‘रक्षा बेट’ करेल आता मका पिकाचे लष्करी अळीपासून संरक्षण! बारामतीच्या कृषी महाविद्यालयाने केली कौतुकास्पद कामगिरी
Raksha Bet:- महाराष्ट्रामध्ये खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर मक्याची लागवड केली जाते. मक्याची मागणी देखील बाजारपेठेमध्ये खूप चांगल्या पद्धतीचे असते व गेल्या एक ते दोन वर्षापासून मक्याला चांगला बाजार भाव मिळताना दिसून येत आहे व त्याकरिता शेतकऱ्यांचा कल देखील मका लागवडीकडे वाढताना दिसून येत आहे.
परंतु मका पिकाच्या अनुषंगाने बघितले तर या पिकावर वेगवेगळ्या प्रकारच्या किडींचा आणि रोगराईचा प्रादुर्भाव होत असतो व त्यामुळे या सगळ्या गोष्टींच्या नियंत्रणाकरिता शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर खर्च येतो व बऱ्याचदा खर्च करून देखील काहीही फायदा होत नाही व उत्पादनात घट येऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो.
गेल्या काही वर्षात मका पिकावर मोठ्या प्रमाणावर खोड पोखरणाऱ्या लष्करी अळीचा प्रादुर्भाव पाहायला मिळत असल्याने शेतकऱ्यांपुढे या लष्करी अळीचा प्रतिबंध किंवा नियंत्रण करणे ही खूप आव्हानात्मक बाब करताना दिसून येत आहे. लष्करी अळीमुळे मक्याचा जो काही पोंगा असतो तो जळतो व त्यामुळे पूर्ण पीक खराब होऊन उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येऊ शकते.
परंतु आता मका पिकावरील लष्करी अळीला प्रतिबंध करता यावा याकरिता बारामती येथील डॉ. शरद चंद्र पवार कृषी महाविद्यालयातील एका विद्यार्थिनी आणि प्राध्यापक यांनी मिळून मक्यावरील खोड पोखरणाऱ्या लष्करी अळीवर प्रतिबंध करण्यासाठी औषधाची निर्मिती केली आहे व याला रक्षाबेट असे नाव देण्यात आला आहे.
रक्षाबेट करेल आता मका पिकावरील खोड पोखरणाऱ्या लष्करी अळीचा प्रतिबंध
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुणे जिल्ह्यातील बारामती येथील डॉ.शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीने आणि प्राध्यापकाने मिळून मक्यावरील खोड पोखरणाऱ्या लष्करी अळीवर नियंत्रण मिळवता यावे याकरिता एका औषधाची निर्मिती केली आहे व याला रक्षा बेट असे नाव देण्यात आलेले आहे.
हे औषध मक्याच्या गाभ्यात किंवा पोंग्यात टाकल्यानंतर लष्करी अळीचा प्रतिबंध करता येणे शक्य होणार आहे. मका पिकावर लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी ज्या काही रासायनिक कीटकनाशकांच्या फवारण्या केल्या जातात त्या कीटकनाशकांचे अंश जनावरांसाठी तयार करण्यात येणाऱ्या मुरघासामध्ये दिसून येतो व त्यामुळे दुधाच्या गुणोत्तर देखील त्याचा विपरीत परिणाम होतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर विषारी रक्षा बेटची निर्मिती करण्यात आली आहे.
या महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्वाती आणि प्राध्यापक डॉ. सुमेधा शेजुळ पाटील यांनी वनस्पतींमधील विषारी घटकांचा वापर करून या अळीला कसे मारता येईल यावर संशोधन केले व त्याच घटकापासून कीटकशास्त्र विभागाच्या प्राध्यापकांनी मिळून रक्षा बेटची निर्मिती केली.
कसा केला जाईल या रक्षा बेटचा वापर?
लष्करी अळी ही मका पिकासाठी खूपच घातक असते. ही अळी मका पिकाच्या पोंग्यात शिरते व पोंगा पोखरते व त्यामुळे पोंगा जळून जातो व पिकाची वाढ खुंटते. जेव्हा मका पिकाची वाढीची अवस्था असते तेव्हा पोंग्यामध्ये या विषारी असलेल्या रक्षा बेटची मात्रा सोडली तर या अळीवर नियंत्रण करता येऊ शकते असा दावा या प्राध्यापकाने केला आहे.
रक्षा बेट या विषारी औषधाच्या शोधापासून मक्यावरील लष्करी अळीवर नियंत्रण करता येऊ शकते व या अळीचे प्रादुर्भावामुळे मका पिकाचे जे काही नुकसान होते त्या नुकसानीपासून वाचता येणार आहे. तसेच इतर रासायनिक कीटकनाशकांचा वापरामुळे गाय किंवा म्हशीच्या दुधामध्ये जे काही रसायनांचे प्रमाण आढळून येत आहे त्यावर उपाय म्हणून देखील रक्षा बेट खूप फायद्याचे ठरणार आहे.
अजून या औषधावर प्रयोग सुरू असल्याची माहिती प्रा.डॉ. अतुल गोंडे कृषी महाविद्यालय बारामती यांनी दिली आहे. या रक्षाबेट गोळीमध्ये वनस्पती पासून मिळवलेले विषारी घटक असून हे घटक थोडेसे जर अळीच्या शरीरात गेले तरी अळी मरते अशी देखील माहिती समोर आली आहे.