महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ७३३ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर ! कोणत्या जिल्ह्यासाठी किती कोटी रुपयांचा निधी ?
वर्ष २०२३, महाराष्ट्रासहित सबंध भारताने दुष्काळ अनुभवला, दुष्काळामुळे राज्यावर पाण्याचे मोठे संकट पाहायला मिळाले. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुष्काळाची झळ अधिक दिसत होती. कोकणात तुलनेने दुष्काळाचे प्रमाण कमी वाटत असले तरी देखील दुष्काळामुळे कोकणातील शेतकऱ्यांचे सुद्धा नुकसान झाले होते. गेल्या वर्षी मात्र परिस्थिती उलट दिसली.
२०२४ च्या मान्सून काळात महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण सामान्य पेक्षा अधिक राहिले. कमी दिवसात जास्त पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले शेती पिक हातातून गेले. जुलै ते ऑक्टोबर २०२४ मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरसदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली. दरम्यान या काळात राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते, अतिवृष्टी आणि पुरामुळे ज्या शेतकऱ्यांचे शेती पिक खराब झाले होते त्या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.
याबाबतचा शासन निर्णय नुकताच निर्गमित झाला आहे. त्यामुळे या संबंधित शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार अशी आशा आहे. दरम्यान आता आपण कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी किती नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे? याबाबत माहिती पाहणार आहोत. नमस्कार मी…. आणि तुम्ही पाहत आहात कृषी मराठी हे आमचं नवं यूट्यूब चैनल.
मित्रांनो, जुलै ते ऑक्टोबर २०२४ या काळात अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या राज्यातील तब्बल सहा लाख शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाने ७३३ कोटी ४५ लाख ८४ हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे. याबाबतचा शासन निर्णय २८ फेब्रुवारी २०२५ रोजी निर्गमित करण्यात आला असून यात कोणत्या जिल्ह्यात साठी किती निधी मंजूर आहे हे सुद्धा नमूद आहे.
यात राज्यातील पाच विभागांमधील २२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. खरंतर नुकसान ग्रस्त भागातील शेतकऱ्यांचा पंचनामा करून याबाबतचा प्रस्ताव जिल्हास्तरावर आणि जिल्हास्तरावरून हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे आणि पुढे विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून हा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला होता. त्यानुसार कोकण, नागपूर, अमरावती, पुणे आणि नाशिक विभागातील शेतकरी मदतीस पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरण प्रणालीतून बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे.
तसेच १ जानेवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दोन हेक्टर ऐवजी आता कमाल ३ हेक्टरच्या मर्यादेत निधी देण्यात येणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना तीन हेक्टर जमिनीपर्यंत नुकसान भरपाई मिळू शकणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळू शकतो अन झालेल्या नुकसानाची पूर्ण भरपाई नाही पण शेतकऱ्यांना किंचित आधार मिळणार आहे. आता आपण कोणत्या जिल्ह्यासाठी किती नुकसान भरपाई मंजूर झाली आहे हे पाहूया.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यासाठी सर्वाधिक ३०० कोटी ३५ लाख रुपये, नाशिकसाठी १९३ कोटी ७ लाख ८ रुपये, जळगाव जिल्ह्यासाठी १४४ कोटी ८९ लाख ९ हजार रुपये, अकोला जिल्ह्यासाठी २२ कोटी ७३ लाख, वर्धा जिल्ह्यासाठी ११ कोटी ७६ लाख, पालघरसाठी ९ कोटी ६७ लाख रुपये, धुळे जिल्ह्यासाठी ९ कोटी १९ लाख ३६ हजार रुपये, नागपूरसाठी १० कोटी, गडचिरोलीसाठी २ कोटी ३९ लाख ७९ हजार रुपये, यवतमाळसाठी ४८ लाख रुपये, सांगलीसाठी ८ कोटी ५ लाख रुपये, पुणे जिल्ह्यासाठी २ कोटी ६० लाख रुपये, ठाण्यासाठी ३ लाख २ हजार, रायगडसाठी ३ लाख २५ हजार रुपये, रत्नागिरीसाठी १ लाख २१ हजार आणि सिंधुदुर्गसाठी ५ लाख २ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
पण मंडळी तुम्हाला शासनाच्या या निर्णयाबाबत काय वाटतं हे आम्हाला नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या विषयावर.