बाळकृष्ण अण्णांनी वयाच्या सत्तरीत अन्न प्रक्रिया उद्योगात गाठले यशाचे शिखर! चक्की फ्रेश आटा उत्पादनातून करतात लाखोंची कमाई
Success Story:- तुम्हाला जर कुठलीही गोष्ट मिळवायची असेल तर तुमचे वय यामध्ये अडसर ठरत नाही. फक्त तुम्हाला जी गोष्ट मिळवायची आहे किंवा जे ध्येय साध्य करायचे आहे ते मिळवण्यासाठी लागणारी जबर इच्छाशक्ती, त्याकरिता करावे लागणारे प्रयत्न व त्यांच्यामधील सातत्य आणि जीवतोड मेहनत करण्याची तयारी असेल तर कुठल्याही वयात व्यक्ती यशस्वी होऊ शकतो.
हाच मुद्दा जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर सांगली जिल्ह्यातील रेणावी या गावचे बाळकृष्ण पांडुरंग यादव यांचे घेता येईल. आज त्यांचे वय 70 वर्ष असून ते शेती देखील करतात व त्यांच्याकडे दहा एकर शेती आहे.
मुळातच अगोदर पासून त्यांच्या वडिलांच्या मुंबईमध्ये कोळसाच्या वखारी होत्या व त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती चांगली होती. तेव्हा ते वडिलांना मुंबईमध्ये त्यांच्या व्यवसायात मदत करत होते. परंतु कालांतराने त्यांनी 1983 ते 84 या कालावधीमध्ये गावी यायचे ठरवले व सुरू झाला जीवनाचा पुढचा प्रवास.
1983- 84 मध्ये सुरू केला शेती व्यवसाय
बाळकृष्ण यादव यांनी मुंबई सोडली आणि गावी परत आले. गावी परत आल्यानंतर शेती करावी तर शेती समोर अनेक प्रकारच्या समस्या होत्या. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गावामध्ये वीजच नव्हती व त्यामुळे बागायती शेती कशी करता येईल हा एक मोठा प्रश्न होता.
परंतु तेव्हा तरुणपण असल्यामुळे त्यांचा अभ्यास आणि जिद्द खूप मोठी होती व त्यातूनच त्यांनी कार्यक्रमांमध्ये द्राक्ष लागवड करून शेती करायला सुरुवात केली व पाण्यासाठी कुपनलिका घेऊन त्यावर इंजिन बसवून पाणी व्यवस्थापन केले. द्राक्षाचे दर्जेदार उत्पादन हाती आले व पुढे द्राक्ष बागायतदार अशी स्वतःची ओळख त्यांनी निर्माण केली.
कालांतराने दुष्काळी परिस्थितीमुळे द्राक्ष बाग काढला व केळी पीक लागवडीचा प्रयोग केला व इतकेच नाही तर पशुपालन व्यवसायात देखील ते शिरले. पुढे राजकारणात देखील त्यांनी पाऊल ठेवले व त्यामुळे शेतीकडे दुर्लक्ष झाले व त्यामुळे कुटुंबाला आर्थिक समस्या भासायला लागल्यावर त्यांनी स्वतः याचे आत्मपरीक्षण केले व राजकारणापासून अलिप्त होऊन शेती करण्याला प्राधान्य दिले.
नंतरच्या काळात मुलांची मदत घेऊन सूतगिरणी उभारली व त्याच्यात देखील ते सपशेल अपयशी ठरले व डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला. त्यामुळे कुटुंबासाठी उदरनिर्वाह म्हणून काहीतरी ठोस उपाययोजना करायला त्यांनी सुरुवात केली व नेमके काय करावे
या विचारातूनच अन्नप्रक्रिया उद्योगात उतरण्याचा त्यांनी निर्णय घेतला व युट्युब किंवा इतर माध्यमातून त्यांनी अशा व्यवसायांचा शोध घेतला व त्यांना सापडला गव्हापासून आटा निर्मिती करण्याचा उद्योग व इथूनच त्यांचा प्रवास सुरू झाला अन्नप्रक्रिया उद्योगाच्या दिशेने.
अशा पद्धतीने सुरू केला स्वतःचा स्टार्टअप
अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यापूर्वी त्यासाठी लागणारा आवश्यक कच्चामाल, तो कशा पद्धतीने उपलब्ध आहे आणि बाजारपेठेतील दर इत्यादी बाबींचा सखोल अभ्यास त्यांनी केला आणि याकरिता थेट मध्य प्रदेश व पंजाब या राज्यांमध्ये जाऊन गव्हाच्या बाजारपेठाना भेटी दिल्या. त्यानंतर कृषी विभागाच्या माध्यमातून त्यांनी पंतप्रधान अन्नप्रक्रिया उद्योग योजनेची माहिती घेतली
या प्रकल्पाची किंमत 30 लाख होती व त्यासाठी 35 टक्के अनुदान मिळवण्यासाठी व प्रशिक्षण देण्यासाठी आत्मा विभागाच्या माध्यमातून त्यांना मदत झाली व भांडवल उपलब्ध झाल्यानंतर आवश्यक यंत्रे राजकोट येथून खरेदी करून विटा शहरापासून पाच किलोमीटरवर घानवड येथील औद्योगिक वसाहतीत भाडेतत्त्वावर जागा घेऊन माऊली फुड्स नावाने प्रक्रिया उद्योगाचा स्टार्टअप 2022-23 मध्ये सुरू केला.
अशाप्रकारे सुरू आहे त्यांचा अन्नप्रक्रिया उद्योग
सुरुवातीला त्यांनी जे पीठ तयार केले त्याचा वापर घरी केला व पिठाचे नमुने काही मित्रांना देखील दिले. त्याच्यातून गुणवत्ता कोणत्या पद्धतीची राखावी हे त्यांना समजले व काही चुका झाल्या त्या स्वतःच्या अभ्यासातून त्यांनी सुधारल्या.
सध्या ते भारतीय खाद्य निगमच्या ई-लिलाव यंत्रणेतून मिरज येथून गव्हाची खरेदी करतात आणि बाकीचा गहू पंजाब आणि मध्य प्रदेश व स्थानिक शेतकऱ्यांकडून खरेदी करतात. दिवसाला अडीच ते तीन टन गव्हावर प्रक्रिया होते व 100 किलो गव्हापासून 88 किलो पर्यंत आटा तयार होतो.
उरलेले दहा टक्के घटक भुसा व फोलपटाचे असतात व हे देखील स्थानिक पशुपालकांना 24 रुपये किलोदराने विक्री केले जाते व आटा व्यतिरिक्त यातून देखील त्यांना अतिरिक्त असे उत्पन्न मिळते.
विक्री व्यवस्थापनातील हे मुद्दे व्यवसायाच्या यशाला ठरले फायद्याचे
त्यांचा बोलका स्वभाव उत्पादनाच्या मार्केटिंगमध्ये खूप फायद्याचा ठरला. सुरुवातीला ते दुकानांमध्ये तयार केलेला आटा घेऊन जायचे व त्याचे वैशिष्ट्ये आणि गुणवत्ता कशी आहे हे विक्रेत्यांना व्यवस्थित समजून सांगायचे. त्यानंतर विक्रेते एक बॅग ठेवून जा असे त्यांना सांगत व अशा पद्धतीने हळूहळू गुणवत्ता लक्षात येऊ लागल्यामुळे मागणी देखील वाढायला लागली.
हळूहळू खूप मोठे मार्केट आज त्यांचे तयार झाले. सध्याला दिवसभरात कोणत्या ग्राहकांकडून कशा पद्धतीच्या ऑर्डर्स आहेत त्याच्या नोंदी ते पाहतात व त्यानुसार उत्पादन व विक्रीचे नियोजन करतात.
सगळी विक्री रोख स्वरूपात करण्यावर भर देतात. त्यामुळे भांडवलाची कमतरता त्यांना भासत नाही व प्रक्रिया उद्योग म्हटला म्हणजे कच्च्या मालाची उपलब्धता कायम राहील या दृष्टीने ते कायम प्रयत्नशील असतात.
तसेच गुणवत्तेमध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड करत नाहीत. आज जर आपण त्यांचा व्यवसाय बघितला तर तासगाव तसेच खटाव, आटपाडी आणि खानापूर या तालुक्यात मिळून सुमारे 200 दुकानात माऊली ब्रँडचा आटा विक्री केला जातो
परिसरातील ग्राहक तर जागेवर येऊन खरेदी करतात. आज त्यांना या व्यवसायात त्यांच्या दोन्ही मुलांची खूप मुलांची मदत होते व ते स्वतः व्यवसायात राबवत असल्याने व्यवसाय भरभराटीला पोहोचलेला आहे.
यावरून आपल्याला दिसून येते की, आपल्यामध्ये जर इच्छा असेल आणि काहीतरी मिळवण्यासाठी कुठल्याही पद्धतीचे कष्ट करण्याची तयारी असेल तर व्यक्ती कुठल्याही वयात यशस्वी होतो व यशामध्ये वयाचे बंधन येत नाही हे बाळकृष्ण अण्णांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते.