महाराष्ट्रातील ‘या’ बाजारात कापसाला मिळाला सर्वाधिक 8000 रुपयाचा भाव ! वाचा सविस्तर
Cotton Rate Maharashtra : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कापूस हे राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील एक महत्वाचे पीक आहे. या पिकावर राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. दरवर्षी विजयादशमीपासून बाजारांमध्ये नव्या कापसाची आवक वाढत असते.
यंदाही विजयादशमीपासून बाजारात नवीन कापूस आवक होत आहे. मात्र बाजारांमध्ये अगदी सुरुवातीपासूनच कापसाचे दर दबावात होते. अशातच आता अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डावर कापसाची खरेदी करण्याला सुरुवात झाली आहे. या बाजारात नुकतीच कापूस खरेदी सुरुवात झाली असून मुहूर्ताच्या चार क्विंटल कापसाला व्यापाऱ्यांनी आठ हजारांचा दर देऊन खरेदी केली.
हा दर उच्चांकी असल्याचे सांगितले जात आहे. या वेळी मुहूर्ताच्या चार क्विंटल कापसाला रुपये आठ हजार रुपये एवढा उच्चांकी भाव मिळाला आहे. तर सरासरी भाव हा ७४५० ते ७५२१ पर्यंत नमूद करण्यात आला आहे.
कापूस खरेदी-विक्रीच्या उद्घाटन प्रसंगी अॅड. श्रीरंग अरबट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील गावंडे, बाजार समितीचे उपसभापती राजाभाऊ कराळे, बाजार समितीचे संचालक बाळासाहेब हिंगणीकर, संचालक बाळासाहेब वानखडे, संचालक कांचनमाला गावंडे, संचालक साहेबराव भदे, संचालक गजानन देवतळे व शेतकरी उपस्थित होते.
खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून कापसाचे बाजार भाव दबावात आहेत. अनेक बाजारांमध्ये कापसाला हमीभाव एवढा ही दर मिळत नाहीये. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत असून पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता येत नाहीये.
पण, आता दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला 8000 चा भाव मिळाला असल्याने आगामी काळात कापसाचे दर आणखी वाढतील अशी आशा व्यक्त होत आहेत. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा यामुळे पल्लवी झाले आहेत. मात्र हा कापसाचा मुहूर्ताचा भाव होता. यामुळे आगामी काळात कापसाचे बाजार भाव कसे राहणार हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.