Farmer Success Story: केळी, पपई आणि टरबूज यांचा सॉलिड प्लॅन! एका वर्षात 12 लाखांचा नफा
Farmer Success Story:- शेतीमध्ये नाविन्यपूर्ण बदल स्वीकारल्याशिवाय प्रगती करणे कठीण आहे, हे लाखणी तालुक्यातील कोलारी (पळसगाव) येथील मोरेश्वर खुशाल सिंगनजुडे यांनी आपल्या अनुभवावरून सिद्ध करून दाखवले आहे. त्यांनी साडेसहा एकर शेतीमध्ये केळी आणि पपई यांची लागवड करत त्यासोबतच आंतरपीक म्हणून टरबूजाचे उत्पादन घेतले. त्यांच्या या प्रयोगामुळे त्यांना केवळ अधिक उत्पादनच नाही, तर भरघोस नफा देखील मिळाला आहे.
अशाप्रकारे केले सहा एकर शेतीचे नियोजन
त्यांच्या ६ एकर शेतीपैकी ४ एकरात केळी आणि २ एकरात पपई लागवड करण्यात आली आहे. यासोबतच संपूर्ण क्षेत्रात टरबूज आंतरपीक घेतले आहे. टरबूज उत्पादनातून त्यांनी प्रति एकर १.५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले असून, एकूण ४ ते ४.५ लाख रुपयांचा नफा पदरात पाडून घेतला आहे. त्यांच्या मुख्य पिकांमधून म्हणजेच केळी आणि पपईमधून त्यांना अंदाजे २० लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे.
गतवर्षीचा यशस्वी अनुभव लक्षात घेऊन त्यांनी यंदाही असेच नियोजन केले आहे. जुलैपर्यंत पपईचे उत्पादन मिळेल, तर ऑक्टोबरमध्ये केळीचे उत्पादन हाती येईल. या नियोजनामुळे त्यांना वर्षभर सतत उत्पन्न मिळत राहते. फळबागायती शेती ही पारंपरिक धान शेतीच्या तुलनेत अधिक फायदेशीर ठरते, असे त्यांनी स्वतःच्या अनुभवावरून सिद्ध केले आहे. फळपिकांना बाजारात सातत्याने मागणी राहते आणि अपेक्षित दर देखील मिळतात. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनीही या बदलांचा स्वीकार करून नवा प्रयोग करण्याचा प्रयत्न करावा.
टरबुजाचे मिळाले भरघोस उत्पादन
टरबूज उत्पादनाच्या बाबतीत बोलायचे झाले, तर एका एकरातून १५ ते २० टन टरबूज उत्पादन मिळते. याला ८ ते १० रुपये प्रति किलो दर मिळाल्याने प्रति एकर १.५ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. त्यामधून ६० ते ७० हजार रुपये खर्च वजा जाता ७० हजार रुपये नफा मिळाला. टरबूज हे अवघ्या तीन महिन्यांचे पीक असल्यामुळे कमी कालावधीतच हा फायदा मिळतो. अशा प्रकारे संपूर्ण सहा एकर शेतीतून वर्षभरात त्यांनी १२ लाख रुपयांचा शुद्ध नफा मिळवला. याचा सरासरी विचार करता, महिन्याला एक लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळते.
मोरेश्वर सिंगनजुडे यांनी या प्रयोगशील शेतीतून मिळवलेल्या यशामुळे त्यांना महाराष्ट्र शासनाकडून 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार' प्रदान करण्यात आला. या पुरस्काराने त्यांचे मनोबल वाढले असून, त्यांच्या यशकथेमुळे अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा मिळत आहे. या बदलत्या काळात पारंपरिक शेतीच्या मर्यादा ओळखून आधुनिक पद्धती स्वीकारणे हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे. केळी, पपई आणि टरबूज यांसारख्या फळपिकांमध्ये गुंतवणूक केल्यास शेतकऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. मोरेश्वर यांनी हेच करून दाखवले आहे आणि त्यामुळे त्यांचे यश इतरांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.