Cotton News: कापूस उत्पादनात मोठी घसरण… शेतकरी चिंतेत, सरकारचा अंदाज काय सांगतो?
Cotton News:- देशात यंदा सोयाबीनचे उत्पादन विक्रमी पातळीवर पोचून १५१ लाख टन झाले आहे, तर कापूस उत्पादनात मोठी घट होऊन २९४ लाख गाठींपर्यंत कमी झाले आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या २०२४-२५ वर्षासाठीच्या दुसऱ्या सुधारित अंदाजानुसार भात, गहू, मका आणि भुईमूग यासारख्या प्रमुख पिकांचे उत्पादनही विक्रमी पातळीवर पोहोचले आहे.
सरकारच्या अंदाजानुसार गव्हाचे उत्पादन विक्रमी १ हजार १५४ लाख टन होईल. तूर उत्पादन ३५ लाख टनांवर आणि हरभरा उत्पादन ११५ लाख टनांवर पोहोचण्याची शक्यता आहे. खरिप हंगामात देशात एकूण १ हजार ६६३ लाख टन अन्नधान्य उत्पादन झाले, तर रब्बी हंगामात १ हजार ६४५ लाख टन उत्पादन झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
भात आणि मका उत्पादनाचा अंदाज
भाताचे उत्पादन दोन्ही हंगामांत विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. खरिपात १ हजार २०६ लाख टन भात उत्पादन झाले, तर रब्बी हंगामात १५७ लाख टनांचे उत्पादन झाले. यंदा गव्हाच्या उत्पादनातही वाढ झाली असून ते १ हजार १५४ लाख टनांवर पोहोचेल, असा अंदाज आहे, जो मागील हंगामातील १ हजार १३२ लाख टनांच्या तुलनेत अधिक आहे. मका उत्पादनातही विक्रमी वाढ झाली असून खरिप हंगामात २४८ लाख टन उत्पादन झाले आहे, तर रब्बी हंगामात १२४ लाख टनांपर्यंत उत्पादन होण्याची शक्यता आहे.
भरडधान्य, ज्याला 'श्रीअन्न' म्हणतात, त्याचे उत्पादनही वाढले आहे. खरिपात १३७ लाख टन आणि रब्बीत जवळपास ३१ लाख टन उत्पादन झाल्याचा अंदाज आहे. मसूरचे उत्पादन १८ लाख टनांवर पोहोचले आहे. भुईमूग उत्पादनातही मोठी वाढ झाली असून खरिपात १०४ लाख टनांचे विक्रमी उत्पादन झाले, तर रब्बीत जवळपास ९ लाख टन उत्पादन होईल, असा सरकारचा अंदाज आहे.
तूर आणि हरभरा उत्पादन स्थिर राहण्याचा अंदाज
तूर आणि हरभरा उत्पादन मात्र स्थिर राहण्याची शक्यता आहे. दुसऱ्या अंदाजानुसार, तूर उत्पादन ३५ लाख टनांवर तर हरभरा उत्पादन ११५ लाख टनांवर कायम राहील, असे सरकारने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे यंदा सोयाबीन उत्पादन विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. मागील हंगामात सोयाबीनचे उत्पादन १३० लाख टन होते, तर यंदा ते वाढून १५१ लाख टनांवर पोहोचल्याचे सरकारने नमूद केले आहे.
कापूस उत्पादनात मात्र घट
दुसरीकडे, कापूस उत्पादनात मात्र मोठी घट झाली आहे. मागील हंगामात देशात ३२५ लाख गाठी कापूस उत्पादन झाले होते. मात्र, पहिल्या अंदाजानुसार यंदा २९९ लाख गाठी उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. आता सुधारित अंदाजानुसार, हे उत्पादन आणखी घसरून २९४ लाख गाठींवर स्थिरावेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. या आकडेवारीनुसार, देशात प्रमुख अन्नधान्य आणि तेलबिया पिकांचे उत्पादन विक्रमी पातळीवर असले तरी कापूस उत्पादकांसाठी ही घसरण चिंतेची बाब ठरू शकते.