Business Success Story: फक्त 2 हजारातून उभारला 15 कोटींचा बिझनेस! सेंद्रिय शेतीपासून करोडोंचा व्यवसाय… वाचा अजित चौधरी यांचा प्रवास
Farmer Success Story:- मोठे यश मिळवण्यासाठी सतत मेहनत घेणं आणि आपल्या ध्येयावर ठाम राहणं किती महत्त्वाचं असतं, हे आनंदी ग्रीन्सचे संस्थापक अजित चौधरी यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. त्यांनी एका छोट्या खोलीतून आपला व्यवसाय सुरू केला आणि आज त्यांचा ब्रँड भारताच्या क्रमांक एकच्या ग्रीन गार्डनिंग उत्पादनांमध्ये गणला जातो. त्यांच्या कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी केवळ २ हजार रुपयांपासून सुरुवात करून तब्बल १५ कोटी रुपयांचा व्यवसाय उभारला.
बागकामाची आवड आईकडून मिळाली, बालपणापासूनच ग्रीन गार्डनिंगचा शौक
२ जुलै १९८२ रोजी इंदूर, मध्यप्रदेश येथे जन्मलेले अजित चौधरी यांना लहानपणापासूनच बागकामाची आवड होती.त्यांची आई त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या बिया आणून द्यायची आणि अजित त्या कुंड्यांमध्ये लावायचे. सरकारी नोकरीमुळे त्यांचे वडील नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी बदल्या होणाऱ्या घरात राहत असत. त्यामुळे अजितने आपल्या गच्चीवर बाग तयार करण्यास सुरुवात केली. त्यांची बागकामाची आवडच पुढे त्यांच्या व्यवसायाचा पाया बनली.
कोविडच्या संकटातून नवीन संधी निर्माण
आनंदी ग्रीन्स सुरू करण्याआधी अजित आणि त्यांच्या पत्नीने वेलनेस सेंटर चालवले होते. मात्र, कोविडच्या लॉकडाऊनमध्ये त्यांचा हा व्यवसाय पूर्णतः ठप्प झाला. अशा कठीण परिस्थितीतही अजित खचले नाहीत. त्यांनी आपलं जुनं ज्ञान आणि आवड एकत्र करून सेंद्रिय शेती आणि ग्रीन गार्डनिंगचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या, पण त्यांनी धैर्याने प्रत्येक आव्हानाचा सामना केला. आज त्यांचा व्यवसाय Amazon वर ४.३ रेटिंगसह भारतात क्रमांक एकवर आहे.
ग्रो बॅग्सची कल्पना आणि त्यातून उभा राहिलेला यशस्वी व्यवसाय
शहरांमध्ये टेरेस गार्डनिंग करताना अनेकांना समस्या जाणवतात – कुंड्या खूप जड असतात आणि उत्पादन मर्यादित असतं. यावर उपाय म्हणून अजितने ग्रो बॅग्ज बनवण्याची कल्पना मांडली. ही कल्पना इतकी प्रभावी ठरली की त्यांनी यावर स्वतःचा व्यवसाय उभा केला. आज आनंदी ग्रीन्स भारतातील नंबर वन ग्रो बॅग विक्रेता बनला आहे.
सेंद्रिय शेती आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोन
आज बाजारात मिळणाऱ्या भाजीपाला आणि फळांमध्ये मोठ्या प्रमाणात रसायनं आणि केमिकल्सचा वापर केला जातो, जे आरोग्यास हानिकारक ठरतात. यावर उपाय म्हणून अजितने नैसर्गिक खतं आणि सेंद्रिय शेती विकसित करण्यावर भर दिला. आनंदी ग्रीन्सच्या सर्व उत्पादनांमध्ये कोणतीही रासायनिक प्रक्रिया नाही. त्यामुळेच त्यांची उत्पादने पर्यावरणपूरक आणि ग्राहकप्रिय ठरत आहेत.
महिला सक्षमीकरणाला दिलेला हातभार
फक्त पर्यावरणपूरक शेतीच नव्हे, तर महिला सक्षमीकरणासाठीही आनंदी ग्रीन्स मोठे योगदान देत आहे. त्यांच्या कंपनीत ८०% कर्मचारी महिला आहेत. अजित यांना वाटतं की महिलांनीही स्वावलंबी व्हायला हवं आणि त्यांना योग्य संधी मिळायला हवी. यामुळेच त्यांच्या व्यवसायाने अनेक महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
स्पर्धा वाढली, पण टिकला फक्त आनंदी ग्रीन्स
२०१८ मध्ये ग्रो बॅग्सपासून सुरू झालेला हा प्रवास आज एका मोठ्या यशस्वी ब्रँडमध्ये रूपांतरित झाला आहे. कोविड दरम्यान अनेक नवे स्पर्धक बाजारात आले, पण टिकू शकला तो फक्त आनंदी ग्रीन्स! याचं कारण म्हणजे अजितचा सातत्याने नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न आणि ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्याचा ध्यास.
यशस्वी उद्योजक होण्यासाठी अजित चौधरींचे मंत्र
अजित यांच्या मते, कोणताही व्यवसाय सुरू करताना हे तीन महत्त्वाचे घटक लक्षात ठेवायला हवेत:
स्वतःच्या कामावर विश्वास ठेवा आणि सातत्य ठेवा.बाजारात टिकायचं असेल तर नेहमी नवीन शिकत राहा आणि सुधारणा करत राहा.केवळ पैसे कमावण्यावर भर न देता ग्राहकांचा विश्वास जिंकण्यावर लक्ष द्या.
स्वतःच्या मेहनतीवर भर, मागे वळून पाहिले नाही
अजित यांचा प्रवास हा प्रत्येक तरुण उद्योजकासाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे. केवळ २ हजार रुपयांपासून सुरू केलेला व्यवसाय आज १५ कोटींच्या टप्प्यावर पोहोचला आहे. यामध्ये त्यांची मेहनत, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाची भूमिका बजावतो. कोणत्याही परिस्थितीत हार न मानता मेहनत करत राहिल्यास यश नक्कीच मिळते, हे अजित यांनी स्वतःच्या प्रवासातून दाखवून दिले आहे