Farmer Success Story: एका एकरातून 10 लाखांचा नफा! द्राक्ष शेतीतून पिसाळ कुटुंबाचा ऐतिहासिक प्रवास
Farmer Success Story:- सांगलीच्या तासगाव तालुक्यातील येळावी गावातील पिसाळ कुटुंबाने मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर द्राक्षशेतीत क्रांती घडवून आणली आहे. अत्यंत मेहनती आणि जिकिरीचे पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्राक्षशेतीत त्यांनी उच्चांकी आणि निर्यातक्षम उत्पादन करून एक आदर्श निर्माण केला आहे.
गेल्या ४० वर्षांपासून पिसाळ कुटुंबाचा शेती हा परंपरागत व्यवसाय असून, महादेव, शंकर आणि लक्ष्मण या पिसाळ बंधूंकडे केवळ अडीच एकर वडिलोपार्जित जमीन होती. १९८५ साली त्यांनी एक एकर क्षेत्रावर माणिकचमन द्राक्ष व्हरायटीचा प्रयोग केला. सुरुवातीला चांगल्या उत्पन्नाचा अनुभव घेतल्याने त्यांना द्राक्षशेतीची आवड निर्माण झाली. कुटुंबातील एकोपा टिकवत त्यांनी द्राक्षशेतीतील अनेक चढ-उतार अनुभवले आणि यशाचा मार्ग शोधला.
द्राक्ष बागेतून मिळवतात एकरी दहा लाखांचा
द्राक्षशेतीतून मिळालेला नफा बाजूला ठेवून त्यांनी हळूहळू शेतजमिनीत वाढ केली. आज त्यांची २२ एकर द्राक्षबाग आहे आणि एकरी जवळपास १० लाखांचा नफा मिळवत आहेत. पाण्याच्या व्यवस्थापनासाठी त्यांनी येरळा नदीवरून पाईपलाईन करून चार विहिरी आणि चार कुपनलिका खोदल्या. ही काटेकोर योजना आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर त्यांच्या यशाचा मुख्य आधार आहे.
शंकर पिसाळ यांनी बी.एससी. केमिस्ट्रीचे शिक्षण घेतले होते आणि त्यांना कृषी अधिकारी म्हणून नोकरीही मिळाली होती. मात्र, नोकरीपेक्षा शेतीची ओढ अधिक असल्याने त्यांनी राजीनामा देऊन आपले ज्ञान शेतीमध्ये वापरण्याचा निर्णय घेतला. कुटुंबातील इतर सदस्यांनीही एकजुटीने काम करून द्राक्षशेतीत नवे प्रयोग केले. त्यांच्या मेहनतीमुळे कुटुंबातील सदस्य उच्चशिक्षित होत असूनही शेतीत सक्रिय राहिले.
सेंद्रिय खतांवर देतात विशेष भर
द्राक्षशेती करताना पिसाळ बंधू सेंद्रिय खतांवर विशेष भर देतात. छाटणीपूर्वी ते एकरी चार ते पाच ट्रॉली शेणखत देतात. बेसल डोससाठी १०:२६:२६, सुपर फॉस्फेट, एस.ओ.पी. आणि गंधक यांसारख्या मोजक्याच रासायनिक खतांचा वापर करतात. तसेच अशोकाची नीम पेंड, मासळी पावडर यांसारखी सेंद्रिय खते वापरून मातीची गुणवत्ता टिकवून ठेवतात. छाटणीनंतर ७५-८० दिवसांनी पोटॅश, निमपेंड आणि मासळी पावडर यांचा विशेष डोस दिला जातो. फ्लॉवरिंग स्टेजमध्ये जी.ए. या संप्रेरकाची तीन ते चार वेळा फवारणी केली जाते आणि विद्राव्य खते ठिबकद्वारे दिली जातात.
पिसाळ कुटुंबाने विविध द्राक्षवाणाची लागवड करून उत्पादनात वैविध्यता आणली आहे. त्यामध्ये पाच एकर शरद, तीन एकर माणिकचमन, साडेपाच एकर अनुष्का आणि पाच एकर एस.एस.एन. या व्हरायटींचा समावेश आहे. त्यांच्या अभ्यास आणि अनुभवाच्या जोरावर हे बंधू प्रत्येक वाणातून उच्चांकी उत्पादन घेत आहेत.
विशेषतः अनुष्का आणि एस.एस.एन. ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी असलेली द्राक्षे ते मोठ्या प्रमाणावर निर्यात करतात. गेल्या अकरा वर्षांपासून त्यांच्या द्राक्षांची व्यापारी बांधावरून खरेदी करतात. एका एकरासाठी साधारणपणे तीन ते साडेतीन लाखांचा खर्च येतो, मात्र खर्च वजा जाता त्यांना एकरी १० लाखांपर्यंतचा नफा मिळतो.
शंकर पिसाळ हे संपूर्ण द्राक्षबागेचे व्यवस्थापन करतात आणि कीड व रोग नियंत्रणासाठी डॉ. सतीश पाटील यांचा वेळोवेळी सल्ला घेतात. सेंद्रिय खतांच्या प्रभावी वापरामुळे त्यांचे द्राक्ष निर्यातक्षम आणि दर्जेदार असतात. बदलत्या हवामानाशी जुळवून घेत त्यांनी चार दशकांपासून द्राक्षशेतीत सातत्य ठेवले आहे. त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता—अनेक संकटांना एकजुटीने तोंड देत त्यांनी मेहनत आणि निष्ठेने हे यश साध्य केले.
पिसाळ कुटुंबाचा हा प्रवास केवळ त्यांचा आर्थिक विकासच दर्शवत नाही, तर त्यांनी इतर अनेकांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या २२ एकर खडकाळ जमिनीतून फुललेल्या द्राक्षबागांमुळे चाळीसहून अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे. पिसाळ कुटुंबाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, सेंद्रिय खतांचा प्रभावी वापर करत आणि कठोर मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या यशोगाथेने आज अनेक शेतकऱ्यांना नवा विश्वास आणि प्रेरणा दिली आहे.