Crop Management: कमी पाण्यात जास्त नफा! मार्चमध्ये ‘हे’ पीक लावा आणि 45 दिवसात होईल लाखोंची कमाई
Crop Management:- काकडी हे कमी वेळेत आणि कमी पाण्यात जास्त उत्पन्न देणारे फायदेशीर पीक आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला थंडावा देणाऱ्या पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते आणि यामध्ये काकडी हा आहाराचा महत्त्वाचा घटक बनला आहे. पोषणमूल्यांनी समृद्ध असलेल्या काकडीचा वापर मुख्यतः सलाड आणि विविध खाद्यपदार्थांमध्ये केला जातो, त्यामुळे बाजारात त्याला वर्षभर चांगली मागणी असते.
वाढती मागणी पाहता शेतकऱ्यांना काकडी लागवडीद्वारे मोठा आर्थिक लाभ मिळवण्याची संधी आहे. हे पीक विशेषतः गरम आणि कोरड्या हवामानात चांगले उत्पादन देते. भारतात विविध भागांमध्ये काकडीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते, विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाळ्यात याचे उत्पादन होते. मात्र, चांगल्या उत्पादनासाठी कोरडे आणि उष्ण हवामान अधिक फायदेशीर असते.
काकडीच्या चांगल्या उत्पादनासाठी आवश्यक गोष्टी
काकडीच्या चांगल्या उत्पादनासाठी मध्यम ते भारी माती उपयुक्त असून, जमिनीत पाण्याचा निचरा चांगला होणे आवश्यक आहे. लागवडीपूर्वी जमिनीची योग्य मशागत करणे महत्त्वाचे असते. खोल नांगरणी करून माती भुसभुशीत करावी, तसेच 8-10 टन कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून आवश्यक पोषकतत्त्वांचा पुरवठा करावा.
उन्हाळी हंगामासाठी 60 ते 75 सेमी अंतरावर स-या तयार करून प्रत्येक फूटावर एका बियाची पेरणी करावी. खरीप हंगामासाठी प्रत्येकी 3 मीटर अंतरावर 60 सेमी रुंदी आणि 30 सेमी खोलीचे चर तयार करावेत. चरांच्या दोन्ही बाजूंना 90 सेमी अंतरावर रोपांच्या ओळी तयार कराव्यात. याशिवाय, 30 × 30 × 30 सेमी आकाराचे खड्डे तयार करून त्यामध्ये 2 ते 4 किलो शेणखत मिसळावे आणि प्रत्येक आळ्यात 3 ते 4 बिया योग्य अंतरावर लावाव्यात.
उत्तम सिंचन प्रणाली आवश्यक
काकडीच्या चांगल्या उत्पादनासाठी सिंचन व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. पेरणीनंतर त्वरित पाणी द्यावे आणि उन्हाळ्यात आठवड्यातून 2-3 वेळा पाणी देणे आवश्यक असते. ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास पाण्याची बचत होते आणि उत्पादन वाढते.
खत व्यवस्थापन महत्त्वाचे
खत व्यवस्थापनात पेरणीपूर्वी नत्र (N) 50 किलो, स्फुरद (P) 25 किलो आणि पालाश (K) 25 किलो प्रति एकर द्यावे. तसेच, पेरणीनंतर 20 दिवसांनी युरिया 25 किलो प्रति एकर द्यावा. कीड आणि रोग व्यवस्थापनासाठी योग्य उपाय करणे आवश्यक आहे. फळमाशीपासून बचावासाठी डायमेथोएट (30 EC) 1 मि.ली./लिटर फवारावे, तर भुरी रोगावर नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम 1 ग्रॅम/लिटर वापरावा. लागवडीनंतर साधारणतः 45-50 दिवसांत पहिली तोडणी करता येते. देशी वाणामधून 50-60 क्विंटल प्रति एकर तर हायब्रिड वाणामधून 80-100 क्विंटल प्रति एकर उत्पादन मिळते.
उन्हाळ्यात मिळतो चांगला बाजारभाव
उन्हाळ्यात काकडीला चांगला बाजारभाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना प्रति एकर 60,000 ते 1,00,000 रुपये नफा मिळू शकतो. कमी वेळेत उत्पन्न मिळवणारे आणि कमी खर्चात जास्त फायदा देणारे पीक म्हणून काकडी लागवड फायदेशीर ठरते. योग्य हवामान, नियोजन आणि तंत्रज्ञान वापरून शेतकरी वर्षभर चांगले उत्पन्न मिळवू शकतात.