Farmer Success Story : केशर शेतीतून केली २१ लाखांचा वार्षिक नफा !
Farmer Success Story : महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील हर्ष पाटील या तरुणाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केशर शेतीतून लाखोंची कमाई केली आहे. केवळ १५×१६ च्या एका छोट्याशा खोलीत 'एरोपोनिक' शेतीचा प्रयोग करून त्यांनी केशर उत्पादनात मोठे यश मिळवले आहे. काश्मिरी केशर महाराष्ट्रात उगवता येईल का, हा प्रश्न त्यांच्या मनात आला आणि त्यावर संशोधन करत त्यांनी या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले.
शेतीऐवजी नोकरीचा मार्ग न निवडता आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब
हर्ष पाटील यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक पर्यंत शिक्षण घेतले आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करण्याऐवजी त्यांनी स्वतःचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे संपूर्ण कुटुंब शेतीवर अवलंबून होते, त्यामुळे पारंपरिक शेतीची माहिती त्यांना होती. मात्र, त्यांनी शेती आणि तंत्रज्ञान यांचा संगम साधत नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याचे ठरवले. केशर शेतीच्या संधी शोधण्यासाठी त्यांनी संशोधन सुरू केले आणि अखेर एरोपोनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने केशर उत्पादन सुरू करण्याचा निर्णय घेतला.
एरोपोनिक शेती म्हणजे काय?
एरोपोनिक शेती म्हणजे मातीशिवाय फक्त हवा आणि धुक्यात झाडांची वाढ करण्याची एक अत्याधुनिक शेती पद्धत आहे. महाराष्ट्रात काश्मीरसारखे वातावरण निर्माण करणे हे मोठे आव्हान होते. त्यामुळे हर्ष पाटील यांनी एअर चिलर, ह्युमिडिफायर आणि PUF पॅनेल्स बसवून एक नियंत्रित वातावरण तयार केले.
पाच लाख गुंतवणुकीतून सुरूवात, आता २१ लाखांचा वार्षिक नफा
सुरुवातीला हर्ष यांनी ५ लाख रुपयांची गुंतवणूक करून काश्मीरमधून ८०० रुपये प्रति किलो दराने २०० किलो ‘मोगरा’ जातीचे केशर कंद खरेदी केले. पहिल्याच हंगामात ३०० ग्रॅम केशर उत्पादन मिळाले. केशर हे अतिशय महागडे पीक असून त्याचा बाजारभाव ७-८ लाख रुपये प्रति किलो इतका आहे. हर्ष पाटील यांनी २०२४ मध्ये २००० किलो कंद लावून ३ किलो केशरचे उत्पादन घेतले.
केशर विक्रीसाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर
आज हर्ष पाटील यांची वार्षिक उलाढाल २१ लाखांहून अधिक झाली आहे. त्यांनी इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून केशर विक्री सुरू केली. ‘Saffron Diaries’ नावाच्या प्लॅटफॉर्मद्वारे ते लोकांना केशर शेतीबद्दल माहिती देतात तसेच वीकेंड वर्कशॉपद्वारे प्रशिक्षण देखील देतात.
इतर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची संधी
हर्ष पाटील यांनी आतापर्यंत भारतातील आणि परदेशातील ७५ हून अधिक विद्यार्थ्यांना केशर शेतीचे प्रशिक्षण दिले आहे. त्यांना कोटा कृषी विद्यापीठाने ‘इनडोअर केशर फार्मिंग’ बद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले होते.
केशर शेतीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नवे दालन
हर्ष पाटील यांच्या या अनोख्या प्रयोगामुळे महाराष्ट्रात इनडोअर केशर शेतीच्या संधी निर्माण झाल्या आहेत. भविष्यात, पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्त नफा मिळवण्याचा मार्ग अनेक शेतकऱ्यांसाठी खुला होऊ शकतो.