Dairy Business: IAS नव्हे, तर दूध व्यवसायिक! आहे 1 कोटीच्या बंगल्याचा मालक… वाचा गणेश बोरसे यांचा हटके प्रवास
Farmer Success Story:- जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर कोणतेही क्षेत्र गाजवता येते, हे जालना जिल्ह्यातील मांडवा गावातील गणेश बारसे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. त्यांनी पारंपरिक दुग्ध व्यवसायाला आधुनिक व्यवस्थापनाची जोड देऊन तो अधिक फायदेशीर बनवला. त्यांच्या 25 जाफराबादी म्हशींपैकी 12 ते 15 म्हशी दररोज दूध देतात आणि एक म्हैस साधारणपणे 12 ते 14 लिटर दूध देते. त्यामुळे त्यांना दिवसाला 150 ते 160 लिटर दूध उत्पादन मिळते.
हे दूध विक्रीसाठी त्यांना 60 ते 65 रुपये प्रति लिटर दर मिळतो, ज्यामुळे दररोज 10 ते 12 हजार रुपयांचे उत्पन्न निर्माण होते. त्यातील 50 टक्के उत्पन्न म्हशींचे खाद्य, मेंटेनन्स आणि इतर खर्चावर खर्च केले जात असले तरीही त्यांना दिवसाला 5 ते 6 हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळतो. महिन्याच्या हिशोबाने पाहता हा नफा 1.5 लाख रुपयांपर्यंत जातो. त्यांच्या दुग्ध व्यवसायाच्या या सातत्यपूर्ण यशामुळेच त्यांनी आपल्या गोठ्याशेजारी 1 कोटी रुपये खर्चून आलिशान बंगला बांधला आहे.
सगळ्या कुटुंबाचा हातभार
बारसे कुटुंबातील सर्वच सदस्य या व्यवसायात सक्रियपणे सहभागी आहेत. त्यांच्या व्यवसायात एक महिला आणि एक पुरुष अशा दोन लोकांना त्यांनी रोजगारही दिला आहे. सकाळी पाच वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत म्हशींची काळजी घेतली जाते. दूध काढण्यापासून ते त्याच्या विक्रीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर नियोजनबद्ध पद्धतीने काम केले जाते. दूध विक्रीतून होणाऱ्या उत्पन्नाबरोबरच बोरसे कुटुंबाने त्यांच्या चार ते पाच एकर शेतीत वैरणेचीही विशेष व्यवस्था केली आहे.
यामुळे त्यांना बाहेरून वैरण खरेदी करावी लागत नाही, परिणामी त्यांच्या व्यवसायाच्या खर्चात मोठी बचत होते. तसेच, अतिरिक्त वैरण लागल्यास ते बाजारातून पुरवठा करतात, ज्यामुळे त्यांचा खर्च संतुलित राहतो. व्यवसायाच्या वाढत्या उत्पन्नामुळे त्यांनी आपल्या जीवनशैलीत मोठा बदल घडवून आणला आहे आणि आपल्या गोठ्याच्या शेजारी 1 कोटी रुपयांचा बंगला उभा केला आहे.
आजकालच्या तरुणांसाठी प्रेरणादायी
आज अनेक तरुण चांगल्या नोकऱ्यांच्या शोधात भटकत असताना गणेश बारसे यांनी शेती व दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबनाचे उदाहरण घालून दिले आहे. केवळ 10 ते 15 हजार रुपये पगाराच्या नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, आधुनिक तंत्रज्ञान आणि स्मार्ट व्यवस्थापनाचा वापर करून अधिक फायदा मिळवावा, असा सल्ला त्यांनी तरुणांना दिला आहे. व्यवसायात सातत्य, मेहनत आणि योग्य नियोजन केल्यास कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येते, हे बारसे यांच्या यशस्वी प्रवासातून शिकण्यासारखे आहे.