Bird Flu ने धडकी भरवली! महाराष्ट्रात पसरतोय बर्ड फ्लूचा संसर्ग…. प्रशासनाकडून अलर्ट जारी, नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
Bird Flu:- महाराष्ट्रात 'बर्ड फ्लू'चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, राज्य सरकारने 'हाय अलर्ट' जारी केला आहे. कारंजा तालुक्यातील खेर्डा जिरापुरे येथे एका पोल्ट्री फार्ममध्ये मोठ्या प्रमाणावर कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. २० ते २५ फेब्रुवारीदरम्यान या फार्ममधील तब्बल ८ हजार कोंबड्यांपैकी ७ हजार ५५२ कोंबड्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर जिल्ह्यात संसर्ग पसरण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत. अकोला येथील प्रयोगशाळेने घेतलेल्या नमुन्यांच्या चाचणीत बर्ड फ्लूची पुष्टी झाली असून, पुण्यातील भारतीय कृषी अनुसंधान परिषद-राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान आणि भोपाळच्या प्रयोगशाळेनेही हे निष्कर्ष मान्य केले आहेत.
या पार्श्वभूमीवर संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्या असून, तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समित्या गठीत केल्या आहेत. या समित्यांमध्ये पशुधन विकास अधिकारी, गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, वनपरिक्षेत्र अधिकारी आणि अन्य संबंधित अधिकारी यांचा समावेश आहे.
बर्ड फ्लूचा संसर्ग कसा होतो?
बर्ड फ्लू हा प्रामुख्याने पक्ष्यांमधून पसरतो. कोंबड्या, टर्की, मोर आणि इतर पक्ष्यांच्या संपर्कातून हा विषाणू वेगाने संक्रमित होतो. आतापर्यंत एच५ एन१ आणि एच७ एन९ हे दोन प्रकार अधिक धोकादायक मानले जात होते, मात्र आता एच५ एन८ देखील त्याच यादीत सामील झाला आहे. हा विषाणू डोळे, कान, तोंड आणि श्वसनमार्गातून शरीरात प्रवेश करतो आणि काही गंभीर प्रकरणांमध्ये माणसांमध्येही संक्रमणाची शक्यता असते.
बर्ड फ्लूची लक्षणे कोणती?
या आजाराची लक्षणे सुरुवातीला सौम्य असली तरी काही प्रकरणांमध्ये ती गंभीर रूप धारण करू शकतात. सातत्याने ताप येणे, कफ आणि नाक वाहणे, डोकेदुखी, घशाला सूज येणे, पोटदुखी आणि उलट्या होणे, श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे, तसेच निमोनियासारखी लक्षणे दिसू शकतात.
काय घ्यावी खबरदारी?
संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. संक्रमित पक्षी किंवा त्यांच्या विष्ठेच्या संपर्कात येणे टाळावे. जंगली पक्षी, कुक्कुटपालन केलेले पक्षी किंवा अन्य पाळीव प्राण्यांशी असुरक्षित संपर्क येणार नाही, याची दक्षता घ्यावी. कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या जवळ जाणे टाळावे.
प्रशासनाची मोठी जबाबदारी
बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने त्वरित कठोर उपाययोजना सुरू केल्या असून, प्रभावित भागात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पोल्ट्री फार्म्समध्ये स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणावर विशेष भर दिला जात आहे. नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.