इगतपुरी जवळ बांधला जाणार 85 किमीचा ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे! शेती आणि उद्योग क्षेत्राला कसा होईल फायदा?
Samruddhi Expressway:- महाराष्ट्रामध्ये सध्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू असून या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राला येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर औद्योगिक तसेच कृषी व या माध्यमातून अनेक आर्थिक बाबींच्या संबंधित खूप मोठा फायदा होणार आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक रस्ते प्रकल्प सुरू आहेत व त्याशिवाय अनेक वेगवेगळे प्रकल्पांची कामे सुरू असून जेव्हा ही कामे पूर्णत्वास येतील तेव्हा महाराष्ट्राच्या विकासामध्ये खूप मोठा हातभार लागणार आहे.
या सगळ्या प्रकल्पांमध्ये जर आपण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई ते नागपूर तयार करण्यात आलेल्या समृद्धी महामार्ग बघितला तर हा महामार्ग महाराष्ट्राच्या विकासासाठी खूप महत्त्वपूर्ण असून भारतातील सर्वात जास्त लांबीचा द्रुतगती महामार्ग म्हणून देखील ओळखला जातो.
सध्या नागपूर ते नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी असा 625 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे व इगतपुरी ते आमणे हा ७६ किलोमीटरचा शेवटचा टप्पा देखील आता पूर्ण झाला असून लवकरात लवकर तो देखील वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल अशी एक शक्यता आहे व या महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हे अंतर पार करण्यासाठी अवघे आठ तास लागणार आहेत.
परंतु याही पुढे जात आता या समृद्धी महामार्गाला इगतपुरी ते वाढवण डीप सी पोर्ट म्हणजेच वाढवण बंदराला जोडण्याकरिता 85 किमीचा प्रवेश नियंत्रित ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे बांधण्याची प्लॅनिंग आता एमएसआरडीसीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे.
समृद्धी महामार्गाला कनेक्ट केला जाणारी इगतपुरी जवळ 85 किमीचा ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे
महाराष्ट्रातील जर आपण महत्त्वाकांक्षी प्रकल्प बघितले तर यामध्ये वाढवण बंदर हा एक अतिशय महत्त्वाचा असा प्रकल्प असून या बंदराचे वैशिष्ट्य म्हणजे समुद्रकिनाऱ्यावर वीस मीटरपेक्षा जास्त खोली असलेले हे भारतातील एकमेव नैसर्गिक बंदर आहे. कितीही मोठे कंटेनर असले तरी या ठिकाणी सहजपणे येऊ शकतात.
जेव्हा हे बंदर पूर्णपणे उभारले जाईल तेव्हा 298 मिलियन टन क्षमतेचे हे भारतातील तेराव्या क्रमांकाचे बंदर असणार आहे व हे बंदर पूर्णपणे विकसित झाल्यानंतर जगातील प्रमुख 10 कंटेनर पोर्ट देशांच्या यादीमध्ये भारताचे नाव झळकणार आहे.
त्यामुळे या महत्त्वाच्या असलेल्या वाढवण बंदराशी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जिल्हे कनेक्ट करता यावे त्या दृष्टिकोनातून राज्य सरकार प्रयत्न करत आहे व त्यामुळेच आता समृद्धी महामार्ग वाढवण बंदराला कनेक्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्याकरिता मुंबई ते नागपूर या समृद्धी एक्सप्रेस वेला इगतपुरी ते वाढवण बंदर थेट जोडता यावे याकरिता नवीन 85 किलोमीटरचा प्रवेश नियंत्रित ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे बांधण्याची योजना एमएसआरडीसी तयार करत असून या प्रकल्पाचा डीपीआर देखील आता तयार करण्यात आला आहे व मंजुरीकरिता लवकरात लवकर राज्य मंत्रिमंडळाकडे सादर केला जाण्याची शक्यता आहे.
हा जो नवीन ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे उभारला जाईल तो इगतपुरी जवळून सुरू होईल आणि NH48 महामार्गावर चारोटी जवळ जोडला जाईल. म्हणजेच मुंबईची जी वाहतूक आहे ती पूर्णपणे टाळून नागपूर ते वाढवण बंदरापर्यंत मालाची वाहतूक करणे अत्यंत सोपे जाईल.
जेव्हा आता राज्य मंत्रिमंडळाची या नवीन एक्सप्रेस वे साठी मान्यता मिळेल.त्यानंतर या एक्सप्रेस वे साठी लागणारे भूसंपादन सुरू केले जाणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.