Farmer Success Story: केवळ 2.5 लाख गुंतवणुकीतून 5 कोटींची कमाई… या शेतकऱ्यांची यशोगाथा वाचाच
Farmer Success Story:- शेती हा केवळ पारंपरिक व्यवसाय न राहता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने किफायतशीर आणि नफ्याचा मार्ग बनू शकतो, हे विदर्भातील तीन तरुणांनी सिद्ध करून दाखवले आहे. परशराम आखरे, डॉ. अमित देशमुख आणि वैभव घरड यांनी 'कृषी सारथी' नावाचा एक नाविन्यपूर्ण स्टार्टअप सुरू करून हजारो शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळवले आहे.
पारंपरिक शेतीतील अडचणी, हवामान बदलाचा धोका, बाजारातील अस्थिरता आणि दलालांचे शोषण यांसारख्या अडचणींवर मात करत, केवळ अडीच लाख रुपयांच्या भांडवलावर सुरू झालेल्या या स्टार्टअपने चार वर्षांत पाच कोटी रुपयांची उलाढाल साधली आहे. या उपक्रमामुळे १८० हून अधिक युवकांना रोजगारही मिळाला आहे, तसेच ३५,००० हून अधिक शेतकऱ्यांना आधुनिक शेतीच्या दिशेने मार्गदर्शन करून त्यांचे उत्पन्न वाढवण्यात मदत झाली आहे.
शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्थैर्याचा नवा मार्ग
'कृषी सारथी'ने शेतकऱ्यांसाठी एक असे डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केले आहे, जिथे त्यांना शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य – बियाणे, खते, कीटकनाशके आणि आधुनिक शेतीसाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान – घरीच मिळते. हे साहित्य २४ तासांत थेट शेतकऱ्यांच्या घरी पोहोचवले जाते, त्यामुळे त्यांना व्यापाऱ्यांकडे चकरा मारण्याची गरज उरत नाही.
तसेच, या स्टार्टअपने शेतीसाठी बायोचार (Biochar) तंत्रज्ञानाचा वापर करून मातीचे आरोग्य सुधारण्यावर भर दिला आहे, ज्यामुळे शेती अधिक शाश्वत आणि नफ्याची ठरते. विशेष म्हणजे, कृषी सारथीने शेतकऱ्यांसाठी पीक संरक्षण आणि उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि मशीन लर्निंगच्या मदतीने अत्याधुनिक उपाय विकसित केले आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यातील १३ जिल्ह्यांमध्ये या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश – कार्बन क्रेडिटसह मोठी झेप
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी 'कृषी सारथी'ने आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी करार करून कार्बन क्रेडिट उपक्रम सुरू केला आहे. जैविक शेती करणाऱ्या आणि नैसर्गिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून अतिरिक्त आर्थिक लाभ मिळू शकतो. ही योजना शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीपेक्षा अधिक फायदा देणारी ठरत आहे.
शासकीय सन्मान आणि प्रेरणादायी प्रवास
परशराम आखरे यांनी क्राऊड फंडिंगच्या मदतीने शिक्षण पूर्ण केले आणि आयआयटी मुंबईच्या संशोधनाचा अनुभव घेत शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान विकसित केले. त्यांच्या नवोपक्रमामुळे महाराष्ट्र शासनाने २०२२ मध्ये 'उत्कृष्ट कृषी स्टार्टअप' म्हणून 'कृषी सारथी'चा सन्मान केला. या स्टार्टअपने शेतीच्या पारंपरिक संकल्पना मोडीत काढून आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि थेट बाजारपेठ निर्माण करून शेतकऱ्यांना नवा आधार दिला आहे.
'कृषी सारथी'चा हा प्रवास केवळ
विदर्भापुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतभर विस्तारत आहे. शेतीमध्ये नाविन्य आणि आधुनिक दृष्टिकोनाची जोड दिल्यास ती एक यशस्वी आणि किफायतशीर उद्योजकता ठरू शकते, हे या तिघा तरुणांनी आपल्या मेहनतीतून सिद्ध करून दाखवले आहे. विदर्भातील या युवा शेतकऱ्यांची प्रेरणादायी यशोगाथा ग्रामीण भारतासाठी नवा दिशादर्शक ठरत आहे.