी असल्याने कांदा उत्पादनाला काहीसा फटका बसला असला तरीही त्यांनी मेहनतीने हे यश मिळवले. कांद्याला बाजारात ३५ ते ४० रुपये प्रतिकिलो दर मिळाल्यामुळे त्यांना चांगला नफा मिळाला. याशिवाय पावसाळी हंगामात त्यांनी सोयाबीन घेतले होते, ज्यातून ११ क्विंटल उत्पादन मिळाले.
ऊस पिकाचे नियोजन
सध्या त्यांच्या शेतात असलेला ऊस कमीत कमी ६० ते ६५ टनांपर्यंत उत्पादन देईल, असा अंदाज आहे. त्यामुळे वर्षभरातील एकत्रित उत्पन्न खर्च वजा जाता चार लाख रुपयांपर्यंत पोहोचणार आहे. पाटील हे व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती करतात आणि शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करतात. ते नेहमीच शेतात शेणखतासह रासायनिक खते, कीटकनाशके आणि चांगल्या प्रतीची बी-बियाणे वापरण्यावर भर देतात.
ऊस शेतीसोबत कांदा पिकाचे उत्पादन
त्यांचा मुख्य व्यवसाय ऊस शेतीचा असला तरी दुय्यम पीक म्हणून कांद्याचे उत्पादन घेतात. गेल्या वर्षी त्यांना एका एकरात १२ ते १३ टनांपर्यंत कांदा उत्पादन मिळाले होते. मात्र यंदा थंडी कमी असल्याने कांद्यावर करपा, सुरळी मर आणि माता या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. त्यामुळे पीक टिकवण्यासाठी आणि त्याची योग्य निगा राखण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागली. तरीही उसात आंतरपीक म्हणून कांद्याचे उत्पादन फायदेशीर ठरते, असे पाटील सांगतात.
उत्तम शेतीचे व्यवस्थापन फायद्याचे
पाटील यांचा पद्धतशीर शेतीचा दृष्टिकोन त्यांच्या यशामागचे मुख्य कारण आहे. ते पावसाळी हंगामात सोयाबीन घेतल्यानंतर ऑक्टोबरमध्ये सरीच्या दोन्ही बाजूंना कांदा लावतात. त्यानंतर महिनाभराने सरीमध्ये ऊसाची लागवड करतात. कांदा लावताना ते अंतर कमी ठेवतात, त्यामुळे कांदे मोठ्या आकाराचे होत नाहीत पण उत्पादनाचे प्रमाण अधिक राहते. त्यांच्या या आधुनिक शेती पद्धतीचे परिसरात कौतुक केले जाते. त्यांना या उपक्रमासाठी सुरेश सनदी आणि चैतन्य कवाणे यांचे मार्गदर्शन मिळाले.
दुसऱ्याची जमीन कसं घेतली स्वतःची जमीन
पाटील यांनी कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर मोठी प्रगती साधली आहे. त्यांच्या कुटुंबाने अत्यंत मेहनतीने जीवन जगत दुसऱ्याची जमीन कसायला घेतली आणि आज सहा एकरांहून अधिक स्वतःची जमीन खरेदी केली आहे. याशिवाय दीड किलोमीटर अंतरावरून वेदगंगा नदीतून पाणी योजना केली आहे. १७ वर्षांपूर्वी एका साखर कारखान्यातून नोकरी गेल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही. शेतीत मेहनत घेऊन त्यांनी आज स्वतःची आर्थिक स्थिती भक्कम केली आहे.
निसर्गाच्या लहरींवर शेती अवलंबून असली तरी नकारात्मक विचार न करता नोकरी किंवा अन्य व्यवसायाप्रमाणेच पूर्ण समर्पण आणि मेहनत केली, तर शेतीदेखील भरघोस नफा देऊ शकते, हे पाटील यांनी त्यांच्या यशाने सिद्ध केले आहे. युवकांनी निराश न होता शेतीत नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून यश मिळवावे, असा प्रेरणादायी संदेश त्यांच्या यशोगाथेतून मिळतो.