शेतकऱ्यांनो, खिल्लार बैल विकत घ्यायचा विचार करताय? सगळ्यात आधी ‘या’ टिप्स वाचा.… होईल फायदा
Agriculture News: सांगोल्यातील खिल्लार गाई-बैलांचा बाजार हा पशुपालक आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. सांगोल्याच्या दुष्काळी आणि हलक्या जमिनीच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी डाळिंब शेतीच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य मिळवले, त्याचप्रमाणे खिल्लार गाई-बैलांच्या बाजारानेही मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होताना दिसते. हा बाजार संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच कर्नाटकातील विजापूर, बेळगाव, गुलबर्गा आणि आंध्रप्रदेशमधील हैदराबाद येथून येणाऱ्या शेतकरी आणि व्यापार्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.
कसा आहे सांगोल्याचा बाजार?
सांगोल्यातील हा बाजार तब्बल ४२ एकर जागेवर पसरलेला असून, १९६० मध्ये स्थापन झालेल्या बाजार समितीच्या मार्गदर्शनाखाली तो यशस्वीरीत्या चालतो. बाजारात खिल्लार गाई, बैल, संकरित गाई, म्हशी तसेच शेळ्या-मेंढ्यांचे स्वतंत्र विभाग आहेत, ज्यामुळे खरेदीदारांना सहजगत्या योग्य जनावरे निवडता येतात. संपूर्ण परिसराला कुंपण असल्याने सुरक्षिततेची उत्तम व्यवस्था आहे. खरेदी-विक्री व्यवहार सुरळीत पार पडावा म्हणून मोठे पत्र्याचे शेड लिलावासाठी उभारण्यात आले आहेत, तसेच जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि विजेची पुरेशी सोय उपलब्ध आहे.
हा बाजार मुख्यतः रविवारी भरतो, पण शनिवारीच दुपारपासूनच येथे गजबज सुरू होते. अनेक व्यापारी आणि शेतकरी स्वतः किंवा विश्वासू व्यक्तींकरवी जनावरे मैदानात आणतात. रविवारी पहाटेपासूनच खरेदी-विक्री व्यवहाराला सुरुवात होते आणि दुपारपर्यंत बाजाराची रणधुमाळी सुरूच असते. फक्त बैल आणि गाईंचीच नव्हे, तर शेळ्या आणि मेंढ्यांचीही मोठ्या प्रमाणावर विक्री केली जाते.
खरेदी-विक्रीदरम्यान जनावरांची सखोल तपासणी केली जाते. गाय किंवा बैल कसे चालतात, त्यांची कास, वशिंड, कान, तसेच कासेजवळील शिरा यांची तपासणी केली जाते. बैलांच्या बाबतीत दातांची पाहणी करून त्यांच्या वयाचा अंदाज घेतला जातो. अनुभवी व्यापारी आणि शेतकरी आपल्या निरीक्षणाच्या जोरावर जनावरांची किंमत ठरवतात आणि सौदे पार पडतात.
गेल्या काही महिन्यातील खरेदी विक्रीच्या नोंदी
गेल्या काही महिन्यांतील बाजाराच्या नोंदी पाहता, डिसेंबर महिन्यात ७,२२६ जनावरे दाखल झाली, त्यापैकी ५,०३४ जनावरे विकली गेली. जानेवारीत ५,७३५ जनावरे आली आणि ४,१३५ विक्री झाली. फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत ५,८६५ जनावरांची आवक झाली असून, त्यापैकी ४,१७९ जनावरे विकली गेली. यात सर्वाधिक विक्री झालेली जनावरे म्हणजे ३,६९५ खिल्लार बैल, ५,७२० संकरित गाई, २०१ खिल्लार बैल आणि २,७३२ म्हशी.
सध्या बाजारात खिल्लार गाईंसाठी २० ते ४० हजार, संकरित गाईंसाठी ४० ते ६० हजार, बैलांसाठी ५० ते ७० हजार आणि म्हशींसाठी ८० हजार ते १.५ लाख रुपये असे दर आहेत. मात्र, पाणीटंचाई आणि चाऱ्याची कमतरता असल्याने सध्याचे दर काहीसे स्थिर राहिले आहेत.
महाराष्ट्रात अनेक प्रकारच्या बैलांच्या जाती आढळतात, पण खिल्लार जातीचे बैल शेतीसाठी अधिक उपयोगी आणि कार्यक्षम मानले जातात. हे बैल पांढऱ्या शुभ्र रंगाचे, दणकट आणि चपळ असतात. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि सांगोला भागात या जातीचे बैल मोठ्या प्रमाणात संगोपन केले जाते. शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असण्यासोबतच बैलगाडा शर्यतींसाठीही या बैलांना मोठी मागणी असते.
खिल्लार बैलांच्या मागणीत वाढ
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यात आल्यानंतर खिल्लार बैलांची मागणी आणखी वाढली आहे. सर्वोच्च न्यायालयाने काही अटींसह बैलगाडा शर्यतीस परवानगी दिल्यामुळे, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परिणामी, महाराष्ट्र आणि कर्नाटकातून विशेषतः बैलगाडा शर्यतीसाठी खोंडांची खरेदी मोठ्या प्रमाणावर सांगोल्याच्या बाजारात केली जाते.
सांगोल्याचा हा बाजार केवळ जनावरांची खरेदी-विक्री करण्याचे ठिकाण नाही, तर शेतकरी, व्यापारी आणि पशुपालकांसाठी एक महत्त्वाचा व्यासपीठ आहे, जिथे विविध भागांतील लोक एकत्र येऊन अनुभवांची देवाण-घेवाण करतात. त्यामुळेच हा बाजार पशुपालन आणि कृषी व्यवसायासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे.