बीडच्या शेतकऱ्याची कमाल ! केळी थेट इराणला निर्यात, २५ लाखांचे उत्पन्न
Farmer Success Story : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील प्रगतशील शेतकरी शंकर गिते यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने थेट इराणच्या बाजारात केळी निर्यात करून 25 लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. या दुष्काळी भागात पाण्याच्या अभावामुळे अनेक अडचणी असतानाही गिते यांनी आधुनिक शेतीचा आदर्श निर्माण केला आहे.
पाच एकर शेतीतून मोठे यश
फेब्रुवारी 2024 मध्ये पुण्यातून 7,250 रोपे आणून गिते यांनी पाच एकर क्षेत्रात अत्याधुनिक पद्धतीने केळी लागवड केली. ठिबक सिंचनाचा प्रभावी वापर करून आणि शेततळ्याच्या मदतीने त्यांनी पाण्याच्या समस्येवर मात केली. कमी गुंतवणुकीत जास्त उत्पादन मिळवण्याच्या उद्देशाने त्यांनी फक्त 5 लाख रुपयांची गुंतवणूक करून तब्बल 25 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले.
केळी थेट इराणच्या बाजारात
शंकर गिते यांनी यंदा 175 टन केळी उत्पादन घेतले आहे. 13 ट्रक भरून हा शेतमाल थेट इराणच्या बाजारात पाठवण्यात आला. विशेष म्हणजे, त्यांना केळी विक्रीसाठी कुठेही फिरावे लागले नाही, तर व्यापारी स्वतः त्यांच्या शेतात येऊन माल खरेदी करून गेले.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि आधुनिक शेतीचा प्रभाव
शेतीत उच्च दर्जाचे उत्पादन मिळावे यासाठी गिते यांना तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे, मंडळाधिकारी प्रशांत पोळ, तंत्रज्ञान व्यवस्थापक राजेंद्र धोंडे आणि शेती क्षेत्रातील तज्ज्ञांचे अमूल्य मार्गदर्शन मिळाले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, काटेकोर नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले.
तरुणांसाठी प्रेरणादायी आदर्श
शंकर गिते म्हणतात, “आजच्या तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता आधुनिक शेतीत संधी शोधल्या पाहिजेत. मेहनत, तंत्रज्ञान आणि योग्य नियोजन यांचा योग्य वापर केल्यास शेती हजारो नोकऱ्यांपेक्षा अधिक फायदेशीर ठरू शकते.”
आष्टी तालुक्यातील शेती क्रांती
सध्या आष्टी तालुक्यातील २५ हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली जात आहे आणि अनेक तरुण आधुनिक शेतीकडे वळत आहेत. आता हा तालुका केवळ देशांतर्गत बाजारापुरता मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही स्वतःचा ठसा उमटवत आहे. शंकर गिते यांची ही यशोगाथा आधुनिक शेतीच्या दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल असून, नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.