Agriculture Land Rule: शेतकऱ्यांनो, जमिनीवरील बंधने काढा… जाणून घ्या भोगवटादार वर्ग-2 वरून वर्ग-1 मध्ये रूपांतर कसे करावे?
Agriculture Land Rule:- ‘कुळ कायदा’ हा शेतकऱ्यांच्या जमिनीवरील हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि जमीन मालकीसंबंधित गैरव्यवहार रोखण्यासाठी लागू करण्यात आला आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कसत असलेल्या जमिनीवर कायदेशीर हक्क मिळतात. कुळ म्हणजे असे शेतकरी, जे जमीनमालकाकडून जमीन कसण्यासाठी घेतात आणि शेती करतात. या कायद्याची सुरुवात 1939 मध्ये झाली, ज्याने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीवर कायदेशीर अधिकार दिले. पुढे 1948 मध्ये लागू झालेल्या मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमाचे 2012 मध्ये ‘महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम’ असे नामांतर करण्यात आले.
कुळांचे तीन प्रकार
या कायद्यानुसार, कुळांचे तीन प्रकार आहेत – कायदेशीर कुळ, संरक्षित कुळ आणि कायम कुळ. ‘कायदेशीर कुळ’ ही संज्ञा अशा शेतकऱ्यांसाठी वापरली जाते, जे मालकाच्या संमतीने शेती करतात आणि नियमित भाडे भरतात. हे शेतकरी जमीनमालकाच्या नियंत्रणाखाली नसतात आणि त्यांचा हक्क कायद्याने संरक्षित असतो. ‘संरक्षित कुळ’ हे 1939 च्या कायद्याअंतर्गत दिलेल्या निकषांनुसार ठरतात.
ज्यांनी 1 जानेवारी 1938 पूर्वी सलग सहा वर्षे किंवा 1 जानेवारी 1945 पूर्वी सहा वर्षे शेती केली असेल किंवा 1 नोव्हेंबर 1947 रोजी शेती करत असतील, त्यांना संरक्षित कुळाचा दर्जा मिळतो. त्यांच्या हक्कांची नोंद सातबाऱ्यावरील ‘इतर हक्क’ या विभागात केली जाते. ‘कायम कुळ’ हे असे शेतकरी असतात, ज्यांना न्यायालयीन आदेश, परंपरा किंवा रुढींनुसार जमिनीवर कायमस्वरूपी हक्क प्राप्त झाले आहेत. त्यांच्या नावावर सातबाऱ्यावर ‘कायम कुळ’ अशी नोंद केली जाते.
कुळाच्या जमिनीचे वर्ग-२ वरून वर्ग-१ मध्ये रूपांतर कसे करावे?
वर्ग-२ ची जमीन ही विशिष्ट अटींसह दिलेली असते. अशा जमिनीचा वापर केवळ ठरावीक उद्दिष्टांसाठी केला जाऊ शकतो आणि ती मालकाच्या संमतीशिवाय किंवा शासनाच्या परवानगीशिवाय विकता येत नाही. जर कुळाच्या नावाने असलेली जमीन वर्ग-२ वरून वर्ग-१ मध्ये रूपांतरित करायची असेल, तर संबंधित शेतकऱ्याने तहसील कार्यालयात अर्ज दाखल करावा लागतो. वर्ग-१ मध्ये रूपांतर झाल्यानंतर जमिनीवरील सर्व बंधने हटवली जातात, आणि ती कोणत्याही बंधनाशिवाय विक्री किंवा इतर व्यवहारांसाठी उपलब्ध होते.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे:
वर्ग-२ ची जमीन वर्ग-१ मध्ये बदलण्यासाठी अर्जासोबत काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागतात. यामध्ये –
1960 पासूनचा सातबारा उतारा,फेरफार नोंद (Mutation Entry),खसरा पत्रक,कुळ प्रमाणपत्र,कुळाचा चलन दस्तऐवज आणि इतर संबंधित कागदपत्रे लागतात.अर्ज दाखल झाल्यानंतर संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकारी तपासणी करतात आणि अहवाल तयार करतात.
या अहवालावर आधारित तहसीलदार कार्यालय सार्वजनिक नोटीस प्रसिद्ध करते. या नोटीसमध्ये संबंधित जमिनीबाबत कोणालाही आक्षेप असल्यास तो तहसील कार्यालयात नोंदविण्याची संधी दिली जाते. जर या प्रक्रियेदरम्यान कोणताही आक्षेप नसेल, तर साधारणतः एका महिन्यात सातबाऱ्यावर ‘वर्ग-१’ अशी नोंद केली जाते.
वर्ग-१ मध्ये रूपांतराचे फायदे
एकदा वर्ग-१ मध्ये नोंदणी झाल्यावर त्या जमिनीवरील कायदेशीर बंधने दूर होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध फायदे मिळतात –
बँकांकडून कर्ज सुलभ होते: जमिनीवर असलेली बंधने दूर झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज मिळवणे सोपे होते.
अनुदान योजनांचा लाभ: शासनाच्या विविध कृषी अनुदान योजनांचा लाभ घेता येतो.
मालमत्ता व्यवहार सुलभता: शेतकरी आपली जमीन कोणत्याही बंधनाशिवाय विकू शकतात किंवा भाड्याने देऊ शकतात.
म्हणूनच, ज्या शेतकऱ्यांकडे कुळ कायद्यांतर्गत मिळालेली जमीन वर्ग-२ मध्ये आहे, त्यांनी त्वरित तहसील कार्यालयात संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. या रूपांतरामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक स्वातंत्र्य वाढते आणि त्यांच्या जमिनीवरील हक्क अधिक मजबूत होतात.