नाद करा पण शेतकऱ्यांचा कुठं ? कमाईचा फॉर्म्युला – 7 एकरात 70 लाखांचे उत्पन्न!
Farmer Success Story : देशातील अनेक शेतकरी द्राक्षशेतीतून अपेक्षित नफा न मिळाल्यामुळे द्राक्षबागा काढून टाकत आहेत, पण याचवेळी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी गावच्या तरुण शेतकरी बालाजी बाबुराव भोसले यांनी 7 एकरात द्राक्ष लागवड करून 70 लाख रुपये कमावण्याचा फॉर्म्युला तयार केला आहे.
बालाजी भोसले यांचे शिक्षण B.Sc. (Agriculture) पर्यंत झाले असून, त्यांनी नोकरीच्या मागे न धावता शेतीतच करिअर करण्याचा निर्णय घेतला. माणिक चमन या विशेष वाणाची लागवड केल्यामुळे त्यांनी बाजारातील मागणी लक्षात घेऊन उत्पन्न वाढवण्याची संधी साधली.
द्राक्ष लागवडीसाठी विशेष नियोजन
बालाजी भोसले यांनी सात एकर क्षेत्रावर माणिक चमन वाणाच्या द्राक्ष बागेची लागवड केली आहे. या वाणास बाजारात मोठी मागणी असल्याने चांगला दर मिळण्याची शक्यता अधिक आहे. माणिक चमन वाणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या द्राक्षांपासून बेदाणा तयार करता येतो. त्यामुळे द्राक्ष बाजारात अपेक्षित दर न मिळाल्यास, बेदाणा उत्पादनाचा पर्याय त्यांच्यासाठी खुला राहतो.
द्राक्ष उत्पादनासाठी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर
१) दैनंदिन निगा आणि फवारणी
बालाजी भोसले यांनी त्यांच्या द्राक्ष बागेची दररोज पाहणी करून योग्य वेळी आवश्यक औषधांची फवारणी केली. यामुळे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव टाळता आला. शेतकऱ्यांनी हवामानानुसार कोणते औषध कधी फवारावे, याची माहिती घेतल्यास नुकसान टाळता येते, असा त्यांचा अनुभव आहे.
२) योग्य खत व्यवस्थापन आणि सिंचन प्रणाली
- ड्रिप सिंचन प्रणालीचा अवलंब करून पाण्याचा सुयोग्य वापर केला आहे.
- सेंद्रिय आणि रासायनिक खतांचे संतुलित प्रमाण राखले आहे.
३) उत्पादन क्षमता आणि खर्चाचे गणित
- प्रती एकर २५ टन द्राक्ष उत्पादन अपेक्षित आहे.
- एका एकरासाठी सुमारे २ लाख रुपये खर्च झाला आहे.
- एका एकरातून १० लाखांचे उत्पन्न अपेक्षित, म्हणजेच ७ एकरातून ७० लाख रुपयांचे उत्पन्न होणार आहे.
तरुणांसाठी आदर्श प्रेरणा
काहीतरी मोठे करून दाखवायची जिद्द असेल, तर शेती हा उत्तम व्यवसाय ठरू शकतो, असे मत बालाजी भोसले यांनी व्यक्त केले. शहरी भागात जाऊन नोकरी करण्यापेक्षा स्वतः मालक बनून शेतीतून चांगले उत्पन्न मिळवता येते, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी तरुणांना शेतीकडे वळण्याचे आवाहन करताना सांगितले योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि मेहनत यांच्या साहाय्याने शेतीत भरघोस उत्पन्न मिळवता येते. शेतीत करिअर करण्यास इच्छुक असलेल्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.