Farmer Success Story: बीटरूटचा अनोखा प्रयोग! एका छोट्या कल्पनेतून लाखोत उत्पन्न
Farmer Success Story:- सांगली जिल्ह्यातील सांगली-तासगाव राज्य मार्गावर असलेले कवलापूर हे गाव द्राक्ष आणि ऊस शेतीसाठी प्रसिद्ध आहे. ही दोन्ही पिके नगदी असली तरी त्यातून उत्पन्न मिळवण्यासाठी किमान वर्षभर वाट पाहावी लागते. याशिवाय द्राक्ष हे हवामानाला अतिसंवेदनशील असल्याने त्यातील जोखीम मोठी आहे. खर्चही अधिक असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागतो. तरीसुद्धा येथील शेतकऱ्यांनी द्राक्ष शेतीत सातत्य ठेवले आहे. याशिवाय, गावातील शेतकरी पारंपरिक गाजर शेतीदेखील करतात, जी त्यांना पूरक उत्पन्न मिळवून देते.
गावातील कैलास नारायण गुंडे यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पूर्वी बेताची होती. त्यांच्याकडे केवळ दीड एकर कोरडवाहू शेती होती, त्यामुळे शाश्वत उत्पन्न मिळवणे कठीण होते. त्यांच्या वडिलांनी अतीव मेहनतीने शेती कसली आणि सांगलीजवळ माधवनगर येथे पॉवरलूम कंपनीत नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला.
कैलास यांनी शेतीत वडिलांना मदत करत बी.ए. पर्यंत शिक्षण पूर्ण केले. एम.ए. (मानसशास्त्र) शिक्षण घेत असतानाच काही कारणांमुळे ते पूर्ण होऊ शकले नाही. १९८८ मध्ये वसंतदादा सहकारी साखर कारखान्याची पाणी योजना कार्यान्वित झाल्यानंतर त्यांच्या शेतीचे बागायतीकरण झाले आणि त्यांना नगदी पिकांची लागवड करता आली. त्यांनी ऊस शेतीकडे वळून आर्थिक उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला.
सन २००० मध्ये कैलास यांनी शेतीची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली
सन २००० मध्ये कैलास यांनी शेतीची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. भांडवल आणि क्षेत्र मर्यादित असल्यामुळे त्यांनी सुरुवातीला कमी कालावधीची पिके घेण्यावर भर दिला. २००६ मध्ये त्यांनी बोअरवेल घेतली, ज्यामुळे शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध झाले. त्यांनी मेथी, कोथिंबीर, भेंडी, काकडी आणि मिरचीसारख्या विविध भाजीपाला पिकांची लागवड केली आणि त्यातून पीकबदलाचा प्रयोग यशस्वी केला. त्याच दरम्यान त्यांनी द्राक्ष लागवड सुरू केली.
शेतीवर संपूर्ण अवलंबून राहणे कठीण असल्याने त्यांनी खासगी ठिबक सिंचन कंपनीत काही वर्षे नोकरी केली आणि उत्पन्न वाढवले. २०१५ मध्ये त्यांनी नोकरी सोडून पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतला. त्याच वर्षी त्यांनी अर्धा एकर क्षेत्रात द्राक्ष लागवड वाढवली आणि त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळवण्यास सुरुवात झाली. मात्र, जुनी द्राक्ष बाग वयोमानामुळे निष्प्रभ होत चालली होती आणि उत्पन्नाचा अखंड स्रोत टिकवण्यासाठी नवीन पिकाचा विचार आवश्यक झाला.
२०१८ मध्ये बीटरूट शेतीचा पर्याय स्वीकारला
२०१८ मध्ये कैलास यांच्या मित्राने त्यांना बीटरूट शेतीचा पर्याय सुचवला. या पिकाबद्दल संपूर्ण माहिती घेऊन त्यांनी २०२१ मध्ये बीटरूट शेतीचा प्रयोग सुरू केला. सातत्यपूर्ण अभ्यास आणि अनुभवाच्या जोरावर त्यांनी बीटरूट उत्पादनात चांगले यश मिळवले. बीटरूट हे असे पीक आहे की, त्याला सतत मागणी असते पण प्रमाण मात्र मर्यादित असते.
म्हणून ते दरवर्षी अर्धा ते पाऊण एकर क्षेत्रात बीटरूटची लागवड करतात. यंदा त्यांनी एक एकरात लागवड केली आहे. नोव्हेंबर-डिसेंबर हा मुख्य हंगाम असतो. बीटरूटसाठी गोलसर आणि आतून लालसर रंगाच्या वाणांची निवड केली जाते. साडेचार ते पाच फुटी गादीवाफा पद्धतीचा वापर करून बेडच्या दोन्ही बाजूंनी लागवड केली जाते. हे पीक सुमारे ७० दिवसांत तयार होते आणि पाच महिन्यांच्या पीकचक्रात प्रति अर्धा एकर २० ते २५ हजार नगांचे उत्पादन मिळते.
बीटरूटचे विक्री व्यवस्थापन आणि बाजार भाव
सुरुवातीला त्यांनी बीटरूट मुंबईच्या बाजारात विकले. मात्र, तिथे वजनानुसार दर ठरवल्यामुळे आणि वाहतूक खर्च जास्त असल्याने फारसे उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी सांगली, मिरज आणि इचलकरंजी या तीन बाजारपेठांमध्ये थेट नगावर विक्री करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी प्रति नग तीन रुपये ते सहा रुपये असा दर मिळतो.
बाजारपेठेतील मागणी आणि दराचा अंदाज घेऊन विक्रीचे नियोजन केले जाते. काही वेळा किरकोळ विक्रेते थेट शेतातून बीटरूट खरेदी करतात. कैलास यांच्या आई शकुंतला, पत्नी उज्ज्वला आणि मुलगा सिद्धार्थ शेतीच्या कामात मदत करतात. आई शकुंतला घरासमोर द्राक्ष आणि बीटरूटची थेट विक्री करतात. काही वेळा बाजारात प्रति नग फक्त एक रुपया दर मिळतो, तरीसुद्धा सातत्य ठेवल्यामुळे बीटरूट शेतीने चांगले उत्पन्न दिले आहे.
कैलास यांनी जुनी द्राक्ष बाग काढून टाकल्यानंतर त्यांनी अडीच एकर मक्त्याने घेतलेल्या जमिनीत चार-पाच वर्षांपूर्वी नवीन द्राक्ष लागवड केली. सध्या सुपर सोनाका आणि एस.एस. या वाणांपासून एकरी १२ ते १४ टन उत्पादन मिळते. या द्राक्ष शेतीमुळे त्यांच्या शेतीतील उत्पन्नाला मोठा आधार मिळाला आहे. बीटरूट आणि द्राक्ष यांची जोड देऊन कैलास यांनी पीक विविधतेच्या माध्यमातून स्थिर आणि शाश्वत उत्पन्नाचा मार्ग तयार केला आहे.