Farmer ID: शेतकरी बांधवांनो, ‘ही’ नोंदणी नसेल तर तुमचे नुकसान निश्चित!
Farmer ID:- केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कृषी योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे आणि वेगाने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘अॅग्रिस्टॅक’ (AgriStack) प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक शेतकऱ्याची जमीन, आधारशी संलग्न करून त्यांचा वैयक्तिक तपशील आणि भू-संदर्भीय डेटा एकत्र करून त्यांना विशेष शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) प्रदान केला जाणार आहे. हा क्रमांक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण याच्या आधारेच त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळू शकणार आहे.
शेतकरी ओळख क्रमांक का अनिवार्य आहे?
सरकारच्या कृषीविषयक योजना लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी आणि लाभ वाटप प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य करण्यात येत आहे. जर शेतकऱ्यांकडे हा क्रमांक नसेल, तर त्यांना पीककर्ज, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, पीक विमा योजना, बाजारभाव, हमीभाव आणि खरेदी नोंदणी यांसारख्या सुविधांचा लाभ घेता येणार नाही. सरकारकडे डिजिटल स्वरूपात संपूर्ण माहिती असल्यामुळे लाभ वाटपात विलंब होणार नाही आणि अनधिकृत लाभार्थी टाळले जातील.
शेतकरी ओळखपत्राचे महत्त्व आणि फायदे
शेतकरी ओळखपत्रामुळे सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी जादा कागदपत्रांची गरज भासणार नाही. शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, मुख्यमंत्री किसान सन्मान निधी, पीक विमा योजना, नुकसान भरपाई, तसेच किमान आधारभूत किंमत (MSP) वर खरेदीसाठी सहज नोंदणी करता येईल. त्यामुळे खरेदी प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक होणार आहे.
PM किसान योजनेसाठी शेतकरी ओळखपत्र आवश्यक!
येत्या हप्त्यांपासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेचा लाभ फक्त शेतकरी ओळख क्रमांक असलेल्या लाभार्थ्यांनाच मिळणार आहे. त्यामुळे, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप CSC केंद्रावर जाऊन नोंदणी केलेली नाही, त्यांनी तातडीने नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.
शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम कसा लाभदायक आहे?
‘अॅग्रिस्टॅक’ प्रकल्पाच्या माध्यमातून सरकारी मदत अधिक वेगाने आणि अचूकपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे. शेतकरी ओळख क्रमांक मिळवल्यानंतर भविष्यातील सर्व कृषी योजना आणि शासकीय अनुदानासाठी पात्र राहता येईल. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने या योजनेत नोंदणी करून आपला शेतकरी ओळख क्रमांक तयार करावा आणि उपलब्ध योजनांचा लाभ घ्यावा.