Agriculture News: महात्मा फुले कृषी विद्यापीठाची नवी देणगी! ४१३ क्विंटल उत्पन्न देणारा फुले गौरव वाण बाजारात
Agriculture News:- महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेला दुधी भोपळ्याचा आर.एच.आर.बी.जी.-५४ (फुले गौरव) हा सुधारित वाण अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (भाजीपाला पिके) या योजनेच्या वार्षिक आढावा बैठकीत राष्ट्रीय पातळीवर प्रसारित करण्यात आला आहे. या नव्या वाणाची लागवड आता मध्य प्रदेश, गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांतील शेतकरी करू शकतील.
३ ते ५ मार्च दरम्यान पंजाब कृषी विद्यापीठ, लुधियाना येथे झालेल्या या वार्षिक आढावा बैठकीत देशभरातील ६० संशोधन प्रकल्पांचे ४०० हून अधिक शास्त्रज्ञ उपस्थित होते. पंजाब कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सनबिर सिंग घोंसाल, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सहसंचालक डॉ. संजय सिंग, संशोधन संचालक डॉ. ए.एस. धट, प्रकल्प समन्वयक डॉ. राजेश कुमार,
उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. टी.एस. धिल्लोन, ए.डी.जी. डॉ. सुधाकर पांडे, तसेच वाराणसी येथील भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेचे संचालक डॉ. एन. राय आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के.ई. लवांडे यांच्यासह देशभरातील विविध संशोधन केंद्रांमधील तज्ज्ञांनी बैठकीत सहभाग घेतला.
दुधी भोपळ्याच्या सुधारित वाणाला मिळाली मान्यता
या बैठकीत महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या भाजीपाला संशोधन प्रकल्पाच्या प्रतिनिधींनी भाग घेतला. भाजीपाला संशोधन प्रकल्पाचे डॉ. बी. टी. पाटील, डॉ. शर्मिला शिंदे, प्रा. चिमाजी बाचकर आणि डॉ. शालीग्राम गांगुर्डे हे शास्त्रज्ञ या महत्त्वपूर्ण बैठकीत सहभागी झाले. या चर्चेदरम्यान भाजीपाला लागवडीसंबंधी, बीजोत्पादन आणि पीक संरक्षणाच्या एकूण सहा शिफारशी मंजूर करण्यात आल्या.
विशेषतः महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या भाजीपाला संशोधन प्रकल्पाने विकसित केलेला दुधी भोपळ्याचा सुधारित वाण आर.एच.आर.बी.जी.-५४ (फुले गौरव) हा राष्ट्रीय पातळीवर प्रसारित करण्यास मान्यता देण्यात आली. हा वाण डॉ. बी.टी. पाटील, वाय.आर. पवार आणि डॉ. एस.ए. अनारसे या शास्त्रज्ञांनी विकसित केला आहे.
या संशोधनासाठी विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. शरद गडाख, माजी कुलगुरू कै. डॉ. पी.जी. पाटील, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, माजी संशोधन संचालक डॉ. एस.डी. गोरंटीवार, तसेच माजी विभाग प्रमुख डॉ. श्रीमंत रणपिसे यांनी महत्वपूर्ण मार्गदर्शन आणि पाठबळ दिले. प्रकल्पाच्या यशस्वी वाटचालीत विद्यापीठातील कामगार वर्ग, शास्त्रज्ञ आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा मोठा सहभाग असून, हा वाण विकसित करताना त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे, असे प्रतिपादन डॉ. बी. टी. पाटील यांनी केले.
फुले गौरव वाणाची वैशिष्ट्ये
आर.एच.आर.बी.जी.-५४ (फुले गौरव) या सुधारित वाणाची काही वैशिष्ट्ये म्हणजे या वाणाची फळे मध्यम लांबीची असून, ती २७ ते ३० सें.मी. पर्यंत वाढतात. या वाणाचे फळ दंडगोलाकार असून सरासरी वजन ५४० ते ५५० ग्रॅम इतके आहे. विशेष म्हणजे हा वाण भुरी आणि केवडा या प्रमुख रोगांपासून प्रतिकारक्षम आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळण्यास मदत होईल.
संशोधनानुसार, या वाणाचे हेक्टरी सरासरी उत्पन्न ४१३ क्विंटल इतके आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादनक्षम आणि फायदेशीर ठरणारा हा वाण ठरणार आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेला हा नवीन वाण देशभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरेल, असा विश्वास संशोधन संघाने व्यक्त केला आहे.