केवळ 20 हजाराची गुंतवणूक.. 9 लाख कोटींची कंपनी! सायकल पार्ट्सपासून ते Airtel पर्यंत.. वाचा सुनील मित्तल यांचा भन्नाट प्रवास
Business Success Story:- जर तुमच्याकडे जिद्द आणि मेहनतीची तयारी असेल, तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे भारती एअरटेलचे संस्थापक आणि चेअरमन सुनील भारती मित्तल. केवळ २०,००० घेत व्यवसाय सुरू करणाऱ्या या उद्योजकाने आज देशातील चौथ्या सर्वात मोठ्या कंपनीचे नेतृत्व केले आहे. त्यांच्या या प्रवासात अनेक संघर्ष आले, पण त्यांनी प्रत्येक आव्हानावर मात करत यशाचं शिखर गाठलं.
लुधियानाच्या गल्लीबोळांपासून उद्योगविश्वातील शिखरापर्यंतचा प्रवास
२३ ऑक्टोबर १९५७ रोजी पंजाबच्या लुधियाना येथे जन्मलेले सुनील मित्तल हे एका प्रतिष्ठित कुटुंबातून आले. त्यांचे वडील सतपाल मित्तल हे दोन वेळा खासदार होते, पण राजकारणात जाण्याऐवजी सुनील यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी वडिलांकडून फक्त ₹२०,००० घेत सायकल पार्ट्सचा व्यवसाय सुरू केला. तीन वर्षांत त्यांनी तीन युनिट्स उभारल्या, पण त्यांना वाटलं की यात फारसं भविष्य नाही. त्यामुळे त्यांनी हा व्यवसाय विकून इलेक्ट्रिक जनरेटरचा व्यापार सुरू केला. १९८३ मध्ये सरकारने जनरेटरच्या आयातीवर बंदी घातली आणि त्यांचा व्यवसाय ठप्प झाला.
टेलिकॉममध्ये मोठी संधी आणि एअरटेलचा जन्म
१९९२ मध्ये भारत सरकारने पहिल्यांदाच मोबाईल सेवा परवान्यांसाठी अर्ज मागवले. सुनील मित्तल यांनी या संधीचं सोनं केलं आणि परवाना मिळवला. यानंतर १९९५ मध्ये त्यांनी भारती सेल्युलर लिमिटेडची स्थापना करून "एअरटेल" ब्रँड बाजारात आणला.
२००८ पर्यंत एअरटेल देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी बनली. पण २०१६ मध्ये मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओने मोफत डेटा आणि कॉलिंग सेवा सुरू करून मोठा धक्का दिला. यामुळे अनेक टेलिकॉम कंपन्या बंद झाल्या, काही कंपन्यांना विलीन व्हावं लागलं, पण एअरटेल टिकून राहिली आणि पुन्हा जोमाने उभी राहिली.
आजचे एअरटेल – देशातील टॉप ४ कंपन्यांपैकी एक!
आज भारती एअरटेल ९.२६ लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह भारतातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मौल्यवान कंपनी आहे. केवळ रिलायन्स इंडस्ट्रीज, HDFC बँक आणि TCS या कंपन्या त्यांच्यापुढे आहेत.
सुनील मित्तल यांची संपत्ती आज २२.५ अब्ज डॉलर्स आहे आणि ते भारतातील सर्वात श्रीमंत उद्योजकांपैकी एक आहेत. एअरटेलच्या यशस्वी वाटचालीमुळे आज त्यांच्या व्यवसायाचा विस्तार १७ देशांमध्ये असून ४९ कोटींहून अधिक ग्राहक आहेत.
कठीण काळातही संयम आणि दूरदृष्टी – यशाचं रहस्य
सुनील मित्तल यांचा प्रवास सिद्ध करतो की आवश्यक असते ती मेहनत, चिकाटी आणि संधी ओळखण्याची क्षमता. जिथे अनेक कंपन्या टिकू शकल्या नाहीत, तिथे एअरटेलने स्वतःला पुन्हा उभं केलं. एका छोट्याशा व्यवसायातून अब्जावधींच्या कंपनीपर्यंतचा त्यांचा प्रवास प्रत्येक उद्योजकासाठी प्रेरणादायी आहे