CIBIL स्कोर हलक्यात घेताय? होऊ शकते तब्बल 19 लाखांचे नुकसान!.. ‘हे’ 5 उपाय करा आणि सिबिल स्कोर सुधारा
CIBIL Score:- CIBIL स्कोअर हा कोणत्याही व्यक्तीच्या आर्थिक सवयी आणि पत क्षमता दर्शवणारा महत्त्वाचा घटक आहे. सरकारी आणि खाजगी बँकांकडून कर्ज मिळवण्यासाठी चांगला CIBIL स्कोअर असणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुमचा CIBIL स्कोअर खराब असेल, तर तुम्हाला कर्ज मिळण्यात अडथळे येऊ शकतात किंवा कर्जावर अधिक व्याजदर भरावा लागू शकतो. गृहकर्ज किंवा कोणत्याही मोठ्या कर्जाच्या बाबतीत, CIBIL स्कोअर चांगला असल्यास तुम्हाला कमी व्याजदराने कर्ज मिळते,
तर कमी स्कोअर असल्यास तुम्हाला जास्त व्याज भरावे लागू शकते. उदाहरणार्थ, जर तुमचा CIBIL स्कोअर ८२० असेल आणि तुम्ही २० वर्षांसाठी ५० लाखांचे गृहकर्ज घेतले, तर तुम्हाला ८.३५% दराने कर्ज मिळेल आणि तुम्ही एकूण १.०३ कोटी रुपये भराल. मात्र, जर तुमचा स्कोअर फक्त ५८० असेल, तर तुम्हाला हेच कर्ज १०.७५% दराने मिळेल आणि तुम्हाला १८.८२ लाख रुपये अधिक भरावे लागतील. यामुळे CIBIL स्कोअर चांगला ठेवणे अत्यावश्यक ठरते.
सिबिल स्कोर म्हणजे काय?
CIBIL स्कोअर हा तीन अंकी क्रमांक असतो, जो ३०० ते ९०० या श्रेणीत असतो. नव्याने कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा स्कोअर सुरुवातीला शून्य असतो, आणि नियमित हप्ते वेळेवर भरल्यास तो वाढतो. मात्र, हप्ते थकले किंवा कर्जफेड लांबणीवर टाकली, तर स्कोअर कमी होतो. बँक आणि वित्तीय संस्था याच स्कोअरच्या आधारावर ग्राहकाच्या पत क्षमता ठरवतात.
कमी स्कोअर असल्यास बँका मोठ्या धोका मानतात आणि कर्ज मंजूर करताना अधिक व्याजदर लावतात. केवळ कर्जच नव्हे, तर विमा कंपन्याही CIBIL स्कोअरचा विचार करतात. जर तुमचा स्कोअर खराब असेल, तर विमा कंपन्या जास्त प्रीमियम आकारू शकतात, कारण अशा परिस्थितीत त्यांना अधिक दावा भरावा लागू शकतो. त्यामुळे अनेक विमा कंपन्या कमी CIBIL स्कोअर असलेल्या व्यक्तींना विमा देण्यास टाळाटाळ करतात.
सिबिल स्कोर कमी होण्याची कारणे
CIBIL स्कोअर कमी होण्याची अनेक कारणे आहेत. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे कर्जाचा हप्ता किंवा क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर न भरणे. याशिवाय, एकाच वेळी खूप साऱ्या कर्जांसाठी अर्ज करणे, क्रेडिट कार्डची मर्यादा पूर्ण क्षमतेने वापरणे आणि आर्थिक शिस्त न पाळणे यामुळे स्कोअर नकारात्मक होतो.
CIBIL स्कोअर सुधारण्यासाठी काही महत्त्वाची पावले उचलावी लागतात. सर्वप्रथम, घेतलेले कर्ज किंवा क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. क्रेडिट कार्ड मर्यादेच्या ३०% पेक्षा जास्त खर्च करू नये, वारंवार असुरक्षित कर्ज घेऊ नये आणि जर कधीही कर्ज घेतले नसेल, तर एक छोटे कर्ज घेऊन ते वेळेवर परत करून क्रेडिट इतिहास तयार करावा.
सिबिल स्कोर सुधारण्यासाठी लागणारा कालावधी
CIBIL स्कोअर सुधारण्यासाठी काही महिन्यांपासून ते वर्षभराचा कालावधी लागू शकतो. एकदा स्कोअर कमी झाल्यास, तो सुधारण्यासाठी बँक आणि RBI च्या नियमांचे काटेकोर पालन करावे लागते. चांगल्या आर्थिक सवयींचा अवलंब केल्यास आणि वेळेवर आर्थिक जबाबदाऱ्या पार पाडल्यास CIBIL स्कोअर सुधारला जाऊ शकतो, त्यामुळे भविष्यात कर्ज घेण्याच्या प्रक्रियेत कोणत्याही अडचणी येणार नाहीत.