Agri Technology: केवळ 4 हजार खर्च आणि 26000 नफा! शेतीतील नवे तंत्रज्ञान घडवणार बदल… जाणून घ्या कसे?
Agriculture News:- शेती हा पारंपरिक दृष्टिकोनातून तोट्यातील व्यवसाय मानला जातो, त्यामुळे अनेक नव्या पिढीतील शेतकरी शेतीपासून दूर जात आहेत. मात्र, आता शेतीत मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडणार असून, विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या (व्हीएनआयटी) नव्या संशोधनामुळे कृषी क्षेत्रात क्रांती येणार आहे.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते आणि हे उद्दिष्ट प्रत्यक्षात साकार होण्याची शक्यता आहे. व्हीएनआयटीचे प्राध्यापक डॉ. दिलीप पेशवे यांच्या मते, देशभरातील विविध संशोधन संस्थांनी एकत्र येऊन पेरणीपासून मळणीपर्यंत विविध अत्याधुनिक यंत्रे विकसित केली आहेत. या यंत्रांचा वापर केल्यास उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न तब्बल 250 टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
व्हीएनआयटीमध्ये या नाविन्यपूर्ण यंत्र
व्हीएनआयटीमध्ये या नाविन्यपूर्ण यंत्रांचे सादरीकरण करण्यात आले असून, विशेषतः लहान आणि मर्यादित जमीनधारक शेतकऱ्यांना लक्षात घेऊन ही यंत्रे विकसित केली गेली आहेत. सध्या पारंपरिक पद्धतीने एका एकर गव्हाच्या पेरणीपासून मळणीपर्यंत 20 ते 22 हजार रुपयांचा खर्च होतो आणि त्यातून केवळ 8 ते 10 हजार रुपयांचा नफा मिळतो. मात्र, व्हीएनआयटीच्या नव्या तंत्रज्ञानामुळे हा खर्च केवळ 3500 ते 4000 रुपयांवर येईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना 25,000 ते 26,000 रुपयांपर्यंत नफा मिळण्याची संधी आहे.
संशोधनाद्वारे विकसित केलेले यंत्र
संशोधनाद्वारे विकसित केलेली यंत्रे शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. नांगरणीसाठी 'बूलक ट्रॅक्टर' तयार करण्यात आला आहे, जो पारंपरिक बैलांच्या तुलनेत वेगाने आणि कमी श्रमात नांगरणी करण्यास मदत करतो. पेरणीसाठी 'ड्रम सिडर' विकसित करण्यात आला असून, गोलाकार ड्रमच्या साहाय्याने धान्याची पेरणी अचूक आणि जलदगतीने करता येते. शेतातील तण काढण्यासाठी 'व्हिडर' तयार करण्यात आले आहे, ज्यामुळे अनावश्यक गवत सहज आणि वेगाने दूर करता येईल.
हे यंत्र लिथियम आयन बॅटरीवर चालत असल्याने पर्यावरणपूरक ठरते. पीक कापणीसाठी 'हार्वेस्टर' विकसित करण्यात आले आहे, ज्यामुळे पारंपरिक विळ्याच्या वापराशिवाय एका किंवा दोन व्यक्तींना सहजपणे पीक कापता येईल. धान्य सोंगणीसाठी 'स्कायथे' नावाचे यंत्र तयार करण्यात आले असून, याच्या मदतीने सौरऊर्जेच्या सहाय्याने शेतातच धान्य प्रक्रिया केली जाऊ शकते.
पाण्याच्या व्यवस्थेसाठी अत्यंत कार्यक्षम 'सोलर पंप' विकसित करण्यात आला आहे, जो सौरऊर्जेच्या मदतीने एका तासात 25,000 लिटर पाणी उपलब्ध करून देण्याची क्षमता ठेवतो. याशिवाय, शेतीसाठी लागणाऱ्या खतांवर आणि किटकनाशकांवर होणारा मोठ्या प्रमाणावरील खर्च लक्षात घेता, व्हीएनआयटीच्या रसायन अभियांत्रिकी विभागाने गोमूत्र आणि शेणापासून पर्यावरणपूरक किटकनाशके आणि खते विकसित केली आहेत. या पंचगव्याच्या वापरामुळे पिकांवर कोणताही रोग होणार नाही, तसेच शेतकऱ्यांचा 2 ते 3 हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च वाचेल.
देशभरातील अनेक शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा अवलंब केला असून, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये त्याचा प्रभावी वापर सुरू झाला आहे. लवकरच विदर्भातही या तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यात येणार असल्याचे डॉ. पेशवे यांनी सांगितले. हे संशोधन मोठ्या प्रमाणावर अंमलात आल्यास शेती अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढण्याची संधी निर्माण होईल.