Cow Purchase Tips: तुम्हीही दुग्धव्यवसाय सुरू करणार आहात? गाय खरेदी करण्याआधी ही माहिती वाचा.. नाहीतर होईल मोठे नुकसान
Dairy Business:- दुग्धव्यवसाय हा अत्यंत फायदेशीर व्यवसाय असून, त्यासाठी योग्य प्रजातीची आणि उत्तम आरोग्याची जनावरे निवडणे आवश्यक असते. गायीचे दूध आणि त्यापासून तयार होणारे तूप, दही, पनीर यांना अधिक पौष्टिक मानले जाते, त्यामुळे गायींच्या पालनावर अनेक शेतकरी आणि दुग्ध व्यावसायिक भर देतात.
भारतात गीर, साहिवाल, कांकरेज, हरियाणा अशा ५३ जातींच्या गायी आढळतात आणि प्रत्येक प्रजातीच्या गायींमध्ये दूध उत्पादन क्षमता वेगळी असते. जर तुम्ही लहान किंवा मोठ्या प्रमाणावर दुग्धव्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर गायी खरेदी करताना काही महत्त्वाच्या बाबींची तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे.
गाय खरेदी करण्याअगोदर या गोष्टींची काळजी घ्या
गाईची शारीरिक रचना
गायीच्या शारीरिक रचनेवर तिच्या आरोग्याचा आणि उत्पादकतेचा मोठा प्रभाव असतो. गाय निरोगी आहे की नाही हे समजण्यासाठी तिच्या हालचाली, शरीरसौष्ठव आणि डोळ्यांची चमक याकडे विशेष लक्ष द्यावे. गायीचे शरीर सुडौल आणि पाचराच्या आकाराचे असले पाहिजे, कारण अशा प्रकारच्या शरीररचनेमुळे तिचे पोषण आणि दूध उत्पादन योग्य पद्धतीने होते. तिची चाल लयबद्ध आणि प्रभावी असावी, तसेच डोळे तेजस्वी आणि मान पातळ असावी.
जे तिच्या उत्तम आरोग्याचे लक्षण आहे. याशिवाय, गायीच्या कासेची रचना महत्त्वाची असते. कास पोटाला व्यवस्थित चिकटलेली असावी, तसेच तिच्या त्वचेवर रक्तवाहिन्यांचे जाळे स्पष्ट दिसले पाहिजे. हे लक्षण गायीच्या जास्त दूध उत्पादन क्षमतेचे संकेत देते. तसेच, कासेचे चारही भाग (सड) व्यवस्थित सीमांकित झालेले असणे आवश्यक आहे, जेणेकरून ती योग्य प्रमाणात दूध देऊ शकेल.
गायीच्या वंशाचा इतिहास आणि दूध उत्पादन क्षमता
गायीची निवड करताना तिच्या वंशाचा इतिहास आणि दूध उत्पादन क्षमता तपासणेही तितकेच महत्त्वाचे असते. शुद्ध जातीच्या गायी अधिक टिकाऊ आणि दुधाळ असतात, तसेच त्या तुलनेने कमी आजारी पडतात. त्यामुळे, ज्या व्यापाऱ्याकडून किंवा शेतकऱ्याकडून प्राणी खरेदी करत आहात, त्यांनी त्या प्राण्याच्या वंशाचा संपूर्ण तपशील द्यावा. शिवाय, गायीने किती वेळा बाळंतपण केले आहे, यावरही तिच्या दूध उत्पादनाची क्षमता अवलंबून असते. पहिल्या ते पाचव्यांदा व्यायलेल्या गायी सर्वाधिक दूध देतात. त्यामुळे जास्त दूध मिळवण्यासाठी एक किंवा दोनदा व्यायलेली गाय खरेदी करणे योग्य ठरते.
प्रत्यक्ष दूध उत्पादन तपासणे
दुग्धव्यवसायात जास्तीत जास्त नफा मिळवायचा असेल, तर गाय खरेदी करताना तिचे प्रत्यक्ष दूध उत्पादन तपासणे आवश्यक आहे. त्यासाठी गाय खरेदी करण्यापूर्वी तिचे दोन्ही वेळा दूध काढून पाहावे, म्हणजे तिची उत्पादन क्षमता खरी आहे की नाही हे स्पष्ट होईल. काही वेळा व्यापारी किंवा दलाल चुकीची माहिती देतात, त्यामुळे दोन-तीन दिवस शेतात जाऊन गायीचे निरीक्षण करणे आणि तिच्या खऱ्या दूध उत्पादन क्षमतेची पडताळणी करणे फायद्याचे ठरेल.
गाय खरेदीचा योग्य कालावधी
दुभत्या गायींची खरेदी करण्यासाठी योग्य काळ देखील निवडणे आवश्यक असते. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे महिने जनावरे खरेदीसाठी सर्वोत्तम मानले जातात, कारण या कालावधीत गायी प्रजननक्षम असतात आणि दूध उत्पादनाच्या सर्वोच्च टप्प्यावर असतात. वासरू झाल्यानंतर साधारण ९० दिवसांत गायीचे दूध उत्पादन सर्वाधिक असते, त्यामुळे योग्य वेळेत खरेदी केल्यास चांगला नफा मिळू शकतो.
योग्य गायीची निवड केल्यास दुग्धव्यवसाय यशस्वी होऊ शकतो, तसेच संभाव्य फसवणुकीपासून बचाव होऊ शकतो. त्यामुळे गायीच्या आरोग्याची संपूर्ण तपासणी, तिच्या उत्पादन क्षमतेचे परीक्षण आणि वंशाचा योग्य अभ्यास केल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका.