शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ; आणखी इतके दिवस कापूस बाजारात मंदी राहणार, वाचा सविस्तर
Cotton Rate : देशात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कापूस उत्पादनात आपल्या महाराष्ट्राचाही मोठा वाटा आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश या तीन विभागांमध्ये कापसाचे उत्पादन सर्वात जास्त घेतले जाते. पण गेल्या दोन वर्षांपासून कापसाला अपेक्षित बाजार भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढत आहे.
आता यंदाचा हंगाम सुरु होऊन जवळपास दोन अडीच महिन्यांचा काळ उलटला आहे. मात्र तरीही कापसाचे दर दबावातच आहेत. कापसाला सध्या देशातील बाजारात सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे.
दुसरीकडे खेडा खरेदीत याहीपेक्षा कमी दर मिळतोय. खेडा खरेदीमध्ये शेतकऱ्यांना फक्त ६ हजार ५०० ते ७ हजारांचा भाव मिळत आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत पण कापसाच्या भावातील ही स्थिती आणखी महिनाभर राहणार असा अंदाज आहे.
आणखी एका महिन्यानंतर बाजारभावात वाढ होण्याची शक्यता आहे तोपर्यंत दरात काहिसे चढ उतार होत राहतील. बाजार अभ्यासकांनी सांगितल्याप्रमाणे जानेवारी महिन्यापर्यंत बाजारातील आवक जास्त राहते. त्यानंतर आवक कमी होत असते.
आवक कमी झाल्यानंतर सहाजिकच बाजाराला आधार मिळणार आहे. एकदा देशातील उत्पादनाची स्थिती स्पष्ट झाल्यानंतर दरात सुधारणा होऊ शकते, असा एक अंदाज आहे. यावर्षी कापसाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे आणि वापर वाढणार असे म्हटले जात आहे.
या पार्श्वभूमीवर आणखी एका महिन्यानंतर कापसाचे दर सुधारू शकतात. त्यामुळे तोपर्यंत शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री करावी. ज्यांना थांबता येईल त्यांनी कापसाची विक्री थांबवली पाहिजे. तसेच जर शेतकऱ्यांना अडचण असेल तर त्यांनी आपल्याकडील सर्वच कापूस विकू नये.
कापसाची विक्री टप्प्याटप्प्याने करावी आणि हमीभावापेक्षा कमी दरात कापसाची विक्री टाळावी असा सल्ला यावेळी बाजार अभ्यासकांनी दिलेला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या बाजारात रोज १ लाख ८० हजार ते १ लाख ९० हजार गाठींच्या दरम्यान कापसाची आवक होत आहे.
म्हणजे आवक शिगेला पोहचलीय. याचाच परिणाम हा बाजारावर होतोय अन कापूस भाव दबावात आलेत. त्यातच सध्या सुताला उठाव कमी असल्याचे सांगितले जात आहे.
पण अशा चर्चा शेतकऱ्यांचा माल बाजारात आल्यानंतर सुरु होतातच, त्यात नविन काही नाही. पण सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कापडाला उठाव नाही, अनेक देशात आर्थिक परिस्थिती चांगली नाही, असेही म्हटले जात आहे.
यामध्ये थोड्याफार प्रमाणात तथ्य आहे मात्र ही परिस्थिती आणखी थोडे दिवस राहणार आहे यानंतर परिस्थिती पुन्हा चांगली होणार आहे. त्यामुळे आगामी काळात कापसाचे दर वाढण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.