Best Scooters: मायलेजमध्ये हिरो, स्टाईलमध्ये किंग! सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप ५ स्कूटर.. कोणती तुमची फेव्हरेट?
Top Scooters In India:- भारतीय बाजारपेठेत दुचाकींसाठी मोठी मागणी आहे, आणि त्यात स्कूटर्सचा मोठा वाटा आहे. हलक्या आणि सोयीस्कर असण्याबरोबरच, आता स्कूटर्सही स्टायलिश आणि पॉवरफुल होत आहेत. अनेक कंपन्या विविध प्रकारच्या स्कूटर्स बाजारात आणत आहेत, ज्या उत्तम मायलेज, आधुनिक तंत्रज्ञान आणि मजबूत परफॉर्मन्ससह येतात. जर तुम्ही नवीन स्कूटर घेण्याचा विचार करत असाल, पण बजेटमध्ये परवडणारा आणि सर्वोत्तम पर्याय शोधत असाल, तर आम्ही तुम्हाला टॉप ५ स्कूटर्सबद्दल सांगणार आहोत.
भारतातील टॉप पाच स्कूटर
Hero Xoom १६०
Hero Xoom 160 ही हिरो मोटोकॉर्पची दमदार स्कूटर आहे, जी भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मध्ये लॉन्च करण्यात आली. १५६ सीसी लिक्विड-कूल्ड इंजिन असलेल्या या स्कूटरमध्ये ८,००० आरपीएमवर १४.६ बीएचपी आणि ६,५०० आरपीएमवर १२.९ एनएम टॉर्क निर्माण करण्याची क्षमता आहे. १४-इंचाच्या चाकांसह आणि १५५ मिमी ग्राउंड क्लीयरन्समुळे ही स्कूटर खडबडीत रस्त्यांवरही उत्तम चालते. ७८७ मिमी सीट उंचीसह ७ लिटर क्षमतेची इंधन टाकीही देण्यात आली आहे. ही स्कूटर १,४८,५०० च्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे.
Yamaha Aerox १५५
Yamaha Aerox १५५ ही स्पोर्टी आणि परफॉर्मन्स ओरिएंटेड स्कूटर असून ती परवडणाऱ्या श्रेणीत येणाऱ्या सर्वात पॉवरफुल स्कूटर्सपैकी एक आहे. यात १५५ सीसी लिक्विड-कूल्ड इंजिन आहे, जे ८,००० आरपीएमवर १४.७ बीएचपी आणि ६,५०० आरपीएमवर १३.९ एनएम टॉर्क निर्माण करते. ७९० मिमी सीट उंची, १४५ मिमी ग्राउंड क्लीयरन्स आणि ५.५ लिटरची इंधन टाकी यामुळे ती लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी योग्य आहे. आकर्षक लुक आणि दमदार इंजिन असलेल्या या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत १,५२,७५० आहे.
Aprilia SR १६०
Aprilia SR १६० ही परफॉर्मन्ससाठी ओळखली जाणारी स्कूटर आहे. १६०.०३ सीसी इंजिन असलेल्या या स्कूटरमध्ये ७,१०० आरपीएमवर ११.११ बीएचपी आणि ५,३०० आरपीएमवर १३.४४ एनएम टॉर्क उपलब्ध आहे. रेसिंग इन्स्पायर्ड डिझाइन आणि ३० मिमी फ्रंट फोर्क्स तसेच मागील बाजूस मोनोशॉक असल्याने ही स्कूटर चांगली स्टेबल राहते. Aprilia च्या मते, ही स्कूटर अवघ्या ७.५ सेकंदात ०-६० किमी प्रतितास वेग पकडते, त्यामुळे ती रेसिंग प्रेमींसाठी उत्तम पर्याय ठरते. महाराष्ट्रात या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत १,३०,३७८ आहे.
Vespa १२५
Vespa १२५ ही क्लासिक लुक आणि प्रीमियम डिझाइनसाठी प्रसिद्ध आहे. Piaggio ने १२५ सीसी सेगमेंटमध्ये नव्याने अपडेट केलेली Vespa लाँच केली असून ती उत्तम बिल्ड क्वालिटी आणि मजबूत इंजिनसह येते. ही स्कूटर ७,१०० आरपीएमवर ९.३ बीएचपी आणि ५,६०० आरपीएमवर १०.१ एनएम टॉर्क निर्माण करते. यामध्ये २०० मिमी फ्रंट डिस्क ब्रेक आणि १४० मिमी ड्रम ब्रेक असल्यामुळे ब्रेकिंग जबरदस्त आहे. Vespa च्या सीटची उंची ७७० मिमी आहे, तर ७.४ लिटर इंधन टाकी देण्यात आली आहे. या स्कूटरची महाराष्ट्रातील एक्स-शोरूम किंमत १,३२,५०० पासून सुरू होते.
TVS Ntorq १२५
TVS Ntorq १२५ ही १२५ सीसी सेगमेंटमधील सर्वात स्पोर्टी स्कूटर मानली जाते. यात १२४.८ सीसीचे सिंगल-सिलेंडर, फ्युएल-इंजेक्टेड इंजिन आहे, जे ७,००० आरपीएमवर ९.३ बीएचपी आणि ५,५०० आरपीएमवर १०.६ एनएम टॉर्क निर्माण करते. या स्कूटरचा टॉप स्पीड ९० किमी प्रतितास आहे आणि ती ८.९ सेकंदात ०-६० किमी प्रतितास वेग गाठते. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, डिजिटल डिस्प्ले आणि आधुनिक तंत्रज्ञानासह येणारी ही स्कूटर ₹८६,९८२ च्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे.