Chemical Fertilizer: तुमची शेती समृद्ध होतेय, पण आरोग्य धोक्यात आहे का? वाचा यूरियाच्या अतिवापराने होणाऱ्या धोक्याची माहिती
Agriculture Guide:-आजच्या आधुनिक शेतीत जास्त उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यात सर्वाधिक वापरले जाणारे खत म्हणजे युरिया, कारण ते वनस्पतींसाठी नत्र (नायट्रोजन) पुरवठा करते आणि त्यामुळे पिके जोमदार वाढतात. तथापि, युरियाच्या अतिवापरामुळे जमिनीची गुणवत्ता ढासळते, पाण्याचे स्रोत दूषित होतात आणि मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.
अनेक शेतकरी उत्पादन वाढवण्यासाठी युरियाचा बेसुमार वापर करत असल्यामुळे शेतीतील नैसर्गिक संतुलन बिघडण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेषतः ऊस, द्राक्षे, केळी, भाजीपाला यांसारख्या बागायती पिकांसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर युरियाचा वापर करतात. महाराष्ट्रात दरवर्षी अंदाजे ६.५० ते ७ लाख टन युरिया शेतीसाठी वापरण्यात येतो.
युरियातील नायट्रेट आणि त्याचे पर्यावरणावर होणारे परिणाम
युरिया खत पिकांसाठी आवश्यक नत्राचा पुरवठा करते, परंतु त्याचा मोठा भाग मातीमध्ये अतिरीक्त राहतो किंवा पावसाच्या पाण्यामुळे वाहून भूगर्भात आणि पृष्ठभागावरील जलस्रोतांमध्ये मिसळतो. हे नायट्रेट पिण्याच्या पाण्याच्या श्रोतांमध्ये जाऊन आरोग्यास धोका निर्माण करू शकते. जलस्रोत दूषित झाल्यास त्याचा परिणाम केवळ मानवावरच नाही तर जलचर प्रजातींवरही होतो. जलस्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण वाढल्यास यूट्रोफिकेशन (Eutrophication) नावाची प्रक्रिया घडते, ज्यामुळे जलचर प्राण्यांचे जीवन धोक्यात येते आणि गोड्या पाण्यातील जैवविविधतेवर परिणाम होतो.
युरियाच्या अतिवापरामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
युरियामधील नायट्रेट जर पिण्याच्या पाण्यात मिसळले तर त्याचा थेट परिणाम माणसाच्या रक्तवाहिन्यांवर होतो. पाण्यातील नायट्रेट शरीरात गेले की ते मेटहिमोग्लोबिन (Methemoglobin) मध्ये रूपांतरित होते, ज्यामुळे रक्तात ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते. यामुळे "ब्लू बेबी सिंड्रोम" (Blue Baby Syndrome) नावाचा विकार होतो, जो नवजात अर्भकांसाठी प्राणघातक ठरू शकतो. तसेच, युरियाच्या अतिवापरामुळे पुढील गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो:
श्वसनाच्या तक्रारी - दूषित पाण्यातील नायट्रेट शरीरात गेल्यास फुफ्फुसांवर परिणाम होऊन दम्याचे (Asthma) लक्षणे दिसू शकतात.
रक्ताभिसरणाच्या समस्या - रक्तात गुठळ्या होऊन रक्तवाहिन्या बंद होण्याचा धोका वाढतो.
कर्करोगाचा धोका - दीर्घकाळ नायट्रेटयुक्त पाणी प्यायल्यास काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
गर्भवती महिलांमध्ये धोका - गर्भवती महिलांना अशुद्ध पाणी प्यायल्यास गर्भविकासावर परिणाम होऊ शकतो आणि जन्मजात विकृती निर्माण होण्याची शक्यता असते.
शेतीवरील दीर्घकालीन परिणाम
युरियाचा बेसुमार वापर केल्याने सुरुवातीला उत्पादन वाढते, पण दीर्घकालीन दृष्टीने जमिनीची सुपीकता कमी होते. युरिया जमिनीत अतिरीक्त प्रमाणात राहिल्यास मातीचा सामू (pH) बदलतो, सूक्ष्मजीव नष्ट होतात आणि सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण कमी होते. परिणामी, मृदाशास्त्रज्ञांच्या मते, जमिनीची नैसर्गिक उत्पादकता हळूहळू कमी होत जाते, आणि शेतकऱ्यांना अधिक खतांचा वापर करावा लागतो. त्यामुळे मातीची गुणवत्ता कायमस्वरूपी बिघडण्याची शक्यता निर्माण होते.
नायट्रेट प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना
सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन - रासायनिक खतांच्या ऐवजी जैविक आणि सेंद्रिय खतांचा वापर करावा.
मृदा परीक्षण (Soil Testing) - जमिनीतील पोषणमूल्ये आणि नायट्रेटचे प्रमाण तपासून त्यानुसार योग्य प्रमाणात खतांचा वापर करावा.
ठिबक सिंचन पद्धती (Drip Irrigation) - या तंत्रज्ञानामुळे पाणी आणि खतांची योग्य मात्रा नियंत्रित करता येते, त्यामुळे नायट्रेटची गळती कमी होते.
शासनाच्या अनुदानित योजनांचा वापर - शासनाने मृदा आरोग्य पत्रिका (Soil Health Card) योजना सुरू केली असून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा.
बहुपीक शेती - एकाच प्रकारचे पीक वारंवार घेतल्याने जमिनीतील पोषणतत्त्वे कमी होतात. त्यामुळे शेतीच्या चक्रात विविध प्रकारची पिके (Crop Rotation) घेणे गरजेचे आहे.